कोरोनाच्या नानाची टांग, आम्ही नटणारच! श्रावणात महिलांचा ‘नऊवारीचा नखरा’

ready-made-nauvari-saree
ready-made-nauvari-saree

नागपूर : मधल्या काळात नेसायला आणि आवरायला कठीण म्हणून फारशी नेसली न जाणारी नऊवारी साडी पुन्हा ट्रेंडमध्ये आली आहे.
लॉकडाऊन आणि कोरोनामुळे घराबाहेर पडता येत नसले तरी, घरच्या घरी थाटात नटून थटून श्रावणातील प्रत्येक सण साजरा करण्यास महिलांनी प्राधान्य दिले आहे. त्यासाठी नऊवारी साडी, पारंपरिक नथ आणि महाराष्ट्रीयन साज करून, सेल्फी काढण्यास महिलांनी पसंती दिली आहे.

कोणताही महाराष्ट्रीयन सण म्हटला अथवा महाराष्ट्रीयन लग्न म्हटलं की समोर चित्र उभं राहतं ते नऊवारी साडीचं. नऊवारी साडी ही महाराष्ट्रीयन स्त्रीची शान आहे. मराठी नवं वर्ष गुढीपाडवा, मंगळागौर, गणपती, नवरात्री असा कोणताही सण असला की, यात अगदी लहान मुलींपासून ते मोठ्या महिलांपर्यंत सर्वजणी नऊवारी साड्यांमध्ये सजूनधजून बाहेर पडलेल्या दिसतात. अगदी सण असो वा लग्न महाराष्ट्राच्या परंपरेत नऊवारी साडीला खूपच महत्त्व आहे. अर्थात या नऊवारी साड्या नेसण्याचेही अनेक प्रकार आहेत. हल्ली नऊवारी साडी नेसवण्याची पद्धत फारच कमी जणांना माहीत असते. तर काही जणी नऊवारी साड्या शिऊनही घेतात. त्यामुळे नऊवारी साडी शिवण्याचा अनेकांनी व्यवसाय सुरु केला आहे. यातून अनेक महिला रोजगार मिळवत आहे.

सात प्रकारच्या नऊवारी
नऊवारी नेसायची म्हणजे एखाद्या आजीबाईंनाच गाठावे लागते. ती नेसायला तशी अवघडच. पण काही सणांना आणि धार्मिक विधींना आता हमखास नऊवारी नेसली जाते. तरुणींमध्ये नऊवारीची क्रेझ आहे. त्यामुळे रेडीमेड नऊवारीला चांगले दिवस आले आहेत. ब्राह्मणी, पेशवाई ब्राह्मणी, झिकझॅक पेशवाई, शाही मस्तानी, लावणी स्टाईल, मराठमोळी आणि राजलक्ष्मी या ७ प्रकारच्या नऊवारी साड्या सध्या उपलब्ध आहेत. ब्राह्मणी साडीला सलवारवर आचा, मराठमोळ्या नववारीला दोन्ही पायावर घोळ, लावणीच्या साडीला दोन्ही बाजूला काष्टा, झिकझॅकला साईडला निऱ्या असतात.

नऊवारी शिवणकामातून रोजगार
सध्या नऊवारी साडीला मोठ्या प्रमाणावर मागणी वाढते आहे. त्यातच अनेकांना नऊवारी नेसता येत नसल्याने रेडिमेड नऊवारीला पसंती देतात. आपल्याला आवडेल त्या साडीची आणि हव्या त्या पॅटर्नची नऊवारी महिलानांना अधिक पसंत असल्याने महिला नऊवारी शिवण्यावर अधिक भर देत आहे. त्यामुळे अनेक महिलांनी याचे शिक्षण घेतले असून यातून रोजगार मिळवत आहे. साधारणपणे मोठ्या महिलांच्या नऊवारी या ५०० ते १२०० रुपयांना तर लहान मुलींच्या २०० ते ६०० रुपयांना शिवून मिळतात.

संपादन - स्वाती हुद्दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com