चोरट्याने घातला हैदोस...आता घरातही नाही सुरक्षित

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 जानेवारी 2020

6 जानेवारी दुपारी 12 च्या सुमारास टाटा पारसी शाळेमागे, गंजीपेठ येथे राहणाऱ्या शांताबाई बळवंत ऐडेलवार (82) या त्यांच्या घरी एकट्याच हजर होत्या. त्यावेळी द्वारकानाथ हा सायकलने त्यांच्या घरी गेला. घराबाहेर सायकल उभी करून तो घरात घुसला. चंदू गेडाम कुठे राहतो, अशी त्याने शांताबाईला विचारणा केली.

नागपूर : घरात घुसून एका वृद्धेची 55 हजारांची सोनसाखळी लुटून नेणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकाने मुद्देमालासह अटक केली. द्वारकानाथ ऊर्फ सचिन धरमदास नंदनवार (40, बजरंगनगर) असे चोरट्याचे नाव आहे.

ब्रेकिंग - पती-पत्नीने घेतले विष आणि...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 जानेवारी दुपारी 12 च्या सुमारास टाटा पारसी शाळेमागे, गंजीपेठ येथे राहणाऱ्या शांताबाई बळवंत ऐडेलवार (82) या त्यांच्या घरी एकट्याच हजर होत्या. त्यावेळी द्वारकानाथ हा सायकलने त्यांच्या घरी गेला. घराबाहेर सायकल उभी करून तो घरात घुसला. चंदू गेडाम कुठे राहतो, अशी त्याने शांताबाईला विचारणा केली. तोच त्याने त्यांच्या गळ्यातील 55 हजारांची सोनसाखळी हिसकावून पोबारा केला. याप्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता. गुन्हे शाखेला ही माहिती समजताच पथक घटनास्थळी दाखल झाले. पथकाने त्या पसिरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता शांताबाई यांची लूटमार करणारा लुटारू हा रेंजर सायकलने जाताना दिसला. द्वारकानाथ ज्या मार्गाने गेला होता त्या मार्गावरील संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी घेतले. शेवटचे त्याचे लोकेशन अजनी हद्दीत त्रिशरण चौकात मिळून आले. त्यामुळे दोन दिवसांपासून पथकाने त्रिशरण चौकात सापळा रचला होता. मात्र, द्वारकानाथ पोलिसांच्या हाती लागला नव्हता.
मंगळवारी सकाळी पोलिस पथक त्रिशरण चौकात दबा धरून बसले होते. तोच द्वारकानाथ हा सायकलने जाताना पथकाला दिसून आला. पोलिसांनी त्याला पकडले असता तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. पथकाने त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने गणेशपेठ येथील गुन्ह्याची कबुली दिली. त्याचप्रमाणे त्याने 6 ऑगस्ट 2019 साली सूर्यनगर येथील गुरुद्वारासमोर शैलेषा प्रकाश गुप्ता (32) या महिलेचे 41 हजारांचे मंगळसूत्र लुटल्याचीदेखील कबुली दिली. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून सोनसाखळी, मंगळसूत्र आणि रेंजर सायकल असा 1 लाख 8 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. पुढील कारवाईसाठी त्याला गणेशपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कामगिरी पोलिस उपायुक्‍त गजानन राजमाने यांच्या पथकातील पोलिस कर्मचारी आशीष चावरे यांनी केली.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The thieving haddos ... no longer safe in the house