त्या विद्यार्थ्यांचे पोहणे ठरले शेवटचेच...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 फेब्रुवारी 2020

सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान तिघेही नदीकडे फिरायला गेले. खेळून झाल्यावर बाकी मुले घराकडे गेली तर अजेश, प्रवेश आणि तनीष पाण्यात अंघोळीला उतरले. पाण्यात खेळत असताना त्यांना महादेव घाट मंदिरामागील लोखंडी कठड्याजवळ वस्तीतीलच तीन युवक दिसले. मुले पाण्यात पोहत असल्याचे पाहून तिघांनीही त्यांना हटकले आणि नदीजवळून 20 फूट अंतरावर बसून मोबाईलवर खेळायला लागले. खेळता खेळता तिघेही विद्यार्थी खोल डोहात पोहायला गेले.

कामठी : शहरालगतच्या छावणी परिषद हद्दीतून वाहणाऱ्या कन्हान नदी तीरावरील महादेवघाटाजळील डोहात बुडून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तनीष ऊर्फ तन्नू राहाटे याला पोहता येत असल्याने तो बचावला. ही घटना बुधवारी (ता.19) दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली. अजेश अतुल नितनवरे, प्रवेश प्रवीण नागदेवे अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत.
अजेश नितनवरे आजनीतील सेंट जेनेली शाळेतील सातव्या वर्गातील विद्यार्थी होता. त्याला वडील नसून आई माहेरी मुलाला घेऊन राहायची. तर प्रवेश नागदेवे कामठीतील नूतन सरस्वती विद्यालयातील नवव्या वर्गातील विद्यार्थी होता. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तनीष ऊर्फ तन्नू राहाटे काही वर्षे हरदासनगर येथे राहत असल्याने त्याची दोघांसोबत ओळख होती. शिवजयंतीची शाळेला सुटी असल्याने सात ते आठ मित्रांनी नदीकडे फिरायला जाण्याचा बेत आखला होता.

 सविस्तर वाचा - प्याला तेरे नाम का पिया...वाचा नेमके काय

सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान तिघेही नदीकडे फिरायला गेले. खेळून झाल्यावर बाकी मुले घराकडे गेली तर अजेश, प्रवेश आणि तनीष पाण्यात अंघोळीला उतरले. पाण्यात खेळत असताना त्यांना महादेव घाट मंदिरामागील लोखंडी कठड्याजवळ वस्तीतीलच तीन युवक दिसले. मुले पाण्यात पोहत असल्याचे पाहून तिघांनीही त्यांना हटकले आणि नदीजवळून 20 फूट अंतरावर बसून मोबाईलवर खेळायला लागले. खेळता खेळता तिघेही विद्यार्थी खोल डोहात पोहायला गेले. परंतु, थोडेफार पोहता येत असल्याने पाण्याचा अंदाज येताच तनीष डोहाबाहेर येऊन आरडाओरड करू लागला. त्यामुळे तिन्ही तरुणांनी नदीकडे धाव घेतली. त्यांनी तनीषला ओढून बाहेर काढले. परंतु, अजेश आणि प्रवेश गाळात फसल्याने दिसलेच नाही. जीवन रक्षक पथकाचे पुरुषोत्तम कावळे यांनी एक तास शोधमोहीम राबविल्यानंतर वीस ते पंचवीस फूट खोल गाळात फसलेला अजेश आणि प्रवेशचा मृतदेह बाहेर काढला.

आरडाओरड केल्याने तनीष वाचला
तनीष ऊर्फ तन्नू राहाटे याला पाण्यातून खेचून वाचविणारे तीन युवक छावणी परिषद क्षेत्रात असलेल्या मुख्य डाक कार्यालयात आधार कार्डच्या कामाने आले होते. मात्र, शासकीय सुटी असल्याने त्यांचे काम होऊ शकले नाही. त्यामुळे नदीवर जाऊन फोटोसेशन करण्याच्या उद्देशाने ते नदीकाठावर गेले. तनीषचा आवाज ऐकून त्यांनी नदीकडे धाव घेऊन त्याचा जीव वाचवला.

सूचना फलक लावण्याची मागणी
महादेव घाट येथील नदीत सैनिक विभागाने काही वर्षांपूर्वी खोदकाम केले. त्यावेळी जेसीबीने मोठमोठे खड्डे खोदण्यात आले. पावसाळा आल्यामुळे सैनिक विभागाने नदीतून पाणी घेणे बंद केले व बांधण्यात आलेले खड्डे "जैसे थे' ठेवले. कालांतराने खड्ड्यात पाणी जमा झाले. पोहण्यासाठी येणाऱ्यांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने दरवर्षी अप्रिय घटना घडतात. मागील वर्षी याच ठिकाणी दोघे बुडाल्याचे नागरिकांनी सांगितले. माजी नगरसेवक तिलक गजभिये यांनी जुनी कामठी पोलिस ठाण्याचे ठाणेदार देवीदास कठाळे यांना घटनास्थळी कठडे लावण्याची मागणी केली.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two boyes drowned in river