काय नशीब ! ढगाळ वातावरणामुळे तूर, हरभरा पिके संकटात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 डिसेंबर 2019

सावरलेला शेतकऱ्यावर अवकाळी पावसाचे संकट उभे राहीले. आता ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या खरीप पिकांसह रब्बी पिकांचेही नुकसान होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

मेंढला (जि.नागपूर) : तीन ते चार दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यामुळे तूर, हरभरा, कापूस, कांदा व भाजीपाला आदी पिकांना मोठा फटका बसण्याची दाट शक्‍यता आहे.यावर्षी उशिरा पाऊस सुरू झाल्याने पेरणी लांबली. नंतर जास्त प्रमाणात पाऊस झाल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम झाला. त्यातून सावरलेला शेतकऱ्यावर अवकाळी पावसाचे संकट उभे राहीले. आता ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या खरीप पिकांसह रब्बी पिकांचेही नुकसान होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

आनंदवार्ता.... आता एकाच ऍपवर सर्व विभागांच्या तक्रारी

शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ, अळीच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्‍यता
शनिवारपासून (ता.21) संपूर्ण नरखेड तालुक्‍यातील काही भागात कमी-जास्त प्रमाणात हलक्‍या पावसाने हजेरी लावली आणि त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्‍यता आहे. ढगाळ पावसामुळे तुरीचे सर्वाधिक नुकसान होणार आहे. यामुळे फुलांची गळ व दाण्यांत अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. आणखी काही दिवस असेच वातावरण राहीले तर शेंगा व दाण्याच्या भाराने झुकलेल्या तुरी उभ्या होतील असे शेतकरी सांगत आहेत. हरभरा पिकावरही ढगाळ वातावरणाचा विपरीत परिणाम होणार आहे. फुले गळतील व याशिवाय पाऊस झाल्याने झाडांची अतिरिक्त वाढ होऊन पिकाला उशीर होण्याचीदेखील शक्‍यात शेतकरी वर्तवित आहेत. गहू पिकाला पावसाचा फटका बसू शकतो. शेतकऱ्यांवर सुरू असलेली संकटाची मालिका कायम असल्याचेही शेतकरी नमूद करीत आहेत.

क्‍लिक करा - प्रेमासाठी वाट्‌टेल ते , प्रियकराला वाचविण्यासाठी केले असे

तोंडाशी आलेले पीक जाणार
या ढगाळ वातावरणामुळे हरभरा, तूर या पिकांवर अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे फवारणीसाठी महागडी कीटकनाशके खरेदी करण्यास पैशाअभावी पुन्हा अडचण येणार, खरीप हंगामातील जास्त पावसाने सर्वच पिकांवर परिणाम झाला. सरकारनी नुकसानभरपाई जाहीर केली. पण, अद्याप मिळाली नाही त्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडलेला आहे, असे मत खापा येथील शेतकरी संभाजी वानखेडे यांनी व्यक्त केले.
 

संत्रा, मोसंबी पिकावरही परिणाम
संपूर्ण तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात संत्रा व मोसंबीच्या बागा आहेत. ढगाळ वातावरणामुळे या फळ पिकांवरदेखील मोठा परिणाम होत आहे. आंबिया बहर गाळायला लागला आहे. झाडांवरदेखील रोग निर्माण होत आहे. यात बुरशीजन्य रोगामुळे मृग बहराच्या संत्रावर मोठा परिणाम होणार आहे, असे संत्रा बागायतदार विनोद भादे यांनी सांगितले.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Turbulent, green crops in crisis due to cloudy weather