
दुचाकी चालविताना कट मारल्याच्या कारणावरून तीन युवकांनी दोघांवर तलवारीने सपासप हल्ला केला. दोन्ही युवकांवर मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना पाचपावलीत उघडकीस आली.
नागपूर : कधीकधी एखादे वाहन अचानक समोर येते, आणि ब्रेक दाबावा लागतो. आणि हे देखील भांडणाचे आणि हमरीतुमरीवर येण्याचे कारण ठरू शकते. रस्त्यावर एखाद्याशी झालेले छोडेसे भांडणे जीवावर बेतू शकते. त्यामुळे भांडण्यापूर्वी सावधान! दुचाकी चालविताना कट मारल्याच्या कारणावरून तीन युवकांनी दोघांवर तलवारीने सपासप हल्ला केला. दोन्ही युवकांवर मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना पाचपावलीत उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद फैजल मोहम्मद अकरम (वय 27, रा. टेका नवी वस्ती, दूध डेअरी चौक) आणि त्याचा मित्र मजहर खान अब्दूल खान (वय 21, नवी वस्ती टेका) हे रविवारी मध्यरात्री बारा वाजताच्या सुमारास दोन दुचाकींनी घरी जात होते. दरम्यान, आरोपी मोहसीन अख्तर ऊर्फ गुड्डू भाई (वय 24, रा. टेका वस्ती) आणि त्याचे दोन मित्र समीर शेख (वय 21) आणि अल्ताफ मिर्झा (दोघेही रा. तहसील) हे दुचाकींनी येत होते.
सविस्तर वाचा - मिस्टर परफेक्शनिस्टच्या चित्रपटात दिसले असते स्लम सॉकर
गुड्डूच्या दुचाकीला मजहरच्या दुचाकीचा कट लागला. त्यामुळे तीनही आरोपी थांबले. त्यांनी मजहर आणि मो. फैजल यांना अडविले. "तूने मेरे गाडी को कट क्यों मारा' अशी विचारणा करून मारहाण करण्यास सुरुवात केली. तिन्ही आरोपींनी मागे लपविलेल्या तलवारी बाहेर काढल्या. मजहरच्या पोटात तलवार भोसकली. त्यानंतर फैजला वाचविण्यासाठी धावल्यामुळे आरोपींनी त्याच्याही पायावर तलवारीने हल्ला केला. दोघेही रक्तबंबाळ अवस्थेत खाली पडल्यानंतर आरोपींनी पळ काढला. नागरिकांनी घटनास्थळावर धाव घेत दोन्ही युवकांना रूग्णालयात दाखल केले. तक्रारीवरून तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे.