बिल भरा अथवा वीज कापू; वीज कर्मचाऱ्यांकडून धमक्या, ग्राहक चिंतेत

योगेश बरवड
Monday, 19 October 2020

प्रामुख्याने उमरेड रोड, तुकडोजी चौक कार्यालयात हा प्रकार सर्रास सुरू आहे. येवढेच नाही तर महावितरणने पूर्वी थकबाकीचे तीन हफ्ते पाडून देण्याची भूमिका घेतली होती. आता मात्र दोनच हफ्ते पाडून दिले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकारामुळे ग्राहकांमध्ये नाराजीचा सूर आहे.

नागपूर : वारंवार विनंत्या करूनही अपेक्षेनुसार थकबाकीची वसुली होत नसल्याने महावितरणच्या वीज कर्मचाऱ्यांनी आता कठोर मार्ग स्वीकारला आहे. बिल भरा अथवा वीज कापली जाईल, अशी सूचना वजा धमकी ग्राहकांना दिली जाऊ लागली आहे. या प्रकाराने आधीच आर्थिक विवंचनेत असणारे वीजग्राहक दहशतीत आले आहेत.

लॉकडाऊनमुळे बिल भरणा वाढविण्यासाठी काही उपाययोजना करण्यात आल्या. ग्राहकांना बिलाचे हप्तेही पाडून मिळाले. एकत्रित भरणा करणाऱ्या ग्राहकांना दोन टक्के सवलत मिळाली. अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली असली तरी पूर्वीसारखी मिळकत मात्र नाही. यामुळे थकबाकीची रक्कम वाढत आहे.

जाणून घ्या - सावळीच्या मंदिर परिसरात पडला चक्क पैशांचा पाऊस; अखेर पोलिसांनी बाहेर आणले सत्य

याची पुरेपूर कल्पना असल्याने महावितरणने वीज खंडित करण्यासारखे पाऊल टाळले. पण, त्याचवेळी कर्मचाऱ्यांवर वसुलीसाठी दबाव टाकण्यात आला. अशा स्थितीत बऱ्याच कर्मचाऱ्यांनी वसुली वाढविण्यासाठी थकबाकीदार ग्राहकांना धमकावणे सुरू केले आहे.

वीज कापण्याच्या तोंडी सूचना मिळाल्या आहेत. यामुळे तातडीने बिल भरा अथवा कनेक्शन कापण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तक्रार घेऊन कार्यालयात येणाऱ्यांचे पहिले बिल तपासले जाते. थकबाकी दिसताच ती भरा नंतरच तक्रार सोडवली जाईल अशी आडमुठी भूमिकाही घेतली जात आहे.

प्रामुख्याने उमरेड रोड, तुकडोजी चौक कार्यालयात हा प्रकार सर्रास सुरू आहे. येवढेच नाही तर महावितरणने पूर्वी थकबाकीचे तीन हफ्ते पाडून देण्याची भूमिका घेतली होती. आता मात्र दोनच हफ्ते पाडून दिले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकारामुळे ग्राहकांमध्ये नाराजीचा सूर आहे.

सविस्तर वाचा - इट्स रिअली नाईस... बांबू राईस!, मधुमेह, सांधेदुखी आदींपासून मिळेल आराम

महावितरणची आर्थिक कोंडी

मार्च महिन्यात वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत मोठी घट झाली होती. ऑगस्टमध्ये विदर्भातील ५४ लाख ग्राहकांनी सुमारे ५२४ कोटींचा भरणा केला. नागपूर परिमंडळातील १६ लाख ग्राहकांनी २४३ कोटी रुपये भरले तर सर्वात कमी भरणा अकोला परिमंडळातून झाला होता. आता परिस्थिती काहीशी सुधारली असली तरी ती अपेक्षेनुरूप नाही.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Threats from power employees to investors customer