तुकाराम मुंढेंचा दणका : फडणवीस यांच्या कार्यकाळातील कर्मचाऱ्यांना केले पुन्हा बडतर्फ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 जून 2020

महापालिकेतील नियुक्ती घोटाळा चांगलाच गाजला होता. या नियुक्तीत मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याच्या तक्रारींची दखल घेऊन तत्कालीन आयुक्त टी. चंद्रशेखर यांनी तत्कालीन अतिरिक्त आयुक्त अडताणी यांची एक सदस्यीस चौकशी समिती नेमली होती. समितीच्या अहवालावरून तब्बल 108 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले होते.

नागपूर : महापालिकेने बडतर्फ केलेल्या मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात राज्य सरकारच्या विनंतीवरून पुन्हा सेवेत घेतलेल्या एकूण बारा कर्मचाऱ्यांना महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पुन्हा बडतर्फ केले. सर्वांची पुनर्नियुक्ती योग्य मार्गाने झाल्याचा सबळ पुरावा आढळला नाही. तसेच न्यायालयाच्या आदेशाच्या विपरित असल्याने बडतर्फ करण्यात येत असल्याचे आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे. 

महापालिकेतील नियुक्ती घोटाळा चांगलाच गाजला होता. या नियुक्तीत मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याच्या तक्रारींची दखल घेऊन तत्कालीन आयुक्त टी. चंद्रशेखर यांनी तत्कालीन अतिरिक्त आयुक्त अडताणी यांची एक सदस्यीस चौकशी समिती नेमली होती. समितीच्या अहवालावरून तब्बल 108 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले होते. या निर्णयास उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यानंतर 17 कर्मचाऱ्यांना वगळून इतरांना परत सेवेत सामावून घेण्यात आले होते.

हेही वाचा - मुंबईतून निसर्ग वादळ जात नाही तोच दुसरं मोठं राजकीय वादळ

शिल्लक कर्मचाऱ्यांपैकी काहींनी अर्जच केले नव्हते. अर्जात खोडतोड होती तर काहींनी मुलाखतीसुद्धा दिल्या नसल्याचे आढळले होते. त्यामुळे त्यांना घेण्यास नकार देण्यात आला होता. तसेच निवड समितीतील सदस्यांचे नातेवाईक असल्याचाही ठपका ठेवण्यात आला होता. तेव्हापासून उर्वरित कर्मचारी आम्हालाही नोकरीत सामावून घ्यावे यासाठी सातत्याने संघर्ष करीत होते. 

सुभाष घाटे यांच्या नेतृत्वात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना रामगिरीवर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचाही प्रयत्न केला. त्यानंतर दटके समिती स्थापन करण्यात आली होती. सर्वांना मानवतेच्या दृष्टिकोनातून सामावून घ्यावे अशी शिफारस केली होती. त्यानुसार राज्य सरकारने महापालिकेला विनंती केली होती. त्यानुसार 15 कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत सामावून घेण्यात आले होते. यानंतर दोन कर्मचारी सेवानिवृत्त झाले तर एकाच मृत्यू झाला. उर्वरित बारा कर्मचाऱ्यांनी वेतन निश्‍चितीसाठी आयुक्तांकडे विनंती केली होती. 

सर्वांना मागितला होता खुलासा

तुकाराम मुंढे यांच्याकडे वेतन निश्‍चितीची फाईल येतात त्यांनी सर्वांना तुमची नियुक्ती योग्य मार्गाने झाली नाही नसल्याचे सांगून सर्वांना खुलासा मागितला होता. त्यानुसार 28 मे रोजी सर्वांनी खुलासा केला होता. मुंढे यांनी अडताणी समितीचा अहवाल, न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देऊन योग्य मार्गाने नियुक्ती झाल्याचा सबळ पुरावा नसल्याचे सांगून सर्वांना परत बडतर्फ केले.

अधिक माहितीसाठी - तिचा मृतदेह रुग्णवाहिकेतून काढत घराच्या अंगणात ठेवला अन्‌ रडत रडत पळून गेला...

बडतर्फ केलेले कर्मचारी

बडतर्फ करण्यात आलेल्या 12 कर्मचाऱ्यांमध्ये सुभाष घाटे, मोहम्मद युसूस, दीपक पोटफोडे, प्रकाश बरडे, विनायक पेंडके, जीवक श्‍यामकुळे, गंगाधर भिवगडे, शालू खोपडे-गिरडे, अरुण खोपडे, रत्नाकर धोटे, विजय हटवार, सुरेश बर्वे यांचा समावेश आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tukaram Mundhe fired twelve employees of the nmc