वाघिणीच्या मृत्यूचे लवकरच उलगडणार सत्य

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020

देवलापार वनपरिक्षेत्रात मरण पावलेल्या वाघिणीचा मृतदेह मध्यप्रदेशात नेऊन टाकण्याच्या कारणावरुन वनमजूर धामसिंह खंडाते याला मध्यप्रदेशातील वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अटक केली होती. दरम्यान, एका वनाधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार मरण पावलेल्या वाघिणीला खवासा बीटमध्ये नेऊन टाकण्याचे निर्देश दिल्याचे त्याने चौकशी त सांगितल्याचे उघड झाले आहे.

नागपूर : मध्यप्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्पातील टी 19 (शर्मीली) या वाघिणीच्या मृत्यू प्रकरणात देवलापार येथील वनरक्षकाला मध्यप्रदेश वनविभागाने ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे. याची सत्यता तपासण्यासाठी कागदपत्रे ताब्यात घेण्यासाठी रामटेकचे सहाय्यक वनसंरक्षक संदीप गिरी मध्यप्रदेशाकडे रवाना झाले आहेत. मात्र, तपास अधिकारी सुटीवर असल्याने कागदपत्रे अद्याप प्राप्त झाले नसल्याची माहिती आहे.

अवश्य वाचा - निघाला होता शाळेत; रस्त्यात ट्रकखाली सापडला

देवलापार वनपरिक्षेत्रात मरण पावलेल्या वाघिणीचा मृतदेह मध्यप्रदेशात नेऊन टाकण्याच्या कारणावरुन वनमजूर धामसिंह खंडाते याला मध्यप्रदेशातील वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अटक केली होती. दरम्यान, एका वनाधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार मरण पावलेल्या वाघिणीला खवासा बीटमध्ये नेऊन टाकण्याचे निर्देश दिल्याचे त्याने चौकशी त सांगितल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे नागपूर उपवनसंरक्षकांनी या प्रकरणांची गांभिर्याने दखल घेतली. तातडीने सहाय्यक वनसंरक्षक गिरी यांना मध्यप्रदेशात पाठविले. तपासाची सर्वच कागदपत्रे घेऊन येण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर पुढील तपासाला गती मिळणार आहे. त्यातून वाघिणीच्या मृत्यू नेमका कुठे झाले हे सत्य उघड होईल. वनमजुरांनी सांगितल्याप्रमाणे हे प्रकरण खरे ठरले तर महाराष्ट्राच्या वन विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्‍नचिन्ह उभे होणार आहे. तसेच मानही शरमने खाली जाणार आहे.

या प्रकरणात उपवनसंरक्षकांनी वन परिक्षेत्र अधिकारी परिहार आणि वनपाल खान यांचे म्हणणे नोंदवून घेतले आहे. दरम्यान, खान यांनीही वनमजुराने सांगितलेल्या गोष्टीला दुजोरा दिल्याची माहिती आहे. यावरुन या प्रकरणात नेमका आरोपी कोण हे कागदपत्रे मिळाल्यानंतर आणि वनमजुराचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर पुढे येणार आहे. वनाधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी एका वनाधिकाऱ्यांकडून प्रयत्नही केले जात असल्याची माहिती पुढे येऊ लागली आहे. यामुळे राज्यातील वनाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्‍न चिन्ह उभे ठाकले जाणार आहे.

दोषींवर कारवाई होणार

देवलापार वन परिक्षेत्रात मरण पावलेल्या वाघिणीला मध्यप्रदेशात नेऊन टाकल्याची माहिती माध्यमातूनच कळाली. मध्यप्रदेश वन विभागाकडून याबाबत अद्यापही कोणतीही विचारणा झालेली नाही. मात्र, वनरक्षकाला अटक केल्याने त्याचे गांभीर्य लक्षात घेता सहाय्यक वनसंरक्षक संदीप गिरी यांना मध्यप्रदेशात कागदपत्रे आणण्यासाठी पाठविलेले आहे. परंतु, तेथील तपास अधिकारी सुटीवर असल्याने कागदपत्रे मिळण्यासाठी तीन ते चार दिवस लागतील. कागदपत्रे मिळाल्यानंतर तपास करुन सत्य शोधण्यात येईल. दोषी आढळल्यास संबधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल.
-डॉ. प्रभूनाथ शुक्‍ल, उपवनसंरक्षक, नागपूर

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The truth of Wagheini's death will soon be revealed