ऐकावे ते नवलच! म्हणे रेल्वेतून तंबाखूची तस्करी

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 20 June 2020

रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने शुक्रवारी तेलंगणा एक्‍स्प्रेसमधून झुप्या पद्धतीने आणण्यात आलेला सुगंधित तंबाखू जप्त केला. या प्रकरणी पार्सल एजंटला अटक करण्यात आली आहे.
 

नागपूर : गेल्या तीन महिन्यात कोरोनाच्या आक्रमणानंतर जीवनाचे अनेक निकष बदलले. आयुष्याचा पुन्हा एकदा आढावा घेण्याची वेळ अनेकांवर आली आहे, तरीही व्यसने मात्र कायम आहेत. उलट लूाकडाऊन काळात तंबाखू, तारू अशा गोष्टी अप्राप्य झाल्याने आता त्यांचा वापर अधिकच वाढला आहे. परिणामी त्याची चोरटी विक्री, तस्करी जास्त प्रमाणात सुरू झाल्याचे दिसते.

लॉकडाउनचे निकष शिथील झाल्याने जनजीवन पूर्वपदावर येत आहे. त्यासोबतच गुटखा, सुंगधित तंबाखू यासारख्या प्रतिबंधित साहित्याची तस्करीही सुरू झाली आहे. रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने शुक्रवारी तेलंगणा एक्‍स्प्रेसमधून झुप्या पद्धतीने आणण्यात आलेला सुगंधित तंबाखू जप्त केला. या प्रकरणी पार्सल एजंटला अटक करण्यात आली आहे.

विजय उपदेशे (42) रा. आंबेडकर कॉलनी, लष्करीबाग असे आरोपीचे नाव आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर देश लॉकडाऊन करण्यात आला. वाहतुकीचे सर्वच पर्यायही बंद होते. रेल्वेनेही पार्सल व मालगाड्या वगळता प्रवासी वाहतूक बंद ठेवली होती. अलिकडेच लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथीलता आणली गेली. मर्यादित स्वरूपात प्रवासी रेल्वेगाड्या चालविणे सुरू झाले. या गाड्यांना पार्सल डबेही जोडले जात असून त्यातून पार्सल वाहतूक सुरू आहे.

या संधीचा लाभ घेण्यासाठी तस्करही सरसावले आहेत. पार्सलच्या नावाखाली पॅकींगकरून प्रतिबंधित साहित्य पाठविणे सुरू झाले आहे. तेलंगणा स्पेशल एक्‍सप्रेसमधून सुगंधित तंबाखाची खेप येणार असल्याची माहिती पार्सल क्‍लर्ककडून आरपीएफला मिळाली होती. शुक्रवारी ही गाडी नागपूर स्थानकावर दाखल होताच आरपीएफच्या जवानांनी तपासणी सुरू केली. त्यात प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचे सहा डबे आढळून आले. लागलीच जवानांनी सुमारे 24 हजार रुपये किमतीचा 240 किलो तंबाखू जप्त केला.

सविस्तर वाचा - नागपुरात कोरोना सुसाट

हा माल दिल्लीहून रितसर बूक करण्यात आला असून नागपूरात खेप उतरवली जाणार होती. शुक्रवारी कारवाईनंतर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर खेप घेण्यासाठी येणाऱ्याची वाट बघण्यात येत होती. शनिवारी विजय हा माल घेण्यासाठी येताच त्याला ताब्यात घेण्यात आले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tobbaco smugling by railway