दिवसभर गोळा केले 18 लाख; रस्त्यात कुणीतरी दुचाकीला मारली लाथ अन्‌ मास्कने केला घोळ

Thieves looted Rs 18 lakh at Nagpur
Thieves looted Rs 18 lakh at Nagpur

नागपूर : सिव्हिल लाइन्समधील आमदार निवाससारख्या सुरक्षित परिसरातून सहा बाइकस्वार लुटारूंनी एका कंपनीच्या कलेक्‍शन एजंट असलेल्या दोन कर्मचाऱ्यांना लुटले. दोन्ही कर्मचाऱ्यांच्या हातातून जवळपास 18 लाखांची रक्‍कम हिसकावून पळ काढला. ही खळबळजनक घटना सोमवारी भरदुपारी दीड वाजता घडल्यामुळे आश्‍चर्य व्यक्‍त केले जात आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानेवाडा बेसा रोडवरील ब्रिक्‍स सर्व्हिसेस इंडिया कंपनीच्या वतीने शहरातील व्यापारी आणि कंपन्यांकडून रक्‍कम जमा केली जाते. ती रक्‍कम सिव्हिल लाइन्समधील ऍक्‍सिस बॅंकेत जमा करण्यात येते. नेहमीप्रमाणे सोमवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास ब्रिक्‍स कंपनीचे कर्मचारी श्रीकांत नानाजी इंगळे (सरईपेठ, इमामवाडा) आणि सतीश धांडे हे दोघे शहरातील वेगवेगळ्या परिसरातून 18 लाखांची रक्‍कम जमा केल्यानंतर दुचाकीने ऍक्‍सिस बॅंकेत जात होते.

आमदार निवासासमोर तीन दुचाकींनी आलेल्या सहा लुटारूंनी संधी साधून त्यांच्याकडील 18 लाख रुपये असलेली बॅग सहजरित्या लुटून नेली. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त विनीता शाहू आणि सीताबर्डी पोलिस ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. डीसीपी विनीता शाहू यांनी वेळीच तपासाची चक्रे फिरवित विविध पथकांना आरोपींच्या शोधासाठी तैनात केले. गुन्हे शाखेचे पथकही आरोपींच्या शोधात सक्रिय असल्याची माहिती आहे. याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध लूटमारीचा गुन्हा दाखल केला. 

दुचाकीला मारली लाथ

श्रीकांत इंगळे व सतीश दांडेकर हे दोघेही ब्रिक्‍स इंडिया कंपनीत पैसे वसुलीचे कार्य करतात. ही कंपनी शहरातील व्यापारी, दुकानदार व व्यापाऱ्यांच्या रकमेसह एलआयसी एजंटकडून पैसे गोळा करून बॅंकेत जमा करण्याचे कार्य करते. सोमवारी दोघेही कर्मचारी एकाच दुचाकीवर बसून रोख रकमेची बॅग घेऊन ऍक्‍सीस बॅंकेत जमा करण्यासाठी जात असताना लुटारूंनी दुचाकीला लाथ मारून पाडले. त्यांच्याजवळील 18 लाख रुपये रोखीची बॅग लुटून नेली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांची वर्दळ तरीही लूटमार

आमदार निवास हे क्वारंटाइन केंद्र असल्याने या परिसरात पोलिसांची नेहमी वर्दळ असते. तसेच शासकीय अधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांचा ताफा नेहमी या परिसरात असतो. तरीही लुटारूंनी संधी साधून या लूटमारीची घटना घडली. या घटनेमुळे सीताबर्डी पोलिसांच्या सुरक्षेव्यवस्थेची पोलखोल झाली आहे. 

सीसीटीव्ही फुटेजची मदत

आमदार निवासकडे जाणाऱ्या-येणाऱ्या रस्त्यावरील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी जप्त केले आहे. तसेच आमदार निवासासमोरील सीसीटीव्हीत ही घटना कैद झाली आहे. त्यावरून आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिस करीत आहेत. 

टीप दिल्यानंतर "गेम'

इंगळे आणि दांडेकर हे दोघेही एवढी मोठी रक्‍कम घेऊन दुचाकीने या रस्त्याने जाणार असल्याची माहिती कुण्या जवळच्या व्यक्‍तीला असावी. ती टीप त्याने लूटमार करणाऱ्यांना दिली असावी. टीप मिळाल्यानंतर हा गेम करण्यात आला असावा, असा पोलिसांना संशय आहे.

कोरोना मास्कने केला घोळ

तीन दुचाकींवर सहा लुटारू इंगळे आणि दांडेकर या दोघांचा पाठलाग करीत होते. मात्र, कोरोनामुळे सध्या वापरण्यात येणारे गोल मास्क सहाही आरोपींनी तोंडाला लावले होते. त्यामुळे त्या लुटारूंचे चेहरे व्यवस्थित दिसले नाही. मास्कमुळे चेहरा झाकला गेल्याने मोठा घोळ झाल्याची चर्चा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com