'प्राचीन शास्त्राची परंपरा वैभवशाली, त्यात संशोधन व्हावे'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जून 2020

प्रो. पटवर्धन म्हणाले, संस्कृत भाषेतील मूळ ज्ञान, भारतीय विचाराची आभा, तत्त्वज्ञानाची बैठक, सापेक्ष दृष्टी, मूळ ज्ञानप्रणालीतील मोकळेपणा, गुरुकुलातील शिस्त आणि बहुविद्याशाखीय शिक्षण या आपल्या मूळ बैठकीसह नव्या युगातील तंत्रास्नेही शिक्षण आणि आंतरविद्याशाखीय विषय यांचाही अंगिकार करणे आवश्‍यक आहे. आगामी भविष्यकाळ हा संमिश्र शिक्षणाचा आहे. त्याचा विचार करून भविष्यातील अभ्यासक्रम तयार केले पाहिजेत यावरही त्यांनी भर दिला.

नागपूर : प्राचीन भारतीय शास्त्र परंपरा वैभवशाली असून, हेच शास्त्र भविष्यातील विज्ञान तंत्रज्ञानास उपकारक, मार्गदर्शक कसे ठरतील, यावर संशोधन झाले पाहिजे, असे प्रतिपादन विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष प्रो. भूषण पटवर्धन यांनी केले. 

कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ आणि युजीसी इन्फ्लिबनेट सेंटर गांधीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने "इ-कन्टेंट डिझाईन, डेव्हलपमेंट ऍन्ड डिलीव्हरी' या विषयावरील ऑनलाईन राष्ट्रीय प्राध्यापक विकास कार्यक्रमांच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. ऑनलाइन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रो. श्रीनिवास वरखेडी तर प्रमुख पाहुणे म्हणून गांधीनगर येथील युजीसी इन्फ्लिबनेट सेंटरचे संचालक प्रो. जे. पी. सिंग जूरेल, आयक्‍यूएसी संचालक प्रो. नंदा पुरी उपस्थित होते. 

केव्हा होणार आरटीईचे प्रवेश....वाचा 

प्रो. पटवर्धन म्हणाले, संस्कृत भाषेतील मूळ ज्ञान, भारतीय विचाराची आभा, तत्त्वज्ञानाची बैठक, सापेक्ष दृष्टी, मूळ ज्ञानप्रणालीतील मोकळेपणा, गुरुकुलातील शिस्त आणि बहुविद्याशाखीय शिक्षण या आपल्या मूळ बैठकीसह नव्या युगातील तंत्रास्नेही शिक्षण आणि आंतरविद्याशाखीय विषय यांचाही अंगिकार करणे आवश्‍यक आहे. आगामी भविष्यकाळ हा संमिश्र शिक्षणाचा आहे. त्याचा विचार करून भविष्यातील अभ्यासक्रम तयार केले पाहिजेत यावरही त्यांनी भर दिला. ई-कन्टेन्ट विषयावरील प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करून संस्कृत विद्यापीठे या नवतंत्राज्ञानयुगात मागे नाहीत हे सिद्ध झाले आहे. संस्कृत प्राध्यापकांना तंत्रस्नेही होण्याची गरज असून, याद्वारे नवीन युगात स्वतःला सिद्ध करावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी प्रो. जूरेल यांनीही विचार मांडले. कुलगुरू प्रो. श्रीनिवास वरखेडी यांनी पारंपरिक वर्गखोली आता ग्लोबल क्‍लासरुम झाल्याचे सांगून ही नवीन संकल्पना शिक्षकांना महत्त्व न देता अध्ययन प्रक्रियेला महत्त्व देणारी असल्याचे विषद केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. पराग जोशी यांनी आयक्‍यूएसी समन्वयक प्रो. कविता होले यांनी आभार मानले. देशभरातून विविध विद्यापीठांचे कुलगुरू, प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी या प्रशिक्षणाला उपस्थित आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The tradition of ancient science is glorious, it should be researched