लाखोंच्या मानवी साखळीचा अनोखा उपक्रम

A unique initiative of the human chain of millions
A unique initiative of the human chain of millions

नागपूर :  शहरातील प्रत्येक चौक, रस्त्याच्या बाजूला मानवी साखळी तयार करीत विद्यार्थ्यांनी स्वच्छता व वाहतूक नियमाबाबत जनजागृती केली. चौदाशे शाळांमधील तीन लाखांवर विद्यार्थ्यांनी मानवी साखळी तयार करून शहराची मान उंचावली. विद्यार्थ्यांनी दिलेल्या घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमले.

महानगरपालिका, शालेय शिक्षण विभाग आणि पोलिस वाहतूक विभागाच्या वतीने 13 ते 19 जानेवारीदरम्यान 'मम्मी-पापा यू टू' अभियान राबविण्यात येत आहे. विद्यार्थी केंद्रबिंदू ठेवून अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना स्वच्छतेच्या सवयी लागाव्यात, वाहतूक नियम पाळण्याबाबत जागरुकता निर्माण व्हावी यासाठी विविध स्पर्धा, उपक्रमातून जनजागृती करण्यात येत आहे. शहरातील विविध चौकांमध्ये त्या-त्या परिसरातील शाळांच्या विद्यार्थ्यांनी साखळी तयार करून स्वच्छतेचा जयघोष केला. काल झालेल्या घोषवाक्‍य स्पर्धेत तयार करण्यात आलेल्या घोषवाक्‍यांचे फलक हातात घेऊन विद्यार्थ्यांनी नागरिकांना अभियानाचा उद्देश समजावून सांगितला. तीन लाखांवर विद्यार्थ्यांनी एका उपक्रमासाठी मानवी साखळी तयार करण्याची ही पहिलीच वेळ आहे. झाशी राणी चौकात महापौर संदीप जोशी, उपमहापौर मनीषा कोठे, आयुक्त अभिजीत बांगर, शिक्षण समितीचे सभापती प्रा. दिलीप दिवे, उपसभापती प्रमोद तभाने, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला. विद्यार्थ्यांसोबत त्यांनीही स्वच्छतेचा जयघोष केला. दहाही झोनमधील विविध चौकांत त्या-त्या भागातील शाळांतील विद्यार्थ्यांनी मानवी साखळी तयार केली. नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागातील चौकांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये मिसळून कौतुक केले. अजनी चौकात माऊंट कारमेल गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी पथनाट्य सादर केले. छत्रपती चौकात बॅंड आणि लेझीम पथकानेही नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. त्रिमूर्तीनगर परिसरातील शाळांतील विद्यार्थ्यांनी मानवी साखळीनंतर प्रभातफेरी काढून स्वच्छतेचा जयघोष केला. आकाशवाणी चौकात सेंट उर्सुला स्कूल आणि प्रॉव्हिडन्सच्या विद्यार्थ्यांनी चौकाच्या चारही बाजूंनी उभे राहून जयघोष केला. या ठिकाणीही महापौरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विशेष म्हणून विद्यार्थ्यांच्या घोषवाक्‍यांच्या फलकांनी प्रेरीत झालेल्या महापौर जोशी यांनी स्वत: त्यांच्या फलकाचे छायाचित्र मोबाईलमध्ये टिपले आणि विद्यार्थ्यांसोबत सेल्फी काढला. भांडे प्लॉट, दिघोरी चौक, नंदनवन, जगनाडे चौक, सदर, इंदोरा चौक, सोमलवाडा चौक, काटोल नाका चौक, रामनगर चौक, रविनगर चौक, दुर्गानगर आदी ठिकाणी चौकाच्या चारही बाजूंनी विद्यार्थ्यांनी मानवी साखळी तयार करून स्वच्छतेचा संदेश दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com