इट्स रिअली नाईस... बांबू राईस!, मधुमेह, सांधेदुखी आदींपासून मिळेल आराम

Bamboo Rice will be on the market soon
Bamboo Rice will be on the market soon

नागपूर : कॉलेस्ट्रॉलची समस्या, अतिरिक्त चरबी कमी करायची आहे, मधुमेह व सांधेदुखीपासून आराम पाहिजे मग ‘बांबू राईस’ खा. अशी चर्चा लवकरच सगळीकडे होणार अशी चिन्हे आहेत. कारण, काही राज्यांनी ‘बांबू राईस’चा आक्रमकपणे प्रचार व प्रसार करण्याचे नियोजन केले आहे. विशेष म्हणजे जंगलात राहणारे वनवासी, आदिवासी बांधवांना ‘बांबू राईस’ उत्पन्न व रोजगाराची नवीन संधी मिळवून देणारा ठरणार आहे.

बांबूपासून बिस्कीट, कुकीज, बाटल्या अशा अनेक उपयोगी वस्तूंची निर्मिती करण्यात आत्तापर्यंत यश आले आहे. आता यापुढचे पाऊल उचलत औषधी गुणधर्मांनी युक्त ‘बांबू तांदूळ’चे उत्पादन, विपणनाकडे लक्ष देण्याचे काही राज्यांनी ठरविले आहे. बांबूच्या झाडाला फुलं येणे व त्यापासून बियाणे मिळणे ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे.

‘बांबू राईस’ला स्थानिक भाषेत ‘मुलायरी’ असे म्हटले जाते. हा तांदूळ किंवा ‘मुलायरी’ अनेक वर्षांत फक्त एकदाच मिळतो. बांबूचे झाड जीवनाच्या अंतिम टप्प्यात आले असताना वा मरणासन्न अवस्थेत असताना त्याच्या ‘शूट’पासून (कोंब) जे बियाणे मिळते त्‍याला ‘मुलायरी’ म्हणतात.

‘बांबू तांदूळ’ पौष्टिक आणि आरोग्यवर्धक आहे. तो कफ, पीत्तदोष बरा करते तसेच शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकत असल्याचेही संशोधकांचे मत आहे. व्हाईट राईसला (पांढरा तांदूळ) ‘बांबू राईस’ हा चांगला पर्याय ठरेल असा विश्वास त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांनी यांनी नुकताच व्यक्त केला.

‘त्रिपुरा बांबू राईस’चे उत्पादन यशस्वी झाल्याचे त्यांनी ट्वीट केले आहे. प्रमुख तांदूळ उत्पादक राज्यांपैकी एक असलेल्या ओदिशा, केरळ येथेही हा राईस होतो. विशेष म्हणजे ओदिशा आणि त्रिपुराने नद्यांच्या काठावर, रस्त्याच्या कडेला आणि पडीक जमिनीवर बांबूच्या लागवडीस चालना देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

असे आहेत गुणधर्म

  • गहू व अन्य तांदळापेक्षा अधिक प्रथिने
  • मधुमेह विरोधी फायदे
  • रोग प्रतिकारशक्ती वाढते
  • कॉलेस्ट्रॉलवर नियंत्रण

रोजगार निर्मितीला पूरक

बांबू हे पर्यावरपूरक, पुनरुत्पादन होणारे पीक आहे. विदर्भात जवळपास १२ लाख हेक्टरवर बांबू लागवड व वनशेती करणे शक्य आहे. बांबू शेती आणि उद्योगाला आगामी काळात मोठी मागणी राहणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. औषधी गुणधर्म असल्यामुळे ‘बांबू राईस’ आर्थिकदृष्ट्या फायद्याचे ठरणार आहे. यातून रोजगार निर्मितीलाही मोठा वाव आहे.

निसर्गाची यंत्रणा

बांबूचे तांदूळ सामान्यतः उपलब्ध नसतात कारण वृद्ध झाडाला फूलं येण्यास बरीच वर्षे लागतात. बांबूच्या काही प्रजाती ४० ते ५० वर्षांत एकदाच फुलांनी बहरतात आणि नंतर मरतात. मरताना ते भरपाईसाठी मोठ्या प्रमाणात फुले व बियाणे मागे सोडतात. विशिष्ट प्रजातींचे अस्तित्व सुनिश्चित करण्यासाठी निसर्गाची ही यंत्रणा असल्याचे आदिवासी, शेतकरी सांगतात.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com