दुपारी दोन वाजता भिंतींना बसतात हादरे, भयभित झालेले "ते', मग जगतात तरी कसे,...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 मे 2020

पारशिवनी तालुक्‍यातील कन्हान परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून दररोज दुपारी प्रत्येक घर थरथरते. त्या घरातील सदस्यांना आता या हाद-यांची सवय झाली असली तरी त्यांना आपल्या भविष्याबद्‌दल भीती वाटते. विविध आजारांसोबत मानसिक धक्‍के बसण्याची ही परंपरा कधी खंडीत होईल, याचे उत्तर कोणाजवळ नाही का?
....

टेकाडी (जि.नागपूर): तालुक्‍यातील कन्हान क्षेत्राअंतर्गत वेकोलिच्या खुल्या कोळसा खाणीत नियम धाब्यावर बसवून शक्तीशाली ब्लॉस्टिंग करण्यात येते. वेकोलितील ब्लास्टिंगचे भूकंपागत बसणारे धक्के धोकादायक असून त्यामुळे वेकोलि परिसरातील गावकऱ्यांचे आयुष्यच हादरले आहे. सोबतच दररोज उडणा-या कोळश्‍याचे कणमिश्रित मातीने देखील ग्रामस्थांच्या आरोग्यावर हल्ला करायला सुरुवात केली आहे. अश्‍यात वारंवार तक्रारी करुनही वेकोलिने ब्लास्टिंग तीव्रता कमी न करता ती सुरूच ठेवल्याने
ग्रामस्थांना घरांच्या सुरक्षेसह आरोग्याची चिंता सतावित आहे.

हेही वाचा: युवकांना ठेंगा, पेंशनधारकांनाच पुन्हा नोकरीत संधी

नियम धाब्यावर बसवून केले जाते "ब्लास्टींग'
पारशिवणी तालुक्‍यात वेकोलिच्या तीन कन्हान क्षेत्रात मोठ्या प्रमाणात तीन खुल्या कोळसा खाणी आहेत. टेकाडी, कांद्री, कन्हान, पिपरी, गाडेघाट, घाटरोहना, वराडा या गावांच्या परिसरात खुल्या कोळसा खाणींचे जाळे आहे. या परिसरात दगडी कोळशाचे जाळे मुबलक प्रमाणात असल्याने वेकोलिने शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण करून त्याठिकाणी कोळसा खाणी तयार केल्या.  कोळसा उत्खननासाठी वेकोलित शक्तीशाली ब्लास्टिंग करण्यात येते. ब्लास्टिंग करीत असताना नियम धाब्यावर ठेवल्याचे आरोप अनेकदा ग्रामस्थांनी केलेले आहेत. दररोज दुपारी दोनच्या सुमारास ही ब्लास्टिंग करण्यात येत असल्याने खदाणीलगत असलेल्या गावांना धोका निर्माण झाला आहे.
ब्लास्टिंगच्या तीव्रतेने परिसरात भूकंप झाल्याची अनुभूती ग्रामस्थांना नेहमीचीच झालेली आहे.

हेही नक्‍की वाचा : रक्‍ताने माखलेल्या मृतदेहाने पारडीत खळबळ

शुद्‌ध हवेत विष पेरणे सुरू
अनेक कच्च्या घरांना अल्पावधीतच तडे गेले आहेत. कोळसा खाणी 200ते 300फुट खोल असल्याने परिसरातील पाण्याच्या पातळीत देखील मोठ्या प्रमाणात घट झाल्याने उन्हाळ्यात वेकोलि परिसरातील गावांना पाणी टंचाईची झळ सहन करावी लागत असते. अश्‍यातच वेकोलीकडून होणा-या हादऱ्याने जिथे ग्रामस्थ त्रस्त होते, तिथेच आता खाणीच्या खोदकामाने निर्माण झालेल्या उंच टेकड्यावरील कोळसा मिश्रित मातीने देखील गावांच्या शुद्ध हवामानात विष पेरणे सुरू केले आहे. सदयाच्या काळात नागरिकांना कोरोनासारख्या आजाराशी लढा द्यावा लागत आहे. येथेही दमा, सर्दी, ऍलर्जी आणि इतर आजार बळावण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. भविष्यात जगताना अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

हेही वाचा : मनमुराद थुंका आता, रेल्वेने केली ही सुविाधा

अख्खे आयुष्यच दहशतीत
वेकोलिने गावकऱ्यांचा न संपणारा जीवन संघर्ष सुरू केला आहे. कोळसा खाणींची ही धग विनाकारण नागरिकांच्या माथी मारली जात आहे. वेकोलिच्या दुष्परिणामांनी त्यांचे आयुष्यच हादरले आहे. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून वेकोलिने लादलेल्या समस्यांवर प्रशासनाच्या कोणत्याही जबाबदार लोकप्रतिनिधींना गावक-यांचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावता आला नाही, हे कोळसा खाण परिसरातील गावातील नागरिकांचे दुर्दैव आहे. अश्‍यात निदान वेकोलीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ याकडे लक्ष देऊन समस्येचे निराकरण करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: At two o'clock in the afternoon, tremors sit on the walls, frightened "they", then how do they live, ...