विंडीजच्या तोफखान्याविरुद्‌ध एकटेच लढले होते विदर्भाचे मुर्तीराजन 

नरेंद्र चोरे
शनिवार, 13 जून 2020

डावाने पराभव टाळण्यासाठी 182 धावांची गरज असताना मध्य विभागाच्या फलंदाजांकडून दुसऱ्या डावात चिवट प्रतिकाराची अपेक्षा होती. मात्र, रॉबर्टस व पाडमोर यांच्या अचूक माऱ्यापुढे फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली आणि अख्खा संघ 85 धावांत गारद झाला.

नागपूर : सत्तर-ऐंशीच्या दशकात वेस्ट इंडीज संघात तुफान मारा करणारे वेगवान गोलंदाज असल्याने भल्याभल्या फलंदाजांची अक्षरश: भंबेरी उडायची. केवळ जिगरबाज फलंदाजच त्यांचा तोंड देण्याची हिंमत करायचा. मात्र, व्हीसीएवर 46 वर्षांपूर्वी झालेल्या एका सामन्यात विदर्भाचे मूर्तिराजन यांनी विंडीजच्या गोलंदाजाची चांगलीच पिटाई करून वैदर्भी हिसका दाखविला होता. दुर्दैवाने सामन्यात मध्य विभाग संघ पराभूत झाला. परंतु, मूर्तिराजन यांच्या त्या अविस्मरणीय शतकाने विंडीजच्या क्रिकेटपटूंसह सर्वांचेच मन जिंकले. 

कर्णधार डेरिक मरे यांच्या नेतृत्वातील वेस्ट इंडीज संघ 1974 मध्ये भारत दौऱ्यावर आला होता. त्या दौऱ्यातील विंडीज आणि मध्य विभाग यांच्यातील तीनदिवसीय सामना 20 ते 22 डिसेंबरदरम्यान विदर्भ क्रिकेट संघटनेच्या सिव्हिल लाइन्स मैदानावर खेळला गेला. विंडीज संघात कर्णधार डेरिक मरेशिवाय क्‍लाइव्ह लॉयड, व्हिवियन रिचर्डस, ऍल्विन कालिचरण, डेव्हिड मरे, रिचर्ड फ्रेडरिक्‍स, ऍण्डी रॉबर्टस, ब्रेंडन ज्युलियन, ए. जी. बार्नेट व फिरकीपटू अल्बर्ट पाडमोरसारखे दिग्गज होते. त्या तुलनेत थोडा कमकुवत असलेल्या मध्य विभाग संघात विदर्भाचे मूर्तिराजन, अनिल देशपांडे व अरुण ओगिरालसह कर्णधार नरेंद्र मेनन, हनुमंतसिंग, सलीम दुरानी, व्ही. के. नायडू, महंमद शाहिद, एस. एल. शास्त्री, एस. बेंजामिन व कैलास गट्‌टानीसारखे त्या काळातील नावाजलेले खेळाडू होते. 

हेही वाचा : 63 वर्षांपूर्वी विदर्भाने व्हीसीएवर फोडला होता उत्तर प्रदेशला घाम!

"स्पोर्टिंग विकेट'वर विंडीजने नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या मध्य विभागाच्या फलंदाजांनी रॉबर्टस, ज्युलियन व बार्नेटचा वेगवान मारा कसाबसा खेळवून काढला. मात्र, ऑफस्पिनर पाडमोरांसारख्या फिरकीला सामोरे जाताना त्यांची दाणादाण उडाली. केवळ सलामीला आलेले मूर्तिराजन हेच पाडमोरांचा सामना करू शकले. सकाळी दहाला मैदानात उतरलेल्या मूर्तिराजन यांनी तब्बल सहा तास चिवट फलंदाजी करत शानदार 104 धावा ठोकल्या. मध्य विभागाचा अन्य कोणताच फलंदाज खेळपट्‌टीवर तग धरू शकला नाही. दुर्दैवाने त्यांच्या शतकानंतरही मध्य विभाग संघ केवळ 254 धावांपर्यंतच मजल मारू शकला. पाडमोर यांनी सहा बळी टिपले. मध्य विभागाला अडीचशेत गुंडाळल्यानंतर विंडीजच्या फलंदाजांनी अपेक्षेप्रमाणे जोरदार फटकेबाजी करत 435 धावांचा डोंगर रचून 181 धावांची भक्‍कम आघाडी घेतली. सलामीवीर फ्रेडरिक्‍स यांनी 120 धावा काढल्यानंतर आठव्या स्थानावर फलंदाजीस आलेल्या लॉयड यांनी अवघ्या 67 चेंडूंत (9 चौकार, 2 षट्‌कार) नाबाद 82 धावा फटकावल्या. कालिचरण (56 धावा) व रिचर्डस (45 धावा) यांचेही योगदान महत्त्वपूर्ण ठरले. अरुण ओगिराल यांनी पाच बळी टिपून विंडीजला थोपवून धरण्याचा प्रयत्न केला. 

दुसऱ्या डावात सपशेल शरणागती

डावाने पराभव टाळण्यासाठी 182 धावांची गरज असताना मध्य विभागाच्या फलंदाजांकडून दुसऱ्या डावात चिवट प्रतिकाराची अपेक्षा होती. मात्र, रॉबर्टस व पाडमोर यांच्या अचूक माऱ्यापुढे फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली आणि अख्खा संघ 85 धावांत गारद झाला. मध्य विभागाचा एकही फलंदाज 20 किंवा त्यापेक्षा अधिक धावा काढू शकला नाही. रॉबर्टस व पाडमोर जोडीने प्रत्येकी चार गडी बाद करून वेस्ट इंडीजला एक डाव 96 धावांनी दणदणीत विजय मिळवून दिला. दारुण पराभवाने एकीकडे मध्य विभागाचे खेळाडू पार खचून केले. त्याचवेळी विंडीजने क्रिकेटमधील आपली दहशत नागपुरातही कायम ठेवली. मात्र, मूर्तिराजन यांचे पहिल्या डावातील शतक आजही अनेकांच्या स्मरणात आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidarbha batsman Murti Rajan fought alone against Windies