हत्ती आणि गेंड्यानंतर हा आहे पृथ्वीतलावरील तिसऱ्या क्रमांकाचा शक्तिशाली प्राणी

राजेश रामपूरकर
Saturday, 14 March 2020

हत्ती आणि गेंडा यानंतर रानम्हशी हा पृथ्वीतलावरील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक शक्तिशाली प्राणी आहे. आययुसीएनने या प्राण्याची लाल यादीत नोंद केली, त्यावेळी जगभरात त्याची गांभीर्याने दखल घेतली गेली. रानम्हशींची मोठ्या प्रमाणावर होणारी शिकार आणि त्यांच्या अधिवासावर मानवाने केलेले अतिक्रमण त्यासाठी कारणीभूत ठरले आहे. भारतासह नेपाळ, पाकिस्तान, भूतान व थायलंडमध्ये मोजक्‍याच रानम्हशी शिल्लक आहेत.

नागपूर : पाण्यात डुंबणारी व गोठ्यात बांधलेली म्हैस आपल्या सर्वांच्या परिचयाची. परंतु, पाळीव म्हशीहून धिप्पाड व पिळदार शरीराची रानम्हैस (रानरेडा) आपल्याला फारशी ठाऊक नाही. त्या रानम्हशी महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील कोलामार्का राखीव संवर्धन क्षेत्रात आढळतात. मात्र, त्याच्या संवर्धनासाठी तयार केलेला आराखडा गेल्या आठ वर्षांपासून धूळखात पडला असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. 

जनुकीयदृष्ट्या योग्य असलेल्या रानम्हशींची ओळख करण्यासाठी जनुकीय अभ्यासाची गरज आहे. त्यासाठी रानम्हशींच्या जर्मप्लाझमचे क्रायोप्रिझर्वेशन तसेच वीर्यबॅंकेची आवश्‍यकता आहे. 2012 मध्ये नागपूर येथे झालेल्या बैठकीत तज्ज्ञांनी सुचविलेल्या या उपायांच्या आधारावर संवर्धन आराखड्यासाठी मसुदा तयार केला. त्यात रानम्हशींच्या अधिवासाची देखरेख व पुनर्स्थापना, व्यावसायिक प्रकल्पांना त्यापासून दूर ठेवणे, शिकारींवर नियंत्रण आणणे, परजीवी रोगांपासून रानम्हशींचा बचाव करणे तसेच संशोधन व संनियंत्रण अशा अनेक बाबींचा अंतर्भाव आराखड्यात करण्यात आला होता. मात्र, तो अमलात आला नसून रानम्हशींच्या संवर्धनाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. 

रानम्हैस संवर्धन आराखडा धूळखात 
हत्ती आणि गेंडा यानंतर रानम्हशी हा पृथ्वीतलावरील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक शक्तिशाली प्राणी आहे. आययुसीएनने या प्राण्याची लाल यादीत नोंद केली, त्यावेळी जगभरात त्याची गांभीर्याने दखल घेतली गेली. रानम्हशींची मोठ्या प्रमाणावर होणारी शिकार आणि त्यांच्या अधिवासावर मानवाने केलेले अतिक्रमण त्यासाठी कारणीभूत ठरले आहे. भारतासह नेपाळ, पाकिस्तान, भूतान व थायलंडमध्ये मोजक्‍याच रानम्हशी शिल्लक आहेत.

भारतात 1930 ते 1950 या कालखंडात रानम्हशींचे अस्तित्व मोठ्या प्रमाणावर होते. त्यानंतर मात्र त्याला ग्रहण लागले. छत्तीसगड राज्यातील उदांती-सीतानदी व्याघ्रप्रकल्प व गडचिरोली जिल्ह्यातील कोपेला आणि कोलामार्का ही दोन संरक्षितक्षेत्रे रानम्हशींच्या संवर्धनासाठी आणि त्यांच्या प्रजननासाठी उत्कृष्ट ठरली आहेत. मात्र, रानम्हशींची एकूणच स्थिती बघता जागतिक पातळीवर त्याची म्हणावी तशी दखल घेतली गेली नाही, अशी खंत आययुसीएनमधील एशियन वाइल्ड कॅटल स्पेशालिस्ट ग्रुपच्या स्पेसीस सर्वायव्हल कमिशनचे अध्यक्ष डॉ. जेम्स बर्टन यांनी व्यक्त केली. सद्यस्थितीत रानम्हशींचे कळप आसामच्या जगप्रसिद्ध काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात दिसून येतात. गवताळ प्रदेशातील निसर्गसाखळीत रानम्हशींचे अस्तित्व मौल्यवान समजले जाते, पण पाळीव म्हशींच्या संपर्कात आल्यामुळे रानम्हशींची शुद्ध प्रजाती धोक्‍यात असल्या आहेत. 

बोंबला! नागपूरच्या मेयो रुग्णालयातून चार कोरोना संशयितांचा पोबारा

रानम्हशी 
-आसाम, छत्तीसगड आणि महाराष्ट्रात 91 टक्के 
-जगात 3000 तर देशात 2700 
-नेपाळ, पाकिस्तान, म्यानमार, कंबोडीया, भूतान व थायलंडमध्ये अस्तित्व 

गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर परिसरात 2012 मध्ये 12 रानम्हशी होत्या. त्यात आता वाढ झाली असून मध्यभारतातील 50 पैकी 30 च्या जवळपास या परिसरात आहेत. मानवी हस्तक्षेप कमी केल्याने रानम्हशींचा वावर वाढला आहे. फेब्रुवारी ते जून या कालावधीत रानम्हशी दिसतात. याचे संवर्धन स्थानिकांच्या सहभागातून करण्यावर भर दिला जात आहे. 
-नितीन काकोडकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) 

कळपाने राहतात 
रानम्हशी साधारण 30 च्या कळपाने राहतात. कधी कधी अनेक कळप एकत्र येतात. बहुतांश वेळा प्रौढ नर एकट्याने किंवा त्यांचे वेगळे कळप करून राहतात. कळपातील प्राणी एकमेकांशी संपर्कात राहतात. गवत हे त्यांचे मुख्य अन्न असून मुख्यत्वे सकाळी व संध्याकाळी आणि क्वचित रात्रीसुद्धा त्या चरतात. दुपारी उंच गवतात किंवा झाडाच्या सावलीत विसावा घेतात. पाळीव म्हशींप्रमाणेच रानम्हशींनासुद्धा पाण्याच्या सान्निध्यात राहायला आवडते. मध्य भारतातील पानगळी जंगलांत राहणाऱ्या रानम्हशी उन्हाळ्यात पाण्याच्या व चाऱ्याच्या शोधात बऱ्याच दूर जातात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: third powerfull animal on earth