गुन्हे शाखेमुळे गॅंगवॉर टळला, हे आहे कारण...

Three arrested with pistols in Nagpur
Three arrested with pistols in Nagpur

नागपूर : शहरात दिवसाला एक खून होत आहे. यामुळे नागपूरचे नाव खराब होत असून, क्राईम कॅपिटल अशी नवी ओळख मिळत आहे. लुटमार, पैशांचा वाद, वर्चस्वाच्या लढाइतून रोज गॅंगवॉर होऊन खून होत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुसरीकडे पोलिसांना यावर आवर आणणे कठीण होत आहे. यामुळे गुन्हेगारांची हिंमत चांगलीच वाढली आहे. अशात पोलिसांनी पिस्तूल बाळगणाऱ्यांना तिघांना अटक केली.

गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक चारचे पथक शुक्रवारी ऑपरेशन क्रॅकडाउन राबवित असताना रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार राजू ऊर्फ बंदी ऊर्फ भारत ठवरे (39, रा. भांडेप्लॉट) हा प्रजापती चौकातील जंगशन बारच्या बाजूला पडक्‍या इमारतीजवळ पिस्तूल घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. त्याआधारे पोलिसांनी सापळा रचला. बंटी येताच त्याला शिताफीने अटक केली. अंगझडतीत त्याच्या कमरेला देशी बनाटीचे दोन लोखंडी पिस्टल दिसून आले. बंटी हा कुख्यात गुंड आहे. सक्करदरा परिसरात त्याची दहशत आहे. अलीकडेच त्याने आकाश गुंडलवार व बादल सहारे या दोन साथीदारांना सोबत घेऊन भांडेप्लॉट परिसरातील महिलेला पिस्तूलचा धाक दाखवून दरमहा पाच हजारांच्या खंडणीसाठी धमकावले होते. दहशतीपोटी कुणीही त्याच्यासंदर्भात माहिती देण्यास समोर येत नव्हते. यामुळे त्याला अटकही झाली नव्हती.

गुन्हेशाखेच्या युनिट क्रमांक पाचच्या पथकाचे प्रमुख पोलिस निरीक्षक अशोक मेश्राम, एपीआय दिलीप चंदन यांनी गुप्त माहितीच्या आधारे बंदे नवाजनगर परिसरात सापळा रचून आरोपी शेख शाहरूख (22, रा. हसनबाग) याला ताब्यात घेतले. अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेत पिस्तूल खोसलेले दिसून आले. त्यात एक जिवंत काडतूसही होते. शहारूख हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध नंदनवन ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. लकडगंज हद्दीतील बहुचर्चित 75 लाख रुपयांच्या दरोड्याच्या गुन्ह्यातही त्याचा सहभाग होता. यशोधरानगर ठाण्यातही त्याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल आहे.

याचप्रमाणे गुन्हेशाखेचे चेनस्नॅचिंग पथकानेही पिस्टलसह एकाला अटक केली. समीर अली ऊर्फ बल्लू साकीद अली (20, रा. मोठा ताजबाग) असे आरोपीचे नाव आहे. तो पिस्तूल घेऊन फिरत असल्याची गुप्त माहिती पोलिस पथकाला मिळाली होती. त्यानुसार न्यू नरसाळा मार्गावरील स्वागतनगर परिसरात असणाऱ्या पारस बेकरीजवळ सापळा रचण्यात आला. बल्लू येताच त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे पिस्टल आणि जीवंत काडतूस असा एकूण 51 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

प्रती पिस्टल पंधरा हजार रुपये

नागपूर शहरात दोन खुनाच्या गुन्ह्यांसह एकूण 57 गंभीर स्वरूपाचे गुन्ह बंटीविरोधात दाखल आहेत. बंटीने कळमाना येथील नीलेश पटले याच्याकडून प्रती पिस्टल 15 हजार रुपये प्रमाणे खरेदी केले होते. जिवंत काडतूसही त्याच्याकडून खरेदी केले होते. गुन्हे शाखेच्या तीन वेगवेगळ्या पथकांनी पिस्तूल बाळगणाऱ्या तिघांना अटक केली. त्यांच्याकडून चार पिस्तूल हस्तगत करण्यात आल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com