आठवडी बाजारासाठी ते गप्पा मारत निघाले आणि थरकाप उडाला, वाचा काय झाले...

Three workers were crushed by a train in Nagpur
Three workers were crushed by a train in Nagpur

बुटीबोरी (जि. नागपूर) : आठवडाभर मजुरी केली. शुक्रवारी आठवडी आजार असल्याने ठेकेदाराकडून काही पैसे घेतले. बाजार असल्याने चांगले काहीतरी घेण्याच्या विचाराने ते बाजाराच्या दिशेने निघाले. नेहमीचा रस्ता असल्याने ते गपा मारत जात होते. वाटेत रेल्वे रूळ येतो हे त्यांना ठाऊक होते. नेहमीच ते रेल्वे रूळ ओलांडून जात होते. परंतु, यंदाच्या आठवडी बाजार त्यांच्यासाठी घातक ठरला. तीन कामगारांना रूळ ओलांडताना रेल्वेने चिरडले. बुटीबोरी पोलिस हद्दीतील गोदावरीनगरनजीकच्या रेल्वेरूळावर शुक्रवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. 

शारदा शेखलाल सयाम (19), कमलेश गोधनलाल मरसकोल्हे (22) आणि योगेश उईके (20, तिन्ही रा. मुराही टोला, जिल्हा शिवणी, मध्य प्रदेश) असे या अपघातात मृत्यू झालेल्या कामगारांची नावे आहेत. गोदावरीनगर येथून एकूण तीन रेल्वे मार्ग जातात. एकाच वेळी तिन्ही मार्गावरील गाड्या आल्याने कामगारांचा गोंधळ उडला. घाबरल्याने त्यांचा तोल गेला आणि काही कळायच्या आत रेल्वे त्यांना चिरडून पुढे गेली. यानंतर कामगारांमध्ये एकच खळबळ उडाली. गोदावरीनगर येथे मोठ्या प्रमाणात कामगार वास्तव्याला आहेत. बाजारासाठी ते नेहमीच रूळ ओलांडून जात असतात. 

रूळ ओलांडणे नित्याचेच असल्याने आपसात गप्पा मारत ते जात होते. एकाचवेळी तिन्ही मार्गांवर गाड्या येतील याची कल्पनाही त्यांना नव्हती. समोरून धडधडत रेल्वे येत असल्याने बघून त्यांचा थरकाप उडाला. नेमके काय करावे, हे त्यांना सुचेनासे झाले होते. रूळ ओलांडण्याच्या मनःस्थितीत असताना समोरच्याही मार्गावरूनही गाडी येताना त्यांना दिसली. त्यामुळे ते अधिकाच घाबरले. काही सुचायच्या, करायच्या आतच त्यांना रेल्वेने धडक दिली. अपघाताचे वृत्त परिसरात झपाट्याने पसरले. 

घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांसह बुटीबोरीचे पोलिस निरीक्षक आसिफफराजा शेख, पोलिस उपनिरीक्षक अमोल लगड, मिलिंद नांदूरकर, सतेंद्र रंगारी, संजय बांते, विनायक सातव, खुशाल शेगोकर यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी नागपूर येथील शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आले. घटनेची नोंद करून पुढील तपास बुटीबोरी पोलिस करीत आहेत.

बाजार करण्यापूर्वीच मृत्यूने गाठले

मृत कामगार हे बुटीबोरीनजीकच्या लॉ कॉलेजच्या बांधकामावरील कामगार म्हणून कामाला होते. शुक्रवारी बुटीबोरी येथे आठवडी बाजार असतो. त्यासाठी कामगार बुटीबोरीकडे येत होते. मात्र, बाजार करण्यापूर्वीच त्यांना मृत्यूने गाठले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com