वाहनधारकांनो जरा जपून, भिवापूर-उमरेड मार्गावर ‘रात्रीस खेळ चाले’

file
file
Updated on

भिवापूर (जि.नागपूर): वेळ-मध्यरात्रीची. महामार्गावरून धावणारी मालवाहू व जनावरे वाहून नेणारी वाहने रस्त्यात अडविली जातात. शस्त्रांचा धाक दाखवून चालक व वाहनात असलेल्या इतरांना धमकविले जाते. त्यांच्याकडून पैसे उकळले जातात. मागील काही महिन्यांपासून हा प्रकार सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी ब्रह्मपुरी, नागभिड व तळोधी येथील भाजिपाल्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या  चालकांसोबत अशा प्रकारच्या घटना घडल्यात. त्यातील काही वाहनचालकांना लुटमार करणाऱ्या टोळीकडून जबर मारहाणही करण्यात आली. लागोपाठ घडलेल्या या घटनांमुळे वाहनचालकांत दहशतीचे  वातावरण निर्माण झाले असून यातून मुक्ती मिळवून देण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे. लुटण्यात आलेल्या चालकांसह ब्रम्हपुरी, नागभिड व तळोधी येथील इतरही काही वाहन चालक व मालक यांनी येथील ठाणेदार महेश भोरटेकर यांची बुधवारी (ता.२६)भेट घेवून ही मागणी केली.

उमरेड मार्गावर भिवापूर ते कारगाव दरम्यान लुटमारीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. कारगाव येथे रेल्वे क्रासिंग असल्याने या ठिकाणी रेल्वे फाटकाच्या दोन्ही बाजूला मोठे ‘ब्रेकर’ आहेत. महामार्गावरुन धावणाऱ्या वाहनांची गती या ‘ब्रेकर’ वर कमी असते. नेमके याच संधीचा फायदा लुटमारी करणाऱ्यांकडून घेतला जातो. कधी स्वतः वाहनाला आडवे होवून तर कधी त्यांच्याकडे असलेले चार चाकी वाहन रस्त्यात आडवे करून रस्त्याने जाणारी वाहने थांबविण्यात येतात. नंतर धाक दपटशा तर कधी मारहाण करून वाहन चालकांकडून पैसे उकळले जाते. या टोळीतील तरुण लाठ्या काठ्यांसोबतच घातक शस्त्रे बाळगत असल्याने सहसा कुणी वाहनचालक यांच्याशी मुजोरी करीत नाही. त्यामुळे या टोळीचे चांगलेच फावत आहे. लुटमारीकरीता सुमो, कार आदी वाहनांचा वापर टोळीतील युवकांकडून केला जातो. पूर्वी जनावरांची वाहतूक करणारी वाहनेच या टोळीचे लक्ष होते. परंतू मागील काही दिवसांपासून मालवाहतूक करणाऱ्या इतर वाहनांचीही लूट या टोळीकडून केली जात असल्याने प्रकरणाचे गांभिर्य वाढले आहे.

टोळीवर राजकीय पदाधिकाऱ्यांचा वरदहस्त
वाहनचालकांना लुटणा-या टोळीतील बहूतांश तरूण भिवापूर शहरातील असून त्यांना  एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याचा वरदहस्त प्राप्त असल्याचे समजते. जनावरांची वाहने अडविल्यानंतर पोलिस कारवाईचा धाक दाखवून 'तोडपाणी' करण्याचे काम हा पदाधिकारी व त्याचे दोन अन्य सहकारी मोठ्या शिताफिने पार पाडतात. त्यांच्या या कारवाया मागील वर्षभरापासून सुरू आहेत.

टोळीविरुद्ध कारवाई करणार
भिवापूर उमरेड मार्गावर रात्रीला पोलीस गस्त वाढविण्याचे आदेश दिले. स्वत: या मार्गाची पाहणी केली. टोळीच्या मुस्क्या आवळण्यासाठी आवश्‍यक ती कारवाई करणार. पुढे कुणाचीही भीती न बाळगता वाहतूक करण्याच्या सुचनाही केल्या.
महेश भोरटेकर
ठाणेदार

 संपादन  : विजयकुमार राऊत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com