कोरोनावर विजय हाच संकल्प करा, सरसंघचालक डॉ. मोहन भागवतांचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 25 March 2020

संघाचा स्वयंसेवक कायमच असामान्य परिस्थितीशी लढत आला. त्यामुळे आजच्या स्थितीला पूरक असलेले वर्तन तो करू शकतो. देशात काही ठिकाणी योगदान देण्याची आपल्याला गरज पडू शकते. पण केंद्र शासनाच्या सूचनांचे संपूर्ण पालन करून आपल्याला हे प्रयत्न करायचे असल्याचे सरसंघचालक म्हणाले.

नागपूर : संपूर्ण जग कोरोना विरुद्ध लढत असताना, ही लढाई जिंकण्यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवसांची संचारबंदी जाहीर केली. संघस्वयंसेवक वर्षप्रतिपदेला संकल्प करतो. यंदा कोरोनावरच विजय मिळविण्याचा संकल्प करावा असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रथेप्रमाणे दरवर्षी रेशीमबाग येथील स्मृती मंदिर परिसरात वर्षप्रतिपदेचा उत्सव होतो. सरसंघचालक मोहन भागवत या कार्यक्रमाला उपस्थित राहतात. यंदा सरसंघचालकांनी केवळ सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधला.

केंद्र शासनाच्या सूचनांचे प्रत्येकाने पालन करावे. स्वयंसेवकांना एकत्र येणं शक्‍य नसल्याने स्वतःच्या घरी राहून कुटुंबासह संघाची प्रार्थना करावी, हे देखील एकप्रकारचे संघकार्य आहे, असे आवाहन सरसंघचालकांनी केले.

संघाचा स्वयंसेवक कायमच असामान्य परिस्थितीशी लढत आला. त्यामुळे आजच्या स्थितीला पूरक असलेले वर्तन तो करू शकतो. देशात काही ठिकाणी योगदान देण्याची आपल्याला गरज पडू शकते. पण केंद्र शासनाच्या सूचनांचे संपूर्ण पालन करून आपल्याला हे प्रयत्न करायचे असल्याचे सरसंघचालक म्हणाले.

सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी यापूर्वी केलेल्या सूचनांचे पालन करावे. यापुढेही अशा अनेक सूचना त्यांच्याकडून येत राहतील, स्वाभाविकपणे केंद्र शासनाच्या सूचनांना अनुसरूनच सरकार्यवाह मार्गदर्शन करतील असा विश्वास सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी यावेळी व्यक्त केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: victory on corona, make desire