#SaturdayPositive कौटुंबिक कलहामुळे शेतीची झाली वाटणी अन्‌ उद्यास आली उद्योजिका

सुषमा सावरकर
शनिवार, 29 फेब्रुवारी 2020

उषा संजय दुनेदार यांचा 2006 मध्ये शेतकरी असलेल्या संजय यांच्याशी विवाह झाला. एकत्र कुटुंब व दोन मुलींसह कुटुंबाचा गाडा अगदी व्यवस्थित सुरू असताना कौटुंबिक कलहामुळे शेतीची वाटणी झाली आणि त्यात केवळ तीन एकर जमीन उषा व संजय यांच्या वाट्याला आली. त्यामुळे साहजीकच कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न दोघांपुढे उभा राहिला.

नागपूर :  परिस्थितीने तिला कणखर बनविले व संघर्ष करायला लावला. अखेर या संघर्षाचे तिला फळ मिळाले. आज ती उद्योजिका म्हणून समाजात सन्मानाने जगत आहे. ही कहाणी आहे पारशिवनी तालुक्‍यातील परसोडी टेक येथील उषा दुनेदार यांची.

अवश्य वाचा - शेतक-यांनो तुम्हाला सोडणार नाही! मी पुन्हा येईन...

उषा संजय दुनेदार यांचा 2006 मध्ये शेतकरी असलेल्या संजय यांच्याशी विवाह झाला. एकत्र कुटुंब व दोन मुलींसह कुटुंबाचा गाडा अगदी व्यवस्थित सुरू असताना कौटुंबिक कलहामुळे शेतीची वाटणी झाली आणि त्यात केवळ तीन एकर जमीन उषा व संजय यांच्या वाट्याला आली. त्यामुळे साहजीकच कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न दोघांपुढे उभा राहिला.

आतापर्यंत केवळ गृहिणी म्हणून घर सांभाळणाऱ्या उषाताई बचतगटाच्या निमित्ताने का होईना बाहेर पडल्या. दरम्यान, तीन वर्षे पूर्ण झालेल्या बचतगटांना, गट ग्रामपंचायत मिळून एक सीआरपीची चमू तयार करायची होती आणि या माध्यमातून बचतगटाची माहिती पंचायत समितीपर्यंत पोहोचवायची होती. या कार्यासाठी त्यावेळी पंधराशे रुपये मानधनप्रमाणे उषा यांची निवड झाली. हे कार्य करीत असतानाच एमआरसीटी म्हणजे महाबॅंक ग्रामीण स्वयंरोजगार संस्था नागपूरबाबत उषा यांना माहिती मिळाली.

घरी लहान मुलगी असतानासुद्धा पतीच्या पुढाकाराने उषा यांनी एमआरसीटीमार्फत एक महिन्याचे ड्रेस डिझायनिंगचे रहिवासी प्रशिक्षण घेतले. हे एक महिन्याचे प्रशिक्षण घेऊन उषा यांनी बचतगटामार्फत कर्ज घेऊन गावात स्वतःचे बुटीक सुरू केले. तसेच त्या सीआरपीचे कार्यदेखील करतात. यासाठी त्यांना आता तीन हजार रुपये मानधन दिल जाते.

कितीही बिकट परिस्थिती वाट्याला आली तरी अविरत चालत राहणे शिकलं पाहिजे. तेव्हाच अडथळ्यांचा डोंगर पार करता येतो. हाच ध्यास मनाशी बाळगून केवळ बारावी शिक्षण असलेल्या उषा आज अनेक मुलींना ड्रेस डिझायनिंगचे प्रशिक्षण देतात. आज उषा एक उद्योजिका म्हणून गावात ओळखल्या जातात.

स्वः पुढाकाराने कार्य करा
महिलांनी योग्य वेळ येण्याची वाट बघण्यापेक्षा स्वः पुढाकाराने कार्य करायला पाहिजे. सरकारने काढलेल्या अनेक योजनांच्या माध्यमातून प्रशिक्षण घेऊन अर्थार्जन करायला हवे. एकेकाळी चूल आणि मूल सांभळणारी मी आज स्वबळावर बुटीकचा व्यवसाय यशस्वीपणे चालवित आहे.
- उषा संजय दुनेदार, उद्योजिका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: usha dunedar became an entrepreneur in a difficult situation