मनमुराद थुंका आता, रेल्वेने केली ही सुविधा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 मे 2020

लाख प्रयत्न करूनही भारतीयांची उघड्यावर कुठेही थुंकण्याची सवय मोडता आली नाही. पण, इझिस्पिट पाऊच व कंटेनरच्या पर्यायाने त्याला आळा निश्‍चितच घातला जाऊ शकतो. हा पर्याय स्वच्छ भारत-स्वच्छ रेल अभियानातील मैलाचा दगड ठरू शकतो. या उपक्रमासाठी नागपूर विभागाने नागपूरच्या मेसर्स इजीस्पीट सोल्युशन्स प्रा. लिमिटेड कंपनीसोबत करार केला आहे.

नागपूर : सर्वाधिक खर्रा खाणाऱ्यांचे शहर अशी नागपूरची सर्वदूर ओखळ असली तरी संपूर्ण भारतातच पान आणि गुटखा शौकिनांनी व्यापले आहे. या शौकिनांच्या प्रतापाने सरकारी इमारतीचे कोपरे रंगलेले दिसतात. रेल्वेस्थानक आणि रेल्वेगाड्यांमध्येही हे किळसवाणे रंगकाम केलेले सज दृष्टीस पडते. याप्रकाराला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने इझी स्पिट पाऊच व कंटेनर विक्रीचा पर्याय शोधून काढला आहे. वाटेल तेव्हा खिशातील या पाऊचमध्ये थुंकता येईल. हा पर्याय कोरोना सारख्या महामारीलाही आळा घालण्याच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

लाख प्रयत्न करूनही भारतीयांची उघड्यावर कुठेही थुंकण्याची सवय मोडता आली नाही. पण, इझिस्पिट पाऊच व कंटेनरच्या पर्यायाने त्याला आळा निश्‍चितच घातला जाऊ शकतो. हा पर्याय स्वच्छ भारत-स्वच्छ रेल अभियानातील मैलाचा दगड ठरू शकतो. या उपक्रमासाठी नागपूर विभागाने नागपूरच्या मेसर्स इजीस्पीट सोल्युशन्स प्रा. लिमिटेड कंपनीसोबत करार केला आहे.

त्यानुसार कंपनीकडून नागपूर रेल्वेस्थानकावर दोन वेडिंग मशीन लावण्यात येतील. त्यातून 20 रुपये किमतीचे इझीस्पिट कंटनर व 10 रुपये किमतीच्या इझिस्पिट पाऊचची विक्री केली जाणार आहे. प्रवासादरम्यान अनेकांना उलटीचाही त्रास होतो. अशा प्रवाशांसाठी 20 रुपये किमतीचे इझी वोमेटही उपलब्ध राहणार आहे. या उत्पादनाचा उपयोग केल्यास थुंकीतून विषाणूच्या प्रसाराला आळा बसू शकेल.

अवश्य वाचा- अहो आश्‍चर्य! पळसाच्या झाडातून निघतेय सॅनिटायझर!!

जगातील पहिलाच प्रयोग

थुंकण्यासाठी पाऊच, कंटेनरची विक्री करण्याचा हा जगभरातील पहिलाच प्रयोग आहे. विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार यांच्या उपस्थितीत नुकतीच वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कृष्णार्थ पाटील, वाणिज्य निरीक्षक तारा प्रसाद आचार्य आणि कंपनीच्या सह संस्थापक आणि सीईओ रितू मल्होत्रा व प्रतिक हरडे यांच्यात कराराची प्रक्रिया पार पडली. या उपक्रमातून रेल्वेला वार्षिक 2 लाख 4 हजारांचे उत्पन्न मिळेल.

थुंकीचे पॉलिमरमध्ये रूपांतर

या पाऊच कंटेनरमध्ये पावडर स्वरूपातील केमिकल आहे. त्यात थुंकी येताच अगदी काही सेकंदांमध्ये पॉलिमर स्वरूपात रूपांतरित होते. या पॉलिमरची पाणी धरून ठेवण्याची क्षमता आहे. यामुळे मातीत मिसळल्यास झाडांसाठी ते लाभदायक ठरू शकते. कागदापासून बनवलेल्या पाऊचमध्ये 15 वेळा, तर कंटेनरमध्ये 30 वेळा थुंकता येते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Easy Spit Pouch will be sold at the railway station