संतापजनक... शेतकरी महिलेला विवस्त्र करण्याचा प्रयत्न; साडी खेचतानाचे केले चित्रीकरण

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 25 June 2020

सावकाराने संबंधित महिलेच्या मागे पैसे परत मागण्यासाठी तगादा लावला होता. मात्र, जवळ पैसेच नसल्याने ती टाळत होती. त्यामुळे सावकार व त्याची पत्नी महिलेच्या शेतात धडकले. सावकाराच्या पत्नीने तिला मारहाण केली एवढेच नव्हे तर तिची साडी ओढण्याचा प्रयत्न केला.

नागपूर : अवैध सावकारी करणाऱ्या सावकाराने एका शेतकरी महिलेला शिवीगाळ करण्याचा तर त्याच्या पत्नीने तिची साडी खेचण्याचा प्रयत्न केल्याचा संतापजनक प्रकार नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्‍यातील वाकेश्‍वर येथे घडला. शेतकरी महिलेची बेअब्रू होत असताना सावकाराने त्याचे व्हिडिओ चित्रीकरण केले. ते समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याने राज्यभर खळबळ उडाली आहे. 

भाजपतर्फे माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि दोषीवर तत्काळ कारवाई करावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. विशेष म्हणजे आघाडी सरकारच्या काळात अवैध सावकारांना कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढण्याची घोषणा केली होती. मात्र, वाकेश्‍वर येथील घटनेमुळे अवैध सावकारी सर्रासपणे सुरूच असल्याचे दिसून येते.

हेही वाचा - पत्नीने पतीच्या प्रेयसीच्या वेण्या पकडून केली धुलाई; पर्समध्ये होत्या आक्षेपार्ह वस्तू...

सावकाराने संबंधित महिलेच्या मागे पैसे परत मागण्यासाठी तगादा लावला होता. मात्र, जवळ पैसेच नसल्याने ती टाळत होती. त्यामुळे सावकार व त्याची पत्नी महिलेच्या शेतात धडकले. सावकाराच्या पत्नीने तिला मारहाण केली एवढेच नव्हे तर तिची साडी ओढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे घाबरून महिला शेतातून पळून गेली. मंगळवारी हा प्रकार घडला. या घटनेचे व्हिडिओ व्हायरल झाल्याने उपनिबंधकांनी चौकशीचे आदेश दिले आहे. 

सखोल चौकशी करण्याची मागणी

महिलेला विवस्त्र करण्याच्या प्रकरणाचे पडसाद जिल्हाभर उमटत असतानाच या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर त्वरित कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्ष जिल्ह्यातर्फे करण्यात आली आहे. माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात हे शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना भेटले व आपले निवेदन त्यांना दिले. त्यात महिलेची धिंड काढण्यात आली असल्याचे म्हटले आहे.

अधिक माहितीसाठी - प्रेयसीच्या घरातच प्रियकर होता महिनाभर लपून, काय असावे कारण?

राजकीय कार्यकर्ते गुंतलेले!

सत्ताधारी पक्षातील राजकीय कार्यकर्ते या प्रकरणात गुंतले असण्याची शक्‍यता लक्षात घेता दोषींवर तातडीने कठोर ककारवाईची मागणी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांनाही निवेदन देण्यात आले. याप्रसंगी बावनकुळे यांच्यासोबत जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये, आ. सागर मेघे, आ. अनिल सोले, आ. गिरीश व्यास, डॉ. राजीव पोतदार, माजी आ. सुधीर पारवे, आ. सावरकर, माजी आ. मल्लिकार्जुन रेड्डी, माजी आ. अशोक मानकर, किशोर रेवतकर, अनिल निधान, चरणसिंग ठाकर, रमेश मानकर, अशोक धोटे, हर्षल हिंगणेकर आदी उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Trying to undress a woman for money