esakal | महापालिकेवर तुकाराम मुंढेचे वर्चस्व कायम! सत्ताधाऱ्यांमध्ये अद्यापही संताप, नव्या आयुक्तांकडून निर्णयाची अंमलबजावणी
sakal

बोलून बातमी शोधा

tukaram mundhe impression remains same on nagpur municipal corporation

महापौर दयाशंकर तिवारी स्थायी समिती अध्यक्ष असताना त्यांनी गरीबांच्या मुलींसाठी लाडली लक्ष्मी योजना आणली होती. मुंढे यांनी ही योजनाही थंडबस्त्यात टाकण्याचे काम केले.

महापालिकेवर तुकाराम मुंढेचे वर्चस्व कायम! सत्ताधाऱ्यांमध्ये अद्यापही संताप, नव्या आयुक्तांकडून निर्णयाची अंमलबजावणी

sakal_logo
By
राजेश प्रायकर

नागपूर : तुकाराम मुंढे यांनी घेतलेल्या निर्णयावरच गुरुवारी झालेली महापालिकेची सभा गाजली. सत्ताधारी अजूनही त्यांच्या नावाने संताप व्यक्त करीत आहेत, तर आयुक्त राधाकृष्णन बी. त्यांनी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करीत आहेत. मुंढे पाच महिन्यांपूर्वी नागपुरातून गेले. परंतु, अद्यापही महापालिकेवर त्यांचे गारूड कायम असल्याचे चित्र आहे. 

महापालिकेचे सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने गुरुवारी पार पडली. या सभेत तुकाराम मुंढे यांनी नागपूरकरांसाठी तयार केलेले नागपूर लाईव्ह अ‌ॅप असो की लाडली लक्ष्मी योजनेसंदर्भात त्यांनी घेतलेला निर्णय असो, यावरच सभेत चर्चा झाली. त्यांनी नासुप्रकडून महापालिकेकडे घेतलेल्या ७० उद्यानांच्या निर्णयावरही टीका झाली. या मुद्द्यांवर बोलताना सत्ताधारी बाकावरील नगरसेवकांनी मुंढे यांच्यावर तोंडसुख घेतले. त्यामुळे जून महिन्यात पाच दिवस चाललेल्या सभेची अनेकांना आठवण झाली. जूनमध्ये पाच दिवस मुंढेंवर सत्ताधाऱ्यांनी हल्ला चढविला होता. मुंढेंच्या जागेवर आयुक्त राधाकृष्णन बी. होते. परंतु, सत्ताधाऱ्यांनी मुंढेंनाच लक्ष्य केले. तत्कालीन महापौर संदीप जोशी यांनी तयार केलेले महापौर अ‌ॅप व तत्कालीन आयुक्त मुंढे यांनी तयार केलेले नागपूर लाईव्ह अ‌ॅपवरून महापौर दयाशंकर तिवारी यांनी एकच अ‌ॅप ठेवण्याचे निर्देश दिले. यावेळी आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी नागरिकांसाठी किती अ‌ॅप असावे हा प्रशासनाचा मुद्दा असल्याचे नमुद करीत सत्ताधाऱ्यांना प्रत्युत्तर दिले.

हेही वाचा - बापरे! मुख्याध्यापिकेसह १६ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण, शाळा बंद

महापौर दयाशंकर तिवारी स्थायी समिती अध्यक्ष असताना त्यांनी गरीबांच्या मुलींसाठी लाडली लक्ष्मी योजना आणली होती. मुंढे यांनी ही योजनाही थंडबस्त्यात टाकण्याचे काम केले. जुलै २०२० पासून या योजनेंतगर्त नवीन लाभार्थ्यांची नोंद बंद करण्यात आली होती. यावर चर्चेदरम्यान ज्येष्ठ सदस्य व आमदार प्रवीण दटके यांनी योजना कशा बंद करायच्या, एवढेच मुंढे यांचे काम होते, असा आरोप केला. महापौर तिवारी यांनी ही योजना पूर्ववत सुरू ठेवण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. यावर आयुक्तांनीही मुंढे यांची बाजू लावून धरली. यापेक्षा चांगल्या पर्यायी योजनेवर काम सुरू असल्याचे नमुद करीत आयुक्तांनी मुंढे यांच्या निर्णयाचे एकप्रकारे समर्थनच केले. नासुप्रकडून महापालिकेला हस्तांतरित करण्यात आलेल्या ७० उद्यानांचा निर्णयही सभागृहात रद्द करण्यात आला. महापौर तिवारी यांनी हे उद्यान नासुप्रला परत करण्याचे निर्देश दिले. 

हेही वाचा - राकेश टिकैत यांना पोलिस अधीक्षकांच्या नावाने 'फेक कॉल', अखेर यवतमाळातील सभा...

सोशल मीडियावरही मुंढेंच्या नावाने बोंब - 
दक्षिण-पश्चिम नागपुरातील एका नगरसेवकाने शुक्रवारी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून मुंढे यांच्या नावाने बोंब ठोकली. मागील वर्षी एक आयुक्त आले होते, त्यांच्या चुकीच्या निर्णयामुळे प्रभागातील अनेक वस्त्यांतील सिवेज लाईनची समस्या निर्माण झाली होती, अशी पोस्ट या नगरसेवकाने फेसबुकवर टाकली आहे. प्रशासनासोबत संघर्षानंतर आता सिवेज लाईनच्या कामाला मंजुरी मिळाली असून यात आता अडथळा येणार नाही, अशी अपेक्षा या नगरसेवकाने व्यक्त केली आहे. 
 

go to top