63 वर्षांपूर्वी विदर्भाने व्हीसीएवर फोडला होता उत्तर प्रदेशला घाम!

नरेंद्र चोरे
शुक्रवार, 12 जून 2020

उत्तर प्रदेशला सामना जिंकण्यासाठी 65 षटकांमध्ये 183 धावा हव्या होत्या. विदर्भ सामना जिंकू शकतो, अशी शक्‍यता बळावल्याने मैदानावर प्रेक्षकांचीही बऱ्यापैकी गर्दी होती. आघाडी फळीतील मारवाह व मांजरेकर यांनी दमदार सुरुवात करून उत्तर प्रदेशच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या होत्या. पण, साने यांनी एकापाठोपाठ चार गडी बाद करून सामन्याचे चित्र विदर्भाच्या दिशेने झुकविले.

नागपूर : देशाला स्वातंत्र्य मिळून जेमतेम दहा वर्षे लोटली होती. त्या काळात बीसीसीआयचे घरगुती सामने होत असले तरी, विभागवार लढती मात्र 1956-57 पासून सुरू झाल्या. दुसऱ्याच वर्षी नागपूरकरांना विदर्भ आणि उत्तर प्रदेश यांच्यातील तीनदिवसीय रणजी सामना जवळून पाहायला मिळाला. विदर्भ क्रिकेट संघटनेच्या सिव्हिल लाइन्स मैदानावर झालेल्या त्या ऐतिहासिक लढतीत उत्तर प्रदेशने पहिल्या डावातील आघाडीवर निसटती बाजी मारली. मात्र, सामना वाचविताना पाहुण्या संघाची शेवटीशेवटी चांगलीच दमछाक झाली. 

कमी धावसंख्येचे (लो स्कोअरिंग) सामने नेहमीच रोमांचक व नाट्यमय ठरतात. 63 वर्षांपूर्वी (डिसेंबर 1957 मध्ये) झालेला तो सामनाही असाच अनुभव देणारा होता. बलाढ्य उत्तर प्रदेश संघात महान क्रिकेटपटू कर्नल सी. के. नायडू यांचे धाकटे बंधू कर्णधार सी. एस. नायडू, विजय मांजरेकर, ए. के. चतुर्वेदी, आर. मारवाह, आर. कृष्णमूर्ती, के. एम. तिवारी, व्ही. एस. मोदी, ए. डी. भंडारींसारख्या मातब्बर खेळाडूंचा समावेश होता. तर एस. ए. रहिम यांच्या नेतृत्वाखालील यजमान विदर्भ संघही टॅलेंटच्या बाबतीत कुठेच कमी नव्हता. संघात एम. के. जोशी, पी. डब्ल्यू. बारलिंगे, व्ही. डी. सांबरे, पी. एम. गोखले, आर. नरसिम्हन, एस. के. साहू, एन. मनियन, डब्ल्यू. डी. साने, डी. डी. देशपांडे, एम. एच. साठेसारखे नावाजलेले फलंदाज व गोलंदाज होते. 

हेही वाचा  : विदर्भाने 29 वर्षांपूर्वी दाखवला होता राजस्थानला इंगा

"मॅटिन विकेट'वर प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या विदर्भाची सी. एस. नायडू यांच्या अचूक माऱ्यापुढे चांगलीच दाणादाण उडाली. अख्खा संघ पहिल्याच दिवशी 166 धावांत गारद झाला. नायडूंनी सर्वाधिक सात, तर मांजरेकर यांनी एकही धाव न देता तीन गडी बाद केले. खेळपट्‌टीवर "अनइव्हन बाऊन्स' असल्याने उत्तर प्रदेशलाही धावा काढणे कठीण जाणार होते. आणि घडलेही तसेच. त्यांचाही डाव अवघ्या 178 धावांवरच गडगडला. पण, पहिल्या डावात 12 धावांची निसटती आघाडी घेत उत्तर प्रदेशने अर्धीअधिक लढाई जिंकली. विदर्भाच्या दुसऱ्या डावातही नायडू भारी पडले. त्यांनी पुन्हा सहा गडी बाद करून विदर्भाला 194 धावांवर थोपवून धरले. विदर्भाची अवस्था याहून वाईट झाली असती. सुदैवाने नवव्या स्थानावर फलंदाजीस आलेले डी. डी. देशपांडे (49 धावा) व दहाव्या स्थानावरील साने (नाबाद 40) यांनी चिवट फलंदाजी केल्याने विदर्भ 194 धावांपर्यंत पोहोचू शकला. 

केसाच्या अंतराने हुकला विदर्भाचा विजय 

उत्तर प्रदेशला सामना जिंकण्यासाठी 65 षटकांमध्ये 183 धावा हव्या होत्या. विदर्भ सामना जिंकू शकतो, अशी शक्‍यता बळावल्याने मैदानावर प्रेक्षकांचीही बऱ्यापैकी गर्दी होती. आघाडी फळीतील मारवाह व मांजरेकर यांनी दमदार सुरुवात करून उत्तर प्रदेशच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या होत्या. पण, साने यांनी एकापाठोपाठ चार गडी बाद करून सामन्याचे चित्र विदर्भाच्या दिशेने झुकविले. विदर्भाला विजयासाठी दोन गड्यांची आवश्‍यकता असताना नायडू यांनी फलंदाजीतही योगदान देत विदर्भाच्या आशेवर पाणी फेरले. सामना अनिर्णीत संपला तेव्हा उत्तर प्रदेशची दुसऱ्या डावात 8 बाद 112 धावा अशी घसरगुंडी उडाली होती. अखेर पहिल्या डावाच्या आघाडीवर उत्तर प्रदेश विजयी ठरला. सामन्याच्या निकालाने वैदर्भी चाहत्यांची निराशा झाली. पण, अटीतटीचा सामना पाहायला मिळाल्याचे त्यांना समाधानही होते. त्या काळात खेळलेले बहुतांश खेळाडू आता हयात नाहीत. पण, त्यांनी केलेली कामगिरी आजही क्रिकेटप्रेमींच्या स्मरणात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidarbha narrowly missed win against Uttar Pradesh