वैदर्भीय ग्रंथांच्या संशोधनाने साहित्यक्षेत्राला समृद्धी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 जानेवारी 2020

मराठीचे प्राध्यापकच मराठी भाषा संपुष्टात येत असल्याचे ओरड करतात, हा प्रकार चुकीचा असल्याचे डॉ. मधुकर जोशी म्हणाले.
मराठी भाषेचे सूत्र लीळाचरित्रात नमूद असून, वैदर्भीय लोक मराठीचे पुरस्कर्ते आहेत हे जगाला सांगण्याची गरज असून भविष्यात ग्रंथकाराच्या संहितेकडे जाणे गरजेचे असल्याचे मधुकर जोशी म्हणाले

नागपूर : मराठी साहित्यक्षेत्रात ग्रंथ व ग्रंथकाराला दुय्यम स्थान प्राप्त झाले असून, समीक्षक व संपादकांना अग्रणी मानले जाते आहे. मुळात मराठीतील वाङ्‌मय प्रकारांचा व रचनांचा सखोल अभ्यास गरजेचा आहे. मराठवाड्यातील ग्रंथ कायमच श्रेष्ठ असे वैदर्भीयांना वाटते. मात्र, प्रमाण मराठी भाषेचा मापदंड वैदर्भीय ग्रंथानेच दिला आहे. लीळाचरित्रात तसा स्पष्ट उल्लेख असून, अशा ग्रंथांच्या निर्मिचीचे संशोधन झाल्यास साहित्य विश्‍वाला समृद्धी येईल असा विश्‍वास संत साहित्याचे गाडे अभ्यासक डॉ. मधुकर रा. जोशी यांनी व्यक्‍त केला.

विदर्भ साहित्य संघाच्या सांस्कृतिक सभागृहात झालेल्या 97 व्या वर्धापनदिनाच्या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मधुकर जोशी बोलत होते. वि. सा. संघाचे कार्याध्यक्ष वामन तेलंग समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. तर मंचावर डॉ. चंद्रशेखर मेश्राम, ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाद भा. जोशी, सचिव विलास मानेकर, प्रकाश एदलाबादकर प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. मधुकर जोशी यांनी शब्दांची निवड मराठी भाषेची शोभा असून, ही वैदर्भीय देणगी असल्याचे सांगितले. मराठी साहित्य संस्कृती लुप्त होते का अशी भीती वाटते. कारण घरोघरी ज्ञानेश्वरी अन्‌ अभंगाचे पारायण होत असताना दुर्दैवाने मराठीचे प्राध्यापकच मराठी भाषा संपुष्टात येत असल्याचे ओरड करतात, हा प्रकार चुकीचा असल्याचे डॉ. मधुकर जोशी म्हणाले.
मराठी भाषेचे सूत्र लीळाचरित्रात नमूद असून, वैदर्भीय लोक मराठीचे पुरस्कर्ते आहेत हे जगाला सांगण्याची गरज असून भविष्यात ग्रंथकाराच्या संहितेकडे जाणे गरजेचे असल्याचे मधुकर जोशी म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीपाद जोशी यांनी केले. संचालन वृषाली देशपांडे यांनी केले. आभार वर्धा शाखेचे प्रतीक दाते यांनी मानले.

विदर्भ साहित्य संघाच्या वाङ्‌मय पुरस्कार प्रदान विद्याधर बनसोड यांच्या "मुक्कामपोस्ट तेढा' कादंबरीला पु. ल. देशपांडे स्मरणार्थ कादंबरी पुरस्कार, दिवाकर मोहनी यांच्या "शुद्ध लेखनाचे तत्त्वज्ञान'ला डॉ. बा. वी. मिराशी स्मृती पुरस्कार, विराग पाचपोर यांना "देवरस पर्व' ग्रंथासाठी अण्णासाहेब खापर्डे स्मृती पुरस्कार, संजय आर्वीकर यांना "विश्वांगण' ग्रंथासाठी कुसुमानिल स्मृती समीक्षा पुरस्कार, मीनल येवले यांना "मी मातीचे फूल' या काव्यसंग्रहासाठी शरच्चंद्र मुक्तिबोध स्मृती काव्य पुरस्कार, ज्येष्ठ पत्रकार मंजूषा जोशी यांना हरिकिसन अग्रवाल पत्रकारिता पुरस्कार, मदन देशपांडे यांना "हृदयस्पर्शी' ग्रंथासाठी वा. कृ. चोरघडे स्मृती कथा पुरस्कार, डॉ. राजेंद्र डोळके यांना "वैदर्भीय संशोधक' ग्रंथासाठी य. खु. देशपांडे स्मृती शास्त्रीय/ललित लेखन पुरस्कार, डॉ. बाळ पदवाड यांना "राष्ट्रसंतांची विचारधारा' ग्रंथासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्मृती पुरस्कार व अबोली व्यास यांना "संस्कृत महाकाव्य सृष्टीला महाराष्ट्राचे योगदान' ग्रंथासाठी डॉ. मा. गो. देशमुख स्मृती साहित्यशास्त्र पुरस्कार प्रदान करण्यात आले.

"कहाण्या' नाटकासाठी अरविंद विश्वनाथ यांना नाना जोग स्मृती नाट्यलेखन पुरस्कार, "पीळ' या काव्यसंग्रहासाठी सुनील यावलीकर आणि "माझ्या हयातीचा दाखला या काव्यसंग्रहासाठी विशाल इंगोले यांना नवोदित साहित्य पुरस्कार, "युगवाणी' सर्वोत्कृष्ट लेखनाचा रवींद्र इंगळे-चावरेकर यांच्या "विंदा करंदीकरांची कविता-अध्यात्म आणि सौंदर्यबोध' या लेखासाठी कविवर्य ग्रेस पुरस्कार, डॉ. सतीश पावडे यांना "थिएटर ऑफ ऍब्सर्ड' ग्रंथासाठी विशेष उल्लेखनीय पुरस्कार, "कवी अनिल' पुस्तकाच्या निर्मिती आणि प्रकाशनासाठी विजय प्रकाशनास "उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती' पुरस्कार, वि. सा. संघाच्या भंडारा शाखेस सर्वोत्कृष्ट शाखेचा पुरस्कार प्रदान करण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidarbha sahitya sangh"s 97th anniversary