अरे भाऊ...तुकाराम मुंढे आहेत ते! जरा कडक सॅल्युट मार...

tukaram
tukaram

नागपूर : कर्तव्यदक्ष आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी काल नागपूर महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर, थेट कामकाजाला सुरुवात केली आहे. तुकाराम मुंढे काल साडेनऊच्या ठोक्‍याला कार्यालयात दाखल झाल्यानंतर कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली. आजही आयुक्त मुंढे 9.40 ला कार्यालयात आले. आयुक्त तुकाराम मुंढे यांचा दरारा मनपा कर्मचाऱ्यांमध्ये आहेच, मात्र सुरक्षा रक्षकांमध्येही दरारा पाहायला मिळाला. कारण आयुक्त तुकाराम मुंढे यांना सॅल्यूट कसा करायचा, याबाबतचं प्रशिक्षण मनपाचे सुरक्षा कर्मचारी घेत होते.
नवीन भरती झालेल्या सुरक्षा रक्षकांना जुन्या सहकाऱ्यांनी मुंढे यांना सॅल्यूट कसा करायचा याचं प्रशिक्षण दिलं. आयुक्त आल्यानंतर प्रथम काय करायचं, कसं उभं राहायचं, सॅल्युट कसा करायचा, याबाबतचं प्रशिक्षण जुन्या सहकाऱ्याने नव्या सहकाऱ्याला दिलं.

तुकाराम मुंढे यांचा आजचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशीही दिवसभर बैठकांचं सत्र चालू आहे. तुकाराम मुंढे आज दिवसभरात सहा बैठका, सात विविध कामांचा आढावा घेणार आहेत. त्यानंतर आज संध्याकाळी 4 ते 5 दरम्यान नागपुरात तुकाराम मुंढे यांचा पहिला जनता दरबार असेल.
पहिल्या दिवसाचं कामकाज
कडक शिस्तीचे आणि कर्तव्यदक्ष आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी काल नागपूर महापालिकेचे आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला. सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी महापालिकेच्या मुख्यालयात दाखल होत, तुकाराम मुंढेंनी महापालिकेचा कार्यभार हाती घेतला. पहिल्याच दिवशी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत त्यांनी बैठक घेतली. महत्त्वाचं म्हणजे तुकाराम मुंढे हे आयुक्तपदी येणार असल्याच्या बातमीनंतरच, नागपूर मनपाचे कर्मचारी वेळेत येण्यास सुरु झाले. मात्र कालचा योगायोग म्हणजे कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी वापरात येणाऱ्या पंचिंग मशीनमध्ये बिघाड झाल्याने, कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली.
नियमबाह्य कामे केल्यास खबरदार
ध्येयवेडे व धडाडीने काम करणारे आयुक्त अशी राज्यभर ख्याती असलेले तुकाराम मुंढे यांनी कार्यभार स्वीकारताच, नियमाने कामे करण्याचे निर्देश देत अधिकाऱ्यांना तंबीच दिली. एवढेच नव्हे तर नीटनेटकेपणाने राहण्याचा, वागण्याचा सल्लाही दिला.
गेल्या सहा दिवसांपासून आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यभार स्वीकारण्याबाबत रहस्य होते. त्यांची बदली रद्द झाल्याचीही अफवा होती. मात्र, काल सकाळी 9 वाजताच त्यांनी महापालिका गाठली. साडेनऊ वाजता त्यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी लगेच विभागप्रमुखांची बैठक घेतली. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नियमानुसार आपली कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या ओळखून कामे करावीत, असे निर्देश त्यांनी बैठकीत दिले. ते येणार असल्याची माहिती मोजक्‍याच अधिकाऱ्यांना होती. त्यामुळे अनेकजण दहानंतर कार्यालयात पोहोचले. आयुक्तांनी कार्यभार स्वीकारल्याचे समजताच अनेकजण धावत पळत पालिकेत आले. विभागप्रमुखांच्या बैठकीनंतर त्यांनी काल महामेट्रोच्या लोकार्पण समारंभात हजेरी लावली. लोकार्पणानंतर ते पुन्हा महापालिकेत आले. दिवसभर सर्व विभागाच्या विभागप्रमुखांसमवेत त्यांनी बैठक घेतली. बैठकांचे सत्र दिवसभर सुरू होते.
दाढी, वेशभूषेवरही करडी नजर
आयुक्त मुंढे यांना काही अधिकाऱ्यांची दाढी वाढलेली दिसून आली. त्यांनी नियमित दाढी व कार्यालयाला शोभून दिसेल, अशी वेशभूषा करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे आता अनेकांना दररोज दाढी करावी लागणार असून कपड्यांवरही विशेष लक्ष द्यावे लागणार असल्याची चर्चा पालिका वर्तुळात रंगली.

दररोज घेणार जनता दरबार
आयुक्त मुंढे दररोज जनता दरबार घेणार आहेत. समस्या आणि तक्रारींसह नागरिकांना कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दुपारी 4 ते सायंकाळी 5 या वेळेत आयुक्तांना भेटून गाऱ्हाणे मांडता येईल. कुठलीही अडचण असल्यास नागरिकांनी जनता दरबाराच्या नियोजित वेळेत येण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

आयुक्त म्हणून तिसरी मनपा
आयुक्त तुकाराम मुंढे हे नागपुरात रुजू होण्यापूर्वी राज्य एड्‌स नियंत्रण प्रकल्पाचे संचालक म्हणून कार्यरत होते. 2005 च्या तुकडीचे सनदी अधिकारी असलेले तुकाराम मुंढे यांनी यापूर्वी नवी मुंबई आणि नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून कार्यभार सांभाळला. महापालिका आयुक्त म्हणून ते तिसऱ्यांदा कार्यभार सांभाळणार आहे.

अकरा वर्षांनी नागपुरात
2008 साली नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. त्यांनी काही शिक्षक व डॉक्‍टरांवर निलंबनाची कारवाई केली होती. यावरून त्यांच्यात व सत्ताधाऱ्यांत संघर्ष पेटला. त्यांच्याविरोधात अविश्‍वास प्रस्ताव आणला होता. 2009 मध्ये त्यांची येथून बदली झाली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com