खाण पर्यटनाकडे पर्यटकांनी फिरवली पाठ, ही आहेत कारणे...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 जून 2020

गेल्या तीन वर्षांत सव्वा हजारपेक्षा अधिक पर्यटकांनी गोंडेगाव येथे भेट दिली. 2018-19 या वर्षात 257 पर्यटकांनी भेट दिली होती. यंदा फेब्रुवारी महिन्यापर्यंत 173 पर्यटकांनी खाण पर्यटनात सहभाग घेतला होता. पर्यटनाला जाण्यासाठी 16 जणांचा गट ही अट असल्याने अनेक जण तीन ते चार महिन्यांपासूनच बुकिंग करीत होते.

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "मन की बात'मध्ये उल्लेख केलेल्या देशातील पहिल्या खाण पर्यटनाकडे (माईन टूरिझम) पर्यटकांनी पाठ फिरवली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे त्यांच्या आनंदावर विरजण पडले. गेल्या सव्वातीन वर्षांत सव्वा हजारपेक्षा अधिक देश-विदेशातील पर्यटकांनी याला भेट दिली. यंदाही पर्यटकांचा ओढा वाढू लागला असताना टाळेबंदीमुळे अनेकांनी बुकिंग रद्द केल्याची माहिती पुढे आली आहे.

पर्यावरणपूरक खाण पर्यटन वेस्टर्न कोल फिल्डच्या सावनेरनजीकच्या गोंडेगाव येथे जमिनीखाली 300 फुटातील खाण पाहण्याची सुविधा महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्या पुढाकाराने सुरू करण्यात आली. कोळसा खाण आणि त्या परिसरातील नागरिक व कामगारांचे जीवनमान तसे खडतरच, त्यामुळे नेहमीच हा भाग दुर्लक्षित. नागपूर जिल्ह्यातील कोळसा खाणी व तेथील परिसरही त्याला अपवाद नाही.

मात्र, या पार्कच्या निमित्ताने का होईना आता या भागात पर्यटकांची रेलचेल वाढली होती. गेल्या तीन वर्षांत सव्वा हजारपेक्षा अधिक पर्यटकांनी येथे भेट दिली. 2018-19 या वर्षात 257 पर्यटकांनी भेट दिली होती. यंदा फेब्रुवारी महिन्यापर्यंत 173 पर्यटकांनी खाण पर्यटनात सहभाग घेतला होता. पर्यटनाला जाण्यासाठी 16 जणांचा गट ही अट असल्याने अनेक जण तीन ते चार महिन्यांपासूनच बुकिंग करीत होते. एमटीडीसीचे अधिकारी गट तयार झाल्यानंतर संबंधितांना कळवित होते.

हेही वाचा : तरुणासह विधवा महिलेने घेतले विष, चार दिवसांपासून होते बेपत्ता

सहा एकरांत माईन टूरिझम सर्किट
तब्बल सहा एकरात माईन टुरिझम सर्किट साकारले आहे. देशातील हे पहिलेच सर्वोत्कृष्ट इको फ्रेंडली माईन टूरिझम सर्किट म्हणून नावारूपाला आले. पार्कमध्ये घनदाट झाडे असून, त्यात दीड एकरात हिरवळ लावण्यात आली आहे. देशी झाडांचे व फुलांचे शेकडो प्रकार येथे बघायला मिळत असल्याने निसर्गप्रेमीही येथे भेट देत होते.वेकोलि सावनेरच्या भल्या मोठ्या खाणींमध्ये जे पाणी साचते त्याचा उपयोग या उद्यानाची हिरवळ कायम ठेवण्यासाठी केला आहे. सामान्यपणे कोळसा खाणीपासून दूरच बरे, असे म्हणणारे आता आपसूकच या उद्यानाकडे वळत आहेत.

बघा : वटपौर्णिमाही साजरी झाली घरी

लहान मुलांसाठी टॉय ट्रेन

सर्वसामान्यांना कोळसा खाणीत जाण्यास मनाई असते. नेमके हेच हेरून येथे भूमिगत माईन मॉडेल तयार केले आहे. यात शिरताच तुम्हाला खाणीत शिरल्याचा अनुभव येतो अन्‌ तेथील कार्याची माहिती मिळते. शिवाय, उद्यानात फिरण्यासाठी जॉगिंग ट्रॅक करण्यात आला आहे. लहान मुलांना मनोरंजनासाठी नॅरो गेज टॉय ट्रेनेच्या सवारीचा आनंद येथे घेता येतो.
धीरज गावंडे, पर्यटक

विदर्भासाठी गौरवास्पद

पूर्वी इको फ्रेंडली माईन टूरिझम सर्किट बघण्यासाठी विदेशात जावे लागायचे. मात्र, वेकोलिच्या पुढाकाराने आता आपल्या देशातच पहिला असा पार्क तयार करण्यात आला आहे. विदर्भासाठी हे उद्यान गौरवास्पद बाब आहे. या पर्यटनाला बुस्ट करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. एमटीडीसी आणि वेकोलिने गाईड उपलब्ध करून द्यावा आणि खासगी कंपन्यांकडे त्याचे संचालन दिल्यास खाण पर्यटन अधिक वाढेल.
आदित्य शेखर गुप्त, सहसचिव, विदर्भ टूरिझम असोसिएशन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tourists turned backs on mining tourism