गृहमंत्री देशमुख म्हणाले, भूमाफियांशी संबंध असणाऱ्यांची खैर नाही

Those who are associated with the land mafia are not well
Those who are associated with the land mafia are not well

नागपूर : आयुष्यभराची कमाई जमा करून स्वतःचे घर बांधण्याचे स्वप्न पाहणारा सामान्य नागरिक भूमाफियाचा बळी ठरतो. भूखंड घेतल्यानंतर भूमाफिया काही शासकीय विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दोन पैशाचे आमिष दाखवतो आणि भूखंड हडपतो. मात्र, आता अशा फसवणुकींमध्ये जर अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने सहकार्य केल्यास त्यांची खैर नाही. त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात येईल, असा इशारा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला.

भूमाफियांविरुद्ध आलेल्या पहिल्या ५० तक्रारींचे निवारण सिव्हिल लाइन्समधील पोलिस जिमखाना येथे आयोजित तक्रार निवारण शिबिरात करण्यात आले. शिबिरानंतर गृहमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. काही शासकीय अधिकारी तसेच राजकीय क्षेत्रात दबदबा असलेले तथाकथित पुढारी पैसा कमविण्यासाठी भूमाफियांना हाताशी धरतात.

एखाद्याचा कोट्यवधीचा भूखंड धमकी देऊन किंवा बनावट कागदपत्रे तयार करून हडपला जातो. पोलिसांकडे गेल्यास योग्य दखल न घेतल्याने तक्रार पेंडिंग राहते. मात्र, आता राज्यभर भूमाफियांविरोधात शिबिरे लावण्यात येणार आहेत. संबंधित खात्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तक्रारींची निपटारा करण्यात येईल, असेही देशमुख म्हणाले.

भूमाफियांचा नायनाट करण्यासाठी कठोर पावले पोलिसांनी उचलली आहेत. साहिल सय्यद, संतोष आंबेकर या गुन्हेगारांचे घर जमीनदोस्त करण्यात आले. यापुढेही अशा कारवाई करण्यात येईल. अमली पदार्थ तस्करांचे नेटवर्क समूळ नष्ट करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. मध्य प्रदेशातून होत असलेल्या देशीकट्याच्या तस्करीबाबतही कठोर कारवाई करण्यात येत आहे.

या देशीकट्टा बनविणाऱ्यांचे अड्डे नष्ट करण्यासाठी संबंधित राज्याच्या पोलिसांसोबत समन्वय साधून कारवाई करण्यात येईल. भूमाफियांविरुद्ध आलेल्या तक्रार निवारण शिबिर नागपुरातील ‘पायलट प्राजेक्ट’ आहे. या शिबिराचे अन्य टप्पे लवकरच होतील, असेही देशमुख यांनी स्पष्ट केले. यावेळी पोलिस आयुक्त अमितेशकुमार उपस्थित होते.

बदल्यांबाबत लवकरच निर्णय

पोलिस निरीक्षक, सहायक निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या बदल्यांबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. त्याची प्रक्रीया सुरू असून चार ते पाच दिवसांत बदल्या करण्यात येईल. गडचिरोलीतील पोलिस अधिकाऱ्यांनी पाठविलेल्या पत्रांचीही दखल घेण्यात आली असून, त्यावर तोडगा काढण्यात येणार आहे. राज्यभरातील पीएसआय ते पीआय दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नतीची प्रक्रिया सुरू आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com