पारशिवनीच्या भाजीबाजारात विक्रेत्यांनी केला राडा; काय आहे कारण...  

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जून 2020

भाजीविक्रेत्यांनी बाजार चौक येथे वाहने आडवी करून मुख्य मार्गावरील भाजीदुकाने लावली. त्यामुळे शहरात सकाळपासून शहरात चक्काजाम झाले. वादावादीला सुरुवात झाली.

पारशिवनी (नागपूर) : कोरोना प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेता सोशल डिस्टन्स पाळले जावे यासाठी येथील भाजीबाजार तकिया मारुती देवस्थान परिसरातील मोकळ्या जागेत हलविण्यात आला. मात्र, या ठिकाणी पाणी व चिखल साचत असल्याने काही विक्रेते जुन्याच जागी दुकाने लावू लागले. नवीन जागी ग्राहक फिरकत नसल्याने नुकसान होत असल्याची विक्रेत्यांची ओरड होती. याबाबत नगरपंचायतीला तक्रार देऊनही कारवाई होत नसल्याने विक्रेत्यांनी जुन्या जागी भर रस्त्यावर दुकाने लावली. यामुळे बाजारात राडा झाला. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला. शेवटी नगरपंचायत प्रशासनाने मध्यस्थी केल्याने या नाट्यावर पडदा पडला. 

सोशल डिस्टन्स पाळले जावे याकरिता पारशिवनी येथील भाजीबाजार हा तकिया मारुती देवस्थान परिसरातील मोकळ्या जागेत हलविण्यात आला होता. मात्र, या ठिकाणी पाणी व चिखल होत असल्याने काही दुकानदार बाजार चौकातील जुन्या जागेवर दुकाने लावून व्यवसाय करीत होते. 

अन्य दुकानदारांनी नगरपंचायतीने ठरवून दिलेल्या जागेवर दुकाने सुरू ठेवली होती. पण, बाजारात लावलेली दुकाने ही ग्राहकांना जवळ पडत असल्याने मारुती देवस्थान परिसरात असलेल्या दुकानांत कुणीही फिरकत नव्हते. तसेच नगरपंचायतीचे आदेश नसताना येथील दुकाने बाजार चौकात विनापरवानगी लावण्यात येत असल्याने नुकसानग्रस्त भाजीपाला दुकानदारांनी नगरपंचायत कार्यालयात तक्रार सादर केली.

मात्र, तक्रारीवर कारवाई होत नसल्याने अखेर मंगळवारी सकाळी भाजीविक्रेत्यांनी बाजार चौक येथे वाहने आडवी करून मुख्य मार्गावरील भाजीदुकाने लावली. त्यामुळे शहरात सकाळपासून शहरात चक्काजाम झाले. वादावादीला सुरुवात झाली. भाजीपाला फेकण्यात आला. कायदा व सुव्यवस्था बिघडत असल्याने अखेर नगरपंचायत कार्यालयातील अधिकारी, पोलिस प्रशासन, तहसीलदार यांना घटनेची माहिती देण्यात आली. 

हेही वाचा : घुग्घुस येथे त्यांनी केले चक्‍क वाहनावर अंत्यसंस्कार

तहसीलदार वरुणकुमार सहारे, नगरपंचायत अधिकारी घटनास्थळावर दाखल झाले. भाजीपाला विक्रेत्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या ठिकाणी विनापरवानगी दुकाने लावण्यास मनाई करून सर्व दुकानदारांना ग्रामीण रुग्णालयाजवळील जागेवर दुकाने लावण्याबाबत नगरपंचायत प्रशासनाकडून आदेश देण्यात आले. यानंतर वाद निवळला. या भागात नागरिकांची मोठी गदीं झाली होती. सोशल डिस्टन्सिंगचा बट्ट्याबोळ दिसून आला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vendors in the vegetable market quarreled