गुड न्यूज! लवकरच सुरू होणार व्याघ्रपर्यटन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 जून 2020

राज्य शासनाने परवानगी दिल्यास ताडोबा- अंधारी, बोर, पेंच, मेळघाट या व्याघ्रप्रकल्पातील पर्यटन सुरू होऊ शकते. तसेच टिपेश्‍वर, उमरेड-कऱ्हांडला या अभयारण्यातही निसर्ग पर्यटनाचा मार्ग मोकळा होऊ शकणार आहे. मात्र, पर्यटन सुरू करताना एनटीसीएने नियमांचे पालन करणे बंधनकारक केले आहे. 

नागपूर : निसर्गप्रेमींना दिलासा देणारी बातमी आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशातील व्याघ्रप्रकल्पातील पर्यटन राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणाच्या (एनटीसीए) निर्देशानुसार, मार्चपासून बंद होते. आता एनटीसीएने राज्य शासनाच्या सूचनेनुसार व्याघ्रप्रकल्पातील निसर्ग पर्यटन सुरू करण्यास हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे राज्य शासनाने परवानगी दिल्यास ताडोबा-अंधारी, बोर, पेंच, मेळघाट या व्याघ्रप्रकल्पातील पर्यटन सुरू होऊ शकते. तसेच टिपेश्‍वर, उमरेड-कऱ्हांडला या अभयारण्यातही निसर्ग पर्यटनाचा मार्ग मोकळा होऊ शकणार आहे. मात्र, पर्यटन सुरू करताना एनटीसीएने काही नियमांचे पालन करणे बंधनकारक केले आहे. 

अमेरिकेतील प्राणिसंग्रहालयात वाघाला कोरोना झाल्याने देशातील व राज्यातील सर्वच व्याघ्रप्रकल्प व अभयारण्य बंद करण्याचे निर्देश केंद्र सरकार व राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणाने 15 मार्च रोजी दिले होते. त्यानंतर राज्य शासनाने व्याघ्रप्रकल्प व अभयारण्य पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश काढले होते. आता केंद्र सरकारने व्याघ्रप्रकल्प सुरू करण्याची परवानगी दिली आहे. परवानगी देताना काही अटीही घातल्या आहेत. त्यात दहा वर्षांखालील व 65 वर्षांवरील पर्यटकांवर बंदी घातली आहे.

वाचा — अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत काय म्हणाले माजी कुलगुरू.

मात्र, इतर सर्वच पर्यटकांच्या आरोग्याची तपासणी करूनच त्यांना जंगलात सोडावे. व्याघ्रप्रकल्पाच्या प्रवेशद्वाराजवळ सॅनिटायझर आणि थर्मामीटरची सोय करावी. तसेच जिप्सीच्या क्षमतेपेक्षा 50 टक्केच पर्यटकांना सामाजिक अंतर ठेवून बसवावे म्हणजे सहाऐवजी तीनच पर्यटकांना पर्यटनासाठी नेता येणार आहे. व्याघ्रप्रकल्पातील पावसाळी पर्यटन पूर्णपणे बंद करण्यात यावे. मात्र, बफरमध्ये पर्यटन सुरू करताना नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्याचेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tiger Tourism can Start