आयुक्त तुकाराम मुंढेंच्या संयमाने अनेकांना आश्‍चर्य 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जून 2020

"निंदकाचे घर असावे शेजारी' असे संतांनी म्हटले आहे. आज अगदीच जवळून स्वतःची निंदा ऐकत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मोठा संयम दाखविला.

नागपूर : शनिवारी सदस्यांच्या शेरेबाजीमुळे रागाच्या भरात काही सेकंदात सभागृह सोडून निघून गेलेले आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज दिवसभर सदस्यांचे टीकास्त्र सहन केले. काही सदस्यांनी जहरी टीका केल्यानंतरही ते केवळ टिपण लिहून घेत होते. एकूणच दिवसभरातील त्यांच्या संयमाने अनेकांना आश्‍चर्यात टाकले. 

"निंदकाचे घर असावे शेजारी' असे संतांनी म्हटले आहे. आज अगदीच जवळून स्वतःची निंदा ऐकत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मोठा संयम दाखविला. शनिवारी सभागृहातील सभात्याग नाट्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे सभागृहात येतील की नाही, याबाबत शंका व्यक्त केली जात होती. आज सभागृह सुरू होताच, त्यांनी सभागृहात "एन्ट्री' घेतली. त्यानंतर सायंकाळपर्यंत ते बसून होते. 

क्लिक करा - पावसाळ्याच्या दिवसांत मुलांना सांभाळा, उघडकीस आली ही धक्‍कादायक घटना...
 

स्थगन प्रस्तावावर चर्चेदरम्यान अनेक सदस्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. अनेकांनी तर त्यांच्यामुळे नगरसेवक वाईट होत असल्याचे सांगितले. त्यांच्यामुळे दीडशे वर्षे जुनी महापालिका बदनाम होत असल्याचे टोलेही काहींनी हाणले. सर्वांशी मिळून काम करावेच लागेल, अशा शब्दातही आयुक्तांवर काहींनी तोंडसुख घेतले. मात्र, शनिवारी एका शेरेबाजीने रागाने निघून जाणारे आयुक्त मुंढे यांनी आज संयम दाखवून सभेच्या कामाकाजात भाग घेतला. यावेळी त्यांनी प्रत्येकाकडून आलेल्या सूचना, टीकाही लिहून घेतल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tukaram mundhe bore critic whole day