दोन बहिणींनी चक्क वाहतूक पोलिसाला झोडपले; हेल्मेट कारवाईवरून झाला वाद

अनिल कांबळे
Tuesday, 6 October 2020

श्‍वेता दिनेश तागडे (३०) ही सीताबर्डी वाहतूक शाखेत कार्यरत आहे. ती सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारात व्हेरायटी चौकात वाहनचालकांवर कारवाई करीत होती. दरम्यान पल्लवी नरहरी शेळके (३२) आणि रक्षणा नरहरी शेळके (२९, रा. चंद्रमणीनगर, अजनी) या व्हेरायटी चौकातून जात होत्या. 

नागपूर ः हेल्मेट नसल्यामुळे चालान कारवाई करीत असताना महिला वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याने घातलेला वाद चिघळला. त्यामुळे दुचाकीस्वार दोघी बहिणींनी पोलिस महिला कर्मचाऱ्यास चांगले झोडपले. ही घटना व्हेरायटी चौकात सोमवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी बहिणींना पोलिसांनी अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्‍वेता दिनेश तागडे (३०) ही सीताबर्डी वाहतूक शाखेत कार्यरत आहे. ती सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारात व्हेरायटी चौकात वाहनचालकांवर कारवाई करीत होती. दरम्यान पल्लवी नरहरी शेळके (३२) आणि रक्षणा नरहरी शेळके (२९, रा. चंद्रमणीनगर, अजनी) या व्हेरायटी चौकातून जात होत्या. 

त्या दोघींना महिला पोलिस श्‍वेता हिने थांबवले. पल्लवी यांना वाहन चालविण्याचा परवाना मागितला. तसेच हेल्मेट नसल्यामुळे फाईन भरण्यास सांगितला. पल्लवी हिने रोडच्या बाजूला गाडी घेण्याचा प्रयत्न केला. परंतु ती पळून जात असावी असे श्‍वेताला वाटले. त्यामुळे तिने गाडीला मागे ओढले. या झटापटीत पल्लवी खाली पडली आणि गाडीमध्ये दबली. 

हेही वाचा - एअर हॉस्टेसवर प्रियकराने केला बलात्कार
 

ती रडायला लागली. बहिणीला लागल्याचे पाहून रक्षणा हिने आपली बॅग महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या डोक्यात घातली. त्यानंतर दोघीही बहिणींनी पोलिस कर्मचाऱ्याला चांगलीच मारहाण केली. सीताबर्डी पोलिसांनी लगेच धाव घेतली. दोघींनाही ताब्यात घेतले. दोन्ही बहिणींना सीताबर्डी पोलिसांनी मंगळवारी अटक केली. 

शस्त्रासह तडीपार गजाआड

शस्त्राचा धाक दाखवून हैदोस घालत असलेल्या तडीपार गुंडाला नंदनवन पोलिसांनी अटक केली. अटकेतील आरोपी शास्त्रीनगर झोपडपट्टी निवासी जितू ऊर्फ मेंटल सुखदेव जाधव (३१) आहे. जितूविरुद्ध अनेक गुन्हे नोंद आहेत. त्याची लगाम कसण्यासाठी झोन चारच्या डीसीपींनी मार्च २०१९ मध्ये दोन वर्षांसाठी शहरातून तडीपार केले होते. रविवारी दुपारी पोलिसांना माहिती मिळाली की, जितू परिसरात शस्त्राचा धाक दाखवून हैदोस घालत आहे. रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना शिवीगाळ करीत आहेत. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळावर पोहोचले आणि त्याला तलवारीसह अटक केली.  
 

भाजी विक्रेत्याला मागितली खंडणी

भाजीपाला विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी प्रोटेक्शन मनी म्हणून हप्ता द्यावा लागेल, अशाप्रकारे अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुंड सर्वसामान्य लोकांना धमकावत आहे. यासंदर्भात एक गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली. त्यांचा तिसरा साथीदार अद्याप फरार आहे. आकाश केदार यादव (वय २६, रा. साकेतनगर, धाडीवाल ले-आऊट) आणि सोमनाथ ऊर्फ सोनू प्रल्हाद पाली (वय ४०, पार्वतीनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. कल्लू यादव हा तिसरा आरोपी फरार आहे. विमल रामपाल जयस्वाल (वय ३०, रा. भीमनगर, धाडीवाल लेआऊट) हे भाजी विकण्याचे काम करतात. आरोपी व ते एकमेकांचे शेजारी आहे. सुयोगनगर येथील युनियन बँक परिसरात पदपथावर विमल यांना भाजीपाला विक्रीचे दुकान लावायचे होते. त्यावेळी आरोपींनी त्यांना धमकावले. दुकान लावायचे असल्यास हप्ता द्याा लागेल, असे सांगितले. त्यानंतरही त्यांनी दुकान लावले असता रविवारी दुपारी १२ वाजता आरोपींनी त्यांना लोखंडी रॉडने मारहाण करून खुनाचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली. 

संपादन  : अतुल मांगे  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two sisters beat Women traffic police