अन्‌ वैदर्भी खेळाडूंच्या आनंदावर फिरले पाणी !

नरेंद्र चोरे
मंगळवार, 2 जून 2020

रणजी क्रिकेटच्या इतिहासात विदर्भ संघावर अन्याय झाल्याची असंख्य उदाहरणे आहेत. असाच एक किस्सा 35 वर्षांपूर्वी नोव्हेंबर 1985 मध्ये जोधपूरच्या बरकतुल्लाह स्टेडियमवर घडला होता. एक गाजलेला सामना या मालिकेत या सामन्याविषयी...

नागपूर : रणजी क्रिकेटच्या इतिहासात विदर्भ संघावर अन्याय झाल्याची असंख्य उदाहरणे आहेत. असाच एक किस्सा 35 वर्षांपूर्वी नोव्हेंबर 1985 मध्ये जोधपूरच्या बरकतुल्लाह स्टेडियमवर घडला होता.

यजमान राजस्थानविरुद्ध झालेल्या त्या ऐतिहासिक लढतीत विदर्भाचे खेळाडू सामन्यानंतर विजयाचा जल्लोष साजरा करीत असतानाच अचानक पंचांनी पेनल्टी धावा आकारून वैदर्भी खेळाडूंच्या आनंदावर पाणी फेरले. हातातोंडाशी आलेला विजयाचा घास अंतिम क्षणी राजस्थानने हिरावून नेल्याने खेळाडू निराश झाले; विदर्भाच्या "ड्रेसिंग रूम'मध्ये सन्नाटा पसरला. राजस्थानचे मध्यमगती गोलंदाज प्रदीप सुंदरम यांच्या विक्रमी कामगिरीने गाजलेल्या त्या सामन्यात सुरुवातीपासून शेवटपर्यंत अनेक चढउतार पाहायला मिळाले. "मॅटिन विकेट'वर खेळल्या गेलेल्या चारदिवसीय सामन्यात राजस्थानने नाणेफेक जिंकल्यानंतर पहिल्या षटकापासूनच नाट्यमय घडामोडी घडत गेल्या. सुंदरम यांनी तुफानी मारा करत विदर्भाचे एकेक फलंदाज पॅव्हेलियनमध्ये पाठवण्याचा सपाटा सुरू केला.

वाचा - विशेष विमानाने दाखल झालेल्या संदीप पाटील यांच्या वादळी खेळीने विदर्भ घायाळ

अवघ्या तासाभरातच कर्णधार विजय तेलंग यांच्यासह (0) प्रवीण हिंगणीकार (1), सुनील हेडाऊ (0), सतीश टकले (0), सुहास फडकर (0), विकास गवते (0) हे सहा फलंदाज पटापट बाद झाले. त्यावेळी धावफलकावर जेमतेम आठ धावा लागल्या होत्या. प्रकाश सहस्त्रबुद्धे यांच्या 45 चिवट धावांमुळे विदर्भ 140 धावांपर्यंत मजल मारू शकला. सुंदरम यांनी विदर्भाचे दहाही गडी बाद करून रणजी करंडकात इतिहास घडविला होता. पहिल्याच दिवशी डाव गुंडाळल्यानंतर विदर्भाच्या गोटात निराशा पसरली असली तरीही खेळ संपला नव्हता. विदर्भाकडेही टकले-गवते-ठाकरे ही वेगवान तिकडी होती. त्यांनी राजस्थानला 218 धावांमध्ये रोखून सामन्यातील रंगत कायम ठेवली. ठाकरे यांनी पाच तर गवते व टकले यांनी अनुक्रमे तीन व दोन गडी बाद केले. पहिल्या डावात 78 धावांनी मागे पडलेल्या विदर्भाचा दुसरा डावही 184 धावांतच आटोपला. अष्टपैलू गवते यांच्या सर्वाधिक 50 आणि फडकर यांच्या 31 धावा विदर्भाच्या डावाचे वैशिष्ट्य ठरले. यावेळीदेखील सुंदरम यांनी सहा बळी टिपून सामन्यात एकूण 16 गडी बाद करण्याचा भीमपराक्रम केला.

आणखी वाचा - मला एकटं सोडू नका प्लीज... घुसमट वाढताहे? यांच्याशी बोला

असा हिरावला विजय..
राजस्थानला विजयासाठी 107 धावांचे टार्गेट खूप कठीण नव्हते. पण, चौथ्या डावातील दडपणाखाली बऱ्याचवेळा बलाढ्य संघांचीही दाणादाण उडते. त्या दिवशी नेमके तेच घडले. विदर्भाच्या गोलंदाजांनी राजस्थानचा डाव 28.3 षटकांत 95 धावांवर संपवून विजयावर शिक्कामोर्तब केले. टकले व गवते यांनी प्रत्येकी चार गडी टिपले होते. वैदर्भी खेळाडूंचे सेलिब्रेशन सुरू असताना अचानक पंच आर. मित्रा व बी. के. रवी यांनी आपापसात चर्चा व "कॅलक्‍युलेशन' केले आणि षटकांच्या संथ गतीबद्दल विदर्भावर 20 धावांची पेनल्टी ठोकून राजस्थानला विजयी घोषित केले.

अवश्य वाचा - नागपूरकरांसाठी महत्त्वाची बातमी, सलून, स्पाबाबत आला हा निर्णय...

या धक्कादायक निकालाने विजयाचा आनंद अचानक दुःखात परावर्तित झाला. त्या सामन्यादरम्यान राजस्थानच्या खेळाडूंनी वारंवार नखरे करत वेळकाढूपणाचे धोरण अवलंबिले होते. याच गोष्टीचा विदर्भाला फटका बसल्याचे सामन्याचा साक्षीदार राहिलेल्या विदर्भाच्या एका ज्येष्ठ खेळाडूने सांगितले. यासंर्भात विदर्भाने पंचांकडे तक्रारही केली. पण, त्याचा काहीही फायदा झाला नाही. कारण घरच्या मैदानावर सामना असल्यामुळे सर्वच गोष्टी राजस्थानच्या "फेव्हरेबल' होत्या.
 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidarbha Lost the Ranji match on penalty runs against Rajasthan