सावधान! बेरोजगारांना फसविणाऱ्या टोळ्या सक्रीय

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

सायबर फिशिंग करणाऱ्या टोळ्या सध्या सक्रिय आहेत. टोळीतील सदस्य नोकरी उपलब्ध असल्याचे सांगून वेबसाइटवरून फॉर्म भरण्यास सांगितले जाते. त्यानंतर ती टोळी वेगवेगळ्या क्रमांकावरून फोन करून नोकरी लागणार असल्याचा विश्‍वास संपादन करतात.

नागपूर : उच्चशिक्षित तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने बेरोजगारीची समस्या निर्माण होत आहे. रोजगारासाठी धडपडणाऱ्या उच्चशिक्षित तरुणाने एका बेवसाइटवर आपला बायोडाटा टाकला आणि सायबर गुन्हेगाराने त्याला हेरून गंडा घातला. ही घटना मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. हुसबान खान अब्दुल वजीद खान (23, रा. अयप्पानगर, एस. बी. सोसायटी, रिंग रोड) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे.

सविस्तर वाचा - नसबंदी स्वागतार्ह, श्‍वानांच्या उपद्रवाचे काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हुसबान याने 17 जुलै 2019 रोजी "नोकरी डॉट कॉम' वेबसाइटवर अकाउंट तयार केले. आपली संपूर्ण वैयक्‍तिक माहिती त्यात दिली. याचदरम्यान हुसबानच्या मोबाईल क्रमांकावर 8377915298 वरून आरोपीने फोन केला. त्याने नोकरी डॉट कॉमवर तुमची प्रोफाईल बघितल्याचे सांगून नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले. ठगबाजाने "सन फार्मास्युटिकल' कंपनीत नोकरी देतो, असे आमिष हुसबानला दाखविले. रजिस्ट्रेशन आणि इतर प्रोसेसिंगसाठी ठगबाजाने वेळोवेळी हुसबानकडून पैसे मागितले. अज्ञात आरोपी ठगबाजाने दिलेल्या बॅंक ऑफ बडोदा आणि सिंडीकेट बॅंकेच्या खात्यात 14 हजार रुपये भरले. पैसे भरून बरेच दिवस होऊनही ठगबाजाने नोकरी लावून दिली नाही. हुसबानने त्याच्या मोबाईलवर वेळोवेळी संपर्क केला असता त्याच्याशी नंतर संपर्क होऊ शकला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच हुसबानने पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. मानकापूर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला.

टोळ्या सक्रिय
सायबर फिशिंग करणाऱ्या टोळ्या सध्या सक्रिय आहेत. टोळीतील सदस्य नोकरी उपलब्ध असल्याचे सांगून वेबसाइटवरून फॉर्म भरण्यास सांगितले जाते. त्यानंतर ती टोळी वेगवेगळ्या क्रमांकावरून फोन करून नोकरी लागणार असल्याचा विश्‍वास संपादन करतात. या टोळीत युवतींचाही समावेश आहे. नोकरी मिळविण्यासाठी विविध शुल्काच्या माध्यमातून बेरोजगारांना गंडा घालतात.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unemployeed cheated by caboodle