
नागपूर : कोरोना विषाणूचा संसर्ग ज्या गतीने उपराजधानीत वाढत आहे, त्याच गतीने मृत्यू देखील वाढत आहेत. 30 लाखाच्या शहरात कोरोनाबाधिताची संख्या कमी आहे, परंतु दर दिवसाला होणारे मृत्यू नजरेआड करता येत नाही. 5 जुलैपासून सुरू झालेले मृत्यूसत्र थांबत नाही. अवघ्या 13 दिवसात 24 मृत्यू झाले असून ही बाब प्रशासनासाठी चिंताजनक बनली आहे. शुक्रवारी एकाच दिवशी पाच जण कोरोनाने दगावल्यानंतर लगेच शनिवारी (ता.18) आणखी दोन कोरोनाचे मृत्यू झाले. तर 102 जणांना कोरोनाची बाधा झाली. यामुळे मृत्यूचा आकडा 49 वर तर बाधितांचा आकडा 2876 वर पोहचला आहे.
मेयो रुग्णालयात शनिवारी दुपारी बारा वाजता 26 वर्षाची महिला दगावली. कोरोनासदृश्य लक्षणे असल्यामुळे तिला 16 जुलैरोजी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. शहरातील हॉटस्पाट ठरलेल्या मोमीनपुऱ्यातील ही महिला असल्यामुळे कोरोनाचा चाचणी करण्यात आली. चाचणीचा अहवाल कोरोनाबाधित आढळून आला. दरम्यान 20 दिवसांपुर्वी या महिलेस क्षयरोग असल्याचे आढळून आले होते. त्यातच कोरोनाची बाधा झाली. उपचारादरम्यान व्हेंटिलेटरची गरज पडली. मात्र अम्बु बॅगच्या भरवशावर ती होती. शरीरातील हिमोग्लोबीन कमी झाले होते. शनिवारी प्रकृती अधिकच बिघडली, अखेर दुपारी 12 वाजता ती दगावली. यासोबतच टिमकी येथील 72 वर्षीय वृद्धाचा कोरोनाच्या बाधेने शनिवारी पहाटे साडेसहा वाजता मृत्यू झाला आहे. 29 जून पासून या वृद्ध व्यक्तीवर मेयोच्या सारी वॉर्डात उपचार सुरू होते. दरम्यान त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे प्रयोगशाळेतून पुढे आले आहे. 20 दिवसानंतर त्यांचा मृत्यू झाला.
शहरात 49व्या मृत्यूंची नोंद झाली आहे. उपराजधानीत मेयो, मेडिकल, एम्ससह कोविड सेटंरमध्ये उपचाराखाली दाखल असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या शनिवारी प्रथमच एक हजार पार गेली आहे. मेडिकलमध्ये 169, मेयोत 194, एम्समध्ये 55 तर कामठी ग्रामीण रुग्णालयात 29, खासगी रुग्णालयातील 21, आमदार निवास कोव्हिड केअर सेंटरममध्ये 293, मध्यवर्ती कारागृहातील 133 तसेच रुग्णालयात दाखल होण्याच्या मार्गावर असलेल्या 137 रुग्णांचा समावेश आहे.
1798 कोरोनामुक्त
नागपुरात कोरोनाबाधितांची संख्या प्रचंड वाढली आहे. चार महिन्यात बाधितांचा आकडा 2876 वर पोहचला आहे. मात्र त्याच गतीने कोरोनावर मात करणाऱ्यांच्या संख्या वाढली आहे. कोरोनातून मुक्त झालेल्यांची संख्या 1798 आहे. कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण 62 टक्के आहे. शनिवारी उपराजधानीत दिवसभरात बिनाकी मंगळवारी, भरतनगर, मिसळ ले- आऊट, लक्ष्मीनगर, गणपती नगर(झिंगाबाई टाकळी) , माऊंट कॉर्मेल स्कूल, रामेश्वरी, मिनीमातानगर, नारी , शंकर नगर , उमंग कॉम्प्लेक्स (आरबीआय चौक) , कळमना रोड , तिरुपती अपार्टमेंट , पोलीस लाईन , सिताबर्डी (आदर्शवाडी) , कुराडकर पेठ , मध्यवर्ती कारागृह , नरेंद्र नगर , सोमवारी क्वार्टर , आझादनगर (मोठा ताजबाग) , हसनबाग (मोठी मस्जित) , भगवान नगर , वकीलपेठ , गोरेवाडा , लकडगंज (एव्हीजी ले- आऊट), व्यंकटेश नगर , राम नगर , नेहरू नगर , कमाल चौक , निर्मल नगरी रुग्णासह इतरही भागात रुग्ण आढळले आहेत.
असे आहेत कोरोनाचे 49 मृत्यू
-एप्रिल ः 2 मृत्यू
-मे ः 9 मृत्यू
-जून ः 14 मृत्यू
-जुलै ः 24 मृत्यू
-शहरात आज आणखी 102 बाधित तर 65 जण कोरोनातून बरे
-बाधितांचा आकडा पोहचला 2876 वर
-जुलै महिन्यात 13 दिवसात 24 मृत्यू
-मेडिकल 20 तर मेयोत 25 मृत्यू, खासगीत 2 मृत्यू
-नागपुरात 1031 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.