राज्य सरकार, तुम्हीच भरा कोरोना काळातील वीजबिल; विदर्भवाद्यांचे सोमवारी आंदोलन

योगेश बरवड
Sunday, 6 December 2020

कोरोनाच्या संकटामुळे उद्योग, व्यापार सर्व बंद राहिल्याने जनतेच्या खिशात पैसे नाहीत. या अडचणीच्या काळातही सरकारने वीजबिलात २१ टक्के वाढ केली. सोबत तीन महिन्यांचे एकत्रित भरमसाठ बिल पाठविले. नैसर्गिक संकटाच्या काळात बिल भरणे हे सरकारचे कर्तव्य आहे.

नागपूर : विदर्भ राज्य आंदोलन समितीकडून वेगळा विदर्भ व वीजबिलाच्या मुद्द्यावर सोमवारी (ता. ७) विदर्भात शंभर ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कोरोना काळातील वीजबिल सरकारने भरावे, दोनशे युनिटपर्यंत वीजबिल माफ करावे, त्यानंतरचे वीजदर निम्मे करा, कृषीपंपाचे वीजबिल संपवा, विदर्भातील शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी २५ हजार रुपये नुकसान भरपाई द्या, वेगळे विदर्भ राज्य आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. नागपुरात दुपारी १२ ते ४ दरम्यान व्हेरायटी चौकातील गांधी पुतळ्यासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल.

क्लिक करा - बापरे!; पहाटे साडेपाच वाजता शासकीय बालसुधारगृहात दोन अल्पवयीन मुलांनी केली आत्महत्या

कोरोनाच्या संकटामुळे उद्योग, व्यापार सर्व बंद राहिल्याने जनतेच्या खिशात पैसे नाहीत. या अडचणीच्या काळातही सरकारने वीजबिलात २१ टक्के वाढ केली. सोबत तीन महिन्यांचे एकत्रित भरमसाठ बिल पाठविले. नैसर्गिक संकटाच्या काळात बिल भरणे हे सरकारचे कर्तव्य आहे.

ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनीही वीजबिलात सवलत देण्याची घोषणा केली होती. आता यु-टर्न घेत बिल न भरणाऱ्यांचे कनेक्शन कापण्याची भाषा करीत ग्राहकांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. महावितरणने वीज कनेक्शन कापल्यास ते जोडून देण्याची मोहिमही समितीने आरंभली असून आरपारचा लढा देण्याचा आमचा मनसुबा असल्याचे नेवले यांनी सांगितले.

अधिक वाचा - सव्वा महिन्याच्या बाळाच्या खुनाचे रहस्य कायम; कुटुंबीयांनी पित्याला दिली घटनेची माहिती

ऊर्जामंत्र्यांच्या घरावर चार जानेवारीला धडक

सोमवारी होणारे विदर्भव्यापी आंदोलन सरकारला अल्टिमेटम असेल. हिवाळी अधिवेशनात त्यावर निर्णय घेण्याची संधी सरकारला दिली जाईल. पण, तोडगा न निघाल्यास चार जानेवारीला ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या धराला घेराव घातला जाईल. संविधान चौकातून पायी मोर्चा निघून राऊत यांच्या घरावर धडकेल, असे नेवले म्हणाले.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidarbha activists protest in Hundred places on Monday