
राकेश टिकैत यांच्यासह राष्ट्रीय शेतकरी नेते आझाद मैदानावर 20 फेब्रुवारीला दुपारी 1 वाजता किसान महामेळाव्याला संबोधित करणार होते. मात्र, त्यांची ही सभा आता रद्द करण्यात आली आहे.
यवतमाळ : संयुक्त किसान मोर्चाचे राष्ट्रीय नेते राकेश टिकैत यांची सभा आज शनिवारी (ता. २०) यवतमाळ येथे होणार होती. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विनंतीस मान देत टिकैत यांनी सभा रद्द केल्याची माहिती संदीप गिड्डे पाटील यांनी रात्री उशिरा दिली. तसेच यामागे फार मोठे षडयंत्र असल्याचा आरोपही गिड्डे पाटील यांनी केला आहे.
हेही वाचा - कार्यक्रम रद्द, मग शाळा-महाविद्यालये सुरू का? पालकांचा सवाल; प्रशासनाला गांभीर्य कळेना
राकेश टिकैत यांच्यासह राष्ट्रीय शेतकरी नेते आझाद मैदानावर 20 फेब्रुवारीला दुपारी 1 वाजता किसान महामेळाव्याला संबोधित करणार होते. मात्र, त्यांची ही सभा आता रद्द करण्यात आली आहे. याबाबतचे वृत्त ई-सकाळला प्रसिद्ध होताच गिड्डे पाटील यांनी सभा रद्द होण्याचा संपूर्ण घटनाक्रम कथन केला. ते म्हणाले की, टिकैत यांची सभा रद्द होण्यामागे फार मोठे षडयंत्र आहे. त्यांना यवतमाळातून कोणीतरी एसएसपीच्या नावाने फोन केला. तसेच यवतमाळला आले तर 14 दिवस क्वारंटाइन करण्यात येईल असे सांगितले. गाजीपूर येथे सुरू असलेले आंदोलन प्रभावित होऊ नये म्हणून टिकैत यांनी सभेला येता येणार नाही, असे आयोजकांना कळविले. दरम्यान, आयोजकांनी यवतमाळचे पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी टिकैत यांना फोनच केला नसल्याचे सांगितले. त्यामुळे टिकैत यांचा यवतमाळ दौरा रद्द करण्यामागे षडयंत्र रचले गेल्याचे गिड्डे पाटील यांनी सांगितले. त्यांनी याबाबत शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कळविले. मुख्यमंत्र्यांनी स्वतः टिकैत यांना फोन करून महाराष्ट्रातील आघाडी सरकार शेतकरी आंदोलनाच्या बाजूने असून राज्यात सध्या कोरोना वाढत असल्याने सभा रद्द करावी असे आवाहन केले. मुख्यमंत्र्याच्या शब्दाला मान देऊन टिकैत यांनी आपला दौरा रद्द केला असून ते कोरोनाला घाबरले नसल्याचेही गिड्डे पाटील यांनी स्पस्ट केले.
हेही वाचा - सावधान! आठ दिवसांत ४ हजार रुग्णांची वाढ, नव्याने साडेसातशे बाधित; मृत्यूही वाढले
दरम्यान, यवतमाळ येथील महामेळाव्याची तयारी पूर्ण झाली होती. कोरोनाच्या संदर्भाने काही अडचणी असल्या तरी नियमांच्या अधीन राहून ही सभा होणार असल्याने शेतकऱ्यांनी सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन संयुक्त किसान मोर्चाचे नेते संदीप गिड्डे पाटील तसेच श्रीकांत तराळ यांनी केले होते. सिकंदर शहा यांनी दिवसभर या संदर्भात सभेची तयारी केली होती. ही सभा ऑनलाईन घेण्याची तयारी सुद्धा आयोजकांची होती. रात्री उशिरापर्यंत देशाच्या अनेक भागातील शेतकरी नेते नागपूरला पोहोचल्याचेही गिड्डे पाटील यांनी सांगितले. परंतु, ही सभा रद्द झाल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत, तर विरोधकांच्या आनंदाला उधाण आल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
हेही वाचा - ब्रेकिंग: शेतकरी नेते राकेश टिकैत यांची यवतमाळमधील सभा अखेर रद्द; शेतकरी...
शेतकरी नेते राकेश टिकैत यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोन करून सभा रद्द करण्याचे आवाहन केले. त्यांच्या शब्दाला मान देऊन टिकैत यांनी सभेला न येण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच टिकैत यांना फेक कॉल करून त्यांना सभेस येण्यापासून रोखण्याचाही प्रयत्न झाला आहे. त्यामुळे या षडयंत्राची चौकशी करण्यात येईल.
-संदीप गिड्डे पाटील, आयोजक, संयुक्त किसान मोर्चा.