व्यावसायिक अभ्यासक्रमाची बाराशे महाविद्यालये बंद; चार लाख विद्यार्थी घटले

मंगेश गोमासे
Monday, 2 November 2020

काही महाविद्यालयांनी अभ्यासक्रमासह महाविद्यालये बंद करण्याचेही प्रस्ताव दिले. यात प्रामुख्याने अभियांत्रिकी महाविद्यालये आणि त्यांच्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. चार वर्षात अभियांत्रिकीचे ४ लाख ३ हजार ६५८ विद्यार्थी घटले आहेत.

नागपूर : देशातील महाविद्यालयांमधील व्यावसायिक अभ्यासक्रमाला उतरती कळा लागली आहे. गेल्या चार वर्षांत विद्यार्थी नसल्याने एक हजार २८९ महाविद्यालय बंद झाले आहेत. परिणामी, चार वर्षांत सर्वच व्यावसायिक अभ्यासक्रमामधील चार लाख १२ हजार ८८१ विद्यार्थी घटल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. या महाविद्यालयातील शिक्षकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.

आर्थिक मंदीमुळे देशात नोकरी मिळण्याचे प्रमाण बरेच कमी झाले आहे. यावर्षी बेरोजगारीचा दर ४९ टक्क्यांवर आला आहे. याचे कारण औद्योगिक विकास साधण्यात केंद्र सरकारला अपयश आले आहे. यातूनच व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविली आहे. त्यामुळे महाविद्यालयांमध्ये रिक्त जागांचे प्रमाण वाढले आहे. यातून महाविद्यालयांनी गेल्या काही वर्षात जागा कमी करण्यासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडे प्रस्ताव सादर केले.

जाणून घ्या - संशय अखेर ठरला खरा; कोरोनाबाधितांसह मृत्यूच्या आकडेवारीतील घोळ सिद्ध

याशिवाय काही महाविद्यालयांनी अभ्यासक्रमासह महाविद्यालये बंद करण्याचेही प्रस्ताव दिले. यात प्रामुख्याने अभियांत्रिकी महाविद्यालये आणि त्यांच्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. चार वर्षात अभियांत्रिकीचे ४ लाख ३ हजार ६५८ विद्यार्थी घटले आहेत. याबाबतच्या आकडेवारीकडे नजर टाकली असता, २०१७-१८ या वर्षी ३५ लाख ५१ हजार ९५२ विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली होती. याउलट २०२०-२१ या वर्षी व्यावसायिक अभ्यासक्रमात ३१ लाख ३९ हजार १३९ विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली. त्यामुळे ही घट ४ लाख १२ हजार ८८१ एवढी आहे.

कौशल्य विकासाचा फज्जा

देशात चार वर्षांपूर्वी कौशल्य विकास मंत्रालयाची स्थापना करून विद्यार्थ्यांना रोजगारक्षम करण्याच्या दृष्टीने नवनव्या अभ्यासक्रमाची निर्मिती करण्याचे ठरले. मात्र, आजही कौशल्य विकास अभ्यासक्रम महाविद्यालयांमध्ये दिसून येत नाही. ज्या महाविद्यालयात असे अभ्यासक्रम घेण्यात आले. त्याला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळालाच नसल्याने त्याचा फज्जा उडाल्याचे दिसून येते.

अधिक माहितीसाठी - Success story : उच्चशिक्षित तरुणाची शेतीकडे धाव, फळबागेतून वर्षाला कमावितो ४० लाखांचा नफा

वर्ष - विद्यार्थी - महाविद्यालये

२०१७-१८ ३५,५१,९५७ १०, ३९८
२०१८-१९ ३३,९२,५२१ १०,४२३
२०१९-२० ३२,८४,६२८ १०,९८९
२०२०-२१ ३१,३९,१३९ ९,७००

कौशल्य विकासाच्या नावावर केवळ कार्यक्रम
व्यावसायिक अभ्यासक्रमात आवश्यक असलेली इको-सिस्टिम निर्माण होऊ न शकल्याने व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या जागा आणि विद्यार्थी दोन्ही घटले आहेत. कौशल्य विकासाच्या नावावर केवळ कार्यक्रम सुरू असल्याचे दिसून येते.
- डॉ. सुजित म्हैत्रे,
प्राचार्य, बिंझाणी महाविद्यालय

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Twelve hundred vocational colleges closed