नागपुरातील दोन खासगी हॉस्पिटल्सकडून रुग्णांची तब्बल २४ लाखांनी लूट; पैसे परत करण्याचे आयुक्तांचे निर्देश

राजेश प्रायकर 
Wednesday, 28 October 2020

राज्य सरकारनेल विविध खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांसाठी उपचाराबाबत दर निश्चीत केले आहे. महानगरपालिकेने शहरातील विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोव्हीड रुग्णांकडून राज्य सरकारने निश्चित केलेल्या दरानुसार शुल्क घेण्याचे आदेश दिले आहे

नागपूर :  कोरोना उपचारासंबंधी राज्य सरकारने निश्चित केलेल्या दराशिवाय सुभाषनगरातील विवेका व जगनाडे चौकातील सेव्हन स्टार हॉस्पिटलने ७६ रुग्णांकडून २३ लाख ९६ हजार रुपयांची लूट केल्याची बाब उघडकीस आली. याप्रकरणी महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सर्व रुग्णांना दोन दिवसांत ही रक्कम परत करण्याचे निर्देश या रुग्णालयांना दिले. दोन दिवसांत पैसे परत न केल्यास नोंदणी रद्द करण्याचा इशाराही या दोन्ही हॉस्पिटलला दिला.

राज्य सरकारनेल विविध खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांसाठी उपचाराबाबत दर निश्चीत केले आहे. महानगरपालिकेने शहरातील विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोव्हीड रुग्णांकडून राज्य सरकारने निश्चित केलेल्या दरानुसार शुल्क घेण्याचे आदेश दिले आहे. महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी आदेशाची अंमलबजावणीसाठी शहरातील विविध खाजगी रुग्णालयाचे पूर्व लेखा परिक्षण करण्याकरीता लेखा परिक्षकांची नियुक्ती केली आहे. 

ठळक बातमी - निंदनीय घटना : दहा हजारांच्या कर्जासाठी सावकाराने महिलेवर केला बलात्कार

या लेखा परिक्षकांनी दोन्ही रुग्णालयांनी ७६ रुग्णांकडून एकूण २३ लक्ष ९६ हजार ५० रुपये जास्त घेतल्याचा अहवाल मनपा आयुक्त राधाकृष्णन यांच्याकडे सादर केला. आयुक्तांनी दोन्ही रुग्णालयांना जास्त दर आकारल्याबाबत नोटीस दिली. या दोन्ही रुग्णालयांना ७६ रुग्णांचे अतिरिक्त घेतलेले २३ लक्ष ९६ हजार ५० रुपये परत करण्याचे आदेश दिले. 

साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ व इतर अनुषंगीक कायद्यान्वये अंतर्गत दोनीही हॉस्पिटलवर कारवाई करण्यात आली. २३ लाख ९६ हजार रुपये दोन दिवसांत रुग्णांना परत केल्याच्या पुराव्यासह अहवाल सादर करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. दोन दिवसांत पैसे परत न केल्यास साथरोग अधिनियम, आपत्ती व्यवस्थापन कायदा, महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा व्यवस्थापन कायदा, मुंबई सार्वजनिक न्यास कायदा १९५० मुंबई नर्सिंग होम अमेंडमेंट ॲक्ट, मुंबई नर्सिंग होम रजिस्ट्रेशन अमेंडमेंट ॲक्ट तसेच इतर कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल, असा इशाराही आयुक्तांनी दिला. 

अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांच्या नेतृत्वात लेखाधिकारी संजय मांडळे, सहायक लेखाधिकारी राजेश जिभकाटे, सहायक लेखाधिकारी राजू बावनकर, वरीष्ठ लेखाधिकारी अनील भुरे, सहायक लेखाधिकारी राजेंद्र चिंतलवार, कर निरीक्षक प्रदीप बागडे, डॉ. हर्षा मेश्राम, डॉ. साजीया शम्स यांनी या दोन्ही हॉस्पिटलच्या बिलासंदर्भात तपासणीची कार्यवाही केली. जास्तीत-जास्त दर आकारणाऱ्या विविध खाजगी रुग्णालयांनी आतापर्यंत ३० लक्ष रुग्णांना परत केले आहे.

नक्की वाचा - शेपूट नसलेला श्वान बघितला ना? कधी प्रश्न पडला, का कापली असावी शेपूट? हे आहे कारण

अशी केली रुग्णांची लूट

सुभाषनगरातील विवेका हॉस्पीटलने ‘रिफ्रेशमेंट चार्जेस'च्या नावावर तसेच पीपीईकिट जास्त दर आकारून ५० रुग्णांकडून १७ लाख ९७ हजार ४० रुपयांची लूट केली. जगनाडे चौकातील सेव्हन स्टार हॉस्पिटलने ‘बायोमेडिकल वेस्ट हँडलिंग चार्ज’, ‘कोव्हिड स्टाफ मॅनेजमेंट चार्ज, इन्स्पेक्शन कंट्रोल अँड सॅनिटायजेशन चार्ज’ आणि ‘हाऊसकिपींग केअर अँड हायजिन मेंटेन चार्ज’ असे वेगवेगळे शुल्क घेत २६ रुग्णांकडून ५ लाख ९९ हजार रुपये अतिरिक्त वसूल केले.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two private hospitals looted 76 patients by 24 lakhs