नागपूरच्या तीन चिमुकल्यांनी केले 'कळसुबाई' सर

file photo
file photo


नागपूर  : नागपूर जिल्ह्यातील तीन चिमुकल्या साहसवीरांनी महाराष्ट्रातील सर्वाधिक उंचीचे कळसुबाई शिखर पहिल्याच प्रयत्नात यशस्वीरित्या गाठून नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. श्लोक डुडुलकर (नागपूर), गुरुकांत भोसे (काटोल) आणि प्रिशा भोसे (काटोल) हे कामगिरी करणारे साहसवीर आहेत. 


मिनी एव्हरेस्ट म्हणून ओळख असलेले ५४०० फूट उंचीचे अहमदनगर जिल्ह्यातील हे शिखर साहसवीरांसाठी अत्यंत आव्हानात्मक मानले जाते. त्यामुळे लहान मुले चढण्याची सहसा हिंमत करीत नाही. मात्र नागपूरच्या चिमुकल्या साहसवीरांनी अडथळ्यांवर मात करीत हे आव्हान सहजरित्या पेलले. त्यांनी १८ ऑक्टोबरला सकाळी दहा वाजता शिखर चढायला सुरुवात केल्यानंतर दुपारी अडीचला ते शिखरावर पोहोचले. अपंग साहसवीर व मार्गदर्शक अशोक मुन्ने यांच्या नेतृत्वात त्यांनी ही कामगिरी यशस्वी केली. या मिशनमध्ये तिघांसोबत त्यांचे आईवडीलही होते. टेनिसपटू असलेला श्लोक व प्रिशा हे केवळ दहा वर्षांचे असून, गुरूकांत बारा वर्षांचा आहे. उल्लेखनीय म्हणजे तिघेही प्रथमच एवढ्या उंच शिखरावर चढले होते. दुर्दैवाने त्यांना सर्वांत कमी वयाचा विक्रम मोडता आला नाही. यापूर्वी एका मुलाने अवघ्या नवव्या वर्षी हे शिखर सर करून रेकॉर्ड केला होता. 


अनुभव सांगताना श्लोकचे वडील मंगेश डुडुलकर म्हणाले, कळसुबाई चढण्याचा अनुभव खूपच रोमांचकारी व 'चॅलेंजिंग' होता. या शिखरावर सोप्या मार्गानेही चढता येते. मात्र आम्ही मुद्दाम कठीण मानला जाणारा बारी मार्ग निवडला. जाताना तितक्या अडचणी आल्या नाही. मात्र उतरताना धो-धो पाऊस, चिखल व किर्र अंधार असल्याने प्रचंड त्रास झाला. पावलोपावली अडचणी व पाय घसरत होते. पण तरीही हिंमत न हारता आम्ही प्रत्येक अडचणींवर मात करत रात्री आठच्या सुमारास खाली आलो. नियमित सरावांमुळे हे कठीण मिशन शक्य झाल्याचे ते म्हणाले. कळसुबाईनंतर आता तिघांनीही पंधरा हजार फूट उंचीच्या हिमालयात बर्फावरून चढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. माऊंट एव्हरेस्ट, नेपाळमधील मीरा पीक, कुगती पार्कसह अनेक अवघड शिखरे चढणारे अशोक मुन्ने यांची काटोल तालुक्यात कार नदी प्रकल्पाजवळ 'अमर द कॅम्प' ही साइट आहे. हे तिघेही 'अमर द कॅम्प' चे सदस्य असून, गेल्या एक वर्षापासून नियमित सराव करीत आहेत. 

'मला 'कळसुबाई' चढण्याचा चांगला अनुभव आहे. मात्र तिघांसाठी हा पहिलाच अनुभव होता. यादरम्यान त्यांना अनेक अडचणी आल्या. मात्र प्रत्येक अडचणीवर जिद्दीने मात करत त्यांनी हे मिशन यशस्वीरित्या पूर्ण केले. ही कामगिरी खरोखरच कौतुकास्पद आहे. ' 
-अशोक मुन्ने, मार्गदर्शक 

संपादन : नरेश शेळके 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com