Video : गाढ झोपेत होते नागपूरकर, मध्यरात्री गुंडांनी घातला धिंगाणा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

गुरुवारची मध्यरात्र... नागपुरातील यशोधरागनरातील नागरिक शांत झोपलेले... अचानक काचा फुटल्याच्या आवाज येतो... झोपेत असलेले नागरिक उठतात. बाहेर डोकावून बघतात तर काय काही युवकांच्या हातात लाकडी दांडे व तलवारी दिसतात. ते वाहनांची तोडफोत करीत समोर जात होते. तसेच वाहनांवर दगडफेकही करीत होते. मात्र, कुणीही त्यांना हटक्‍याचा प्रयत्न करीत नाही... 

नागपूर : गुंडांच्या टोळक्‍याने गुरुवारी मध्यरात्री यशोधरानगर हद्दीत चांगलाच हैदोस घातला. लाकडी दांडे, तलवारीने प्रहार करण्यासोबतच दगडफेक करीत वाहनांची तोडफोड केली. या घटनेत सुमारे 22 वाहनांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. यामुळे धम्मदीपनगर आणि वनदेवीनगरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

गुंडांचे टोळके मध्यरात्री लाठी, काठ्या आणि तलवारी घेऊन धम्मदीपनगरात पोहोचले. त्यांनी घरासमोर उभ्या वाहनांची तोडफोड करणे सुरू केले. आरोपींच्या हातात शस्त्र असल्याने भीतीमुळे कुणीही घराबाहेर पडले नाही. एकामागून एक वाहनांची तोडफोड करीत गुंड बेदरकारपणे पुढे-पुढे जात होते. 

धम्मदीपनगरात काही तीनचाकी वाहने आणि दुचाकींची अशा एकूण 18 वाहनांची तोडफोड करण्यात आली. मुक्तसंचार करीत हे टोळके वनदेवीनगरात शिरले. तिथेही वाहनांची तोडफोड सुरू केली. या भागात सुमारे चार वाहनांची मोडतोड केल्यानंतर गुंड पळून गेले. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली होती. 

अधिक वाचा - जॉनी लिव्हर म्हणातात, नागपूरचे लोक लय भारी

माहिती मिळताच यशोधरानगर पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. लागलीच आरोपींचा शोध सुरू करण्यात आला. तपासचक्रे वेगात फिरवित चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले. वाहनांची तोडफोड करण्यामागील कारण अद्याप कळू शकले नाही. हा थरारक घटनाक्रम परिसरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

यापूर्वीही वाहनांची तोडफोड

आरोपींनी धम्मदीपनगर व वनदेवीनगरात 22 वाहनांची तोडफोड केली असून, आरोपींचा शोध घेतला जात असल्याची माहिती यशोधरानगर ठाण्याचे पोलिस निरीक्षक दीपक साखरे यांनी दिली. यापूर्वीसुद्धा शहराच्या विविध भागात अशा प्रकारे वाहनांच्या तोडफोडीच्या घटना पुढे आल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vehicles vandalized by gang of gangsters at Nagpur