कोरोना ब्रेकिंग : उपराजधानीत आखणी दोन बळी, मृत्यूसंख्या 21 वर 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जून 2020

मेडिकलमध्ये दोघांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची बाब उजेडात येताच प्रशासन हादरले आहे. उपराजधानीत गुणाकार पद्धतीने कोरोना वाढत आहे. झोपडपट्ट्यांमध्ये आतापर्यंत कोरोनाने 300 जणांना विळख्यात घेतले आहे.

नागपूर : कोरोना विषाणूचा प्रकोपाचे विपरित परिणाम आता उपराजधानीत दिसू लागले आहेत. चार जून रोजी नागपूरच्या मेडिकलमध्ये दोघांचा कोरोनाच्या बाधेने मृत्यू झाला होता. त्याच घटनेची पुनरावृत्ती तब्बल अठरा दिवसांनी पुन्हा झाली आहे. सोमवार 22 जून रोजी अमरावती जिल्ह्यातील 36 युवकासहित 75 वर्षीय वृद्धाचा कोरोनाने बळी घेतला आहे. दोघांचा मृत्यू झाल्याने नागपुरात कोरोनाच्या बाधेने मृत्यू झालेल्यांचा आकडा 21 वर पोहचला आहे. तर बाधितांची संख्या 1312 झाली आहे. 

मेडिकलमध्ये दोघांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची बाब उजेडात येताच प्रशासन हादरले आहे. उपराजधानीत गुणाकार पद्धतीने कोरोना वाढत आहे. झोपडपट्ट्यांमध्ये आतापर्यंत कोरोनाने 300 जणांना विळख्यात घेतले आहे. तर मृत्यूची संख्या हळूहळू वाढत आहेत. रविवारी कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. यानंतर लगेच सोमवारी बडनेराच्या मोमीनपुरा येथील 36 वर्षीय युवकाचा मेडिकलमध्ये पहाटे पाऊणे तीन वाजता मृत्यू झाला. 16जून रोजी अमरावती येथून मेडिकलमध्ये रेफर करण्यात आले होते. 

याला सारी आजार असल्याचे निदान झाले. यानंतर कोरोनाची चाचणीही सकारात्मक आली. श्‍वसन घेण्यास त्रास झाला. व्हेंटिलेटवर ठेवले, परंतु फुफ्फुस निकामी होत असल्याचे पुढे आले. अखेर 22 जून रोजी पहाटे निधन झाल्याचे नातेवाईकांना सांगण्यात आले. यानंतर दुपारी अमरावती जिल्ह्यातील सारी आजाराच्या 75 वर्षीय वृद्धालाही मेडिकलमध्ये हलवण्यात आले. 16 जून रोजी यांनाही मेडिकलमध्ये दाखल केले. 12 वर्षांपासून त्यांना मधुमेह होता. सोबत सारीचे निदान झाले. कोरोनाची बाधा झाल्याचे निदान दुपारी 1 वाजून 40 मिनिटांनी यांचाही मृत्यू झाला. 

 हेही वाचा - काकूच्या प्रेमात आकंठ बुडाला पुतण्या, काका ठरत होता अडसर... मग
 

कोरोनाबाधिता प्रादुर्भाव उपराजधानीसाठी आता डोकेदुखी ठरत आहे. सोमवारी मेडिकलमध्ये दोन मृत्यू झाले. यामुळे शहरात मृतांची संख्या 22 झाली आहे. तीन दिवसांपासून उपराजधानीत कोरोनाचा कहर सुरू आहे. एप्रिल महिन्यात 2 , "मे' महिन्यात 9 तर जून महिन्यात 10 मृत्यूची नोंद झाली आहे. जून संपायला आठ दिवस शिल्लक आहेत. मागील तीन दिवसांत नवीन वस्ती कोरोनाच्या विळख्यात येत आहे. सोमवारी शहरात 14 कोरोनाबाधित आढळले. यामुळे बाधितांची संख्या आता 1312 वर पोहचली आहे. 

 

सारीच्या मृतकाची कोरोना चाचणी प्रलंबित 

मेडिकलमध्ये सोमवारी तीन जण दगावले आहेत. या तिघांनाही सारीचा आजार असल्याचे स्पष्ट झाले होते. सारीसह दोघांना कोरोनाची बाधा झाली होती. सारीसह कोरोनाची बाधा असलेले दोघेही अमरावती जिल्ह्यातील होते. तर केवळ सारी आजारामुळे 24 वर्षीय युवक दगावला असून तो चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी होता. या युवकाच्या घशातील द्रवाचे नमूने घेत कोरोना चाचणीसाठी पाठवण्यात आले. दरम्यान कोरोना चाचणीचा अहवाल प्रलंबित आहे. सद्या या युवकाचा मृतदेह शवविच्छेदन कक्षात चार पदरी प्लस्टिकमध्ये लपेटून ठेवण्यात आला आहे. कोरोना चाचणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच अंत्यसंस्कार करण्यात येतील. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two more deaths in Nagpur due to corona, at number 21