नागपूरकरांनो सावधान! चोरटे पुन्हा आले फॉर्ममध्ये 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जून 2020

वयोगटातील अनोळखी आरोपी काळ्या रंगाच्या मोटारसायकलने मागाहून आला. काही कळण्यापूर्वीच गळ्यावर थाप मारून 40 हजार रुपये किमतीची सोन्याची चेन हिसकावून पळून गेला. 

नागपूर : लॉकडाउनचे नियम शिथिल होताच चोरटे पुन्हा सक्रिय झाले आहे. उपराजधानीत चोरी, घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. बेलतरोडीत चेनस्नॅचिंग तर पारडी व गणेशपेठ हद्दीत घरफोडीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. 

जयदुर्गा सोसायटी, मनीषनगरातील सुपर्ण अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या अश्‍विनी दोंडके (64) या शुक्रवारी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडल्या. बेलतरोडी हद्दीत सिमेंट रोडवरील खासगी रुग्णालयासमोरून जात असताना 30 ते 35 वर्षे वयोगटातील अनोळखी आरोपी काळ्या रंगाच्या मोटारसायकलने मागाहून आला. काही कळण्यापूर्वीच गळ्यावर थाप मारून 40 हजार रुपये किमतीची सोन्याची चेन हिसकावून पळून गेला. 

पुणापूर रोड, भवानीनगर येथील रहिवासी सेवकराव साठवणे (52) यांच्या मोठ्या भावाकडे लग्नकार्य होते. त्यासाठी 6 जून रोजी घराला कुलूप लावून परिवारासह ते भावाकडे गेले होते. त्यांच्याकडे भाड्याने राहणारे भगवान पेठे यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. तेसुद्धा बांधकामाच्या ठिकाणीच गेले होते. हीच संधी साधून चोरट्याने पेठे यांच्या दाराचे कुलूप व कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला. आतल्याच दारातून चोरटा साठवणे यांच्याकडे शिरला. दोन्ही घरातून 90 हजारांच्या रोखेसह एकूण 1.39 लाखांचा मुद्देमाल चोरून नेला. शुक्रवारी सकाळी घरी परतल्यानंतर ही घटना उघडकीस आली. 

हेही वाचा : उच्चभ्रूंच्या वस्तीतून येत होती तीव्र दुर्गंधी; पोलिस पोचले तेव्हा दिसले हे...

मोक्षधाम चौक, घाटरोड येथे आकाश लोखंडे यांचे विजेता असोसिएट नावाचे प्रतिष्ठान असून, वरच्या माळ्यावर लोखंडे कुटुंबाचे वास्तव्य आहे. अज्ञात चोरट्याने गुरुवारी मध्यरात्रीनंतर कार्यालयाच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. लाकडी कपाटाच्या ड्रॉव्हरमध्ये ठेवलेले 50 हजार रुपये रोख, 10 हजार रुपये किमतीचे घड्याळ असा एकूण 60 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. तिन्ही प्रकरणांमध्ये संबंधित पोलिसांनी गुन्हा दाखल करीत चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thieves activated