शंभराव्या नाट्यसंमेलनाच्या वारीचा प्रवास व्हाया विदर्भ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 जानेवारी 2020

सांगली ते मुंबईदरम्यान होणारा 100व्या नाट्यसंमेलनाच्या वारीचा प्रवास वाया विदर्भ होणार आहे. असे झाल्यास नागपुरात नाट्यमहोत्सवाची ही दुसरी घंटा असेल. विशेष म्हणजे, विदर्भाची जबाबदारी नाट्यपरिषदेचे उपक्रम उपाध्यक्ष नरेश गडेकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. विदर्भातील स्थळांची निश्‍चिती झाली नसली, तरी नागपूर, अमरावती व कारंजा (वाशीम) येथे ही छोटी संमेलने व लगतच्या गावांमध्ये नाट्यप्रयोग होण्याचे शक्‍यता आहे.

नागपूर : उपराजधानीत मोठ्या धूमधडाक्‍यात 99 वे अ. भा. मराठी नाट्यसंमेलन झाले अन्‌ नाट्यरसिकांना 100 व्या नाट्यसंमेलनाचे वेध लागले. यंदा शंभरावे अ. भा. मराठी नाट्यसंमेलन सांगली येथून प्रारंभ होण्याची शक्‍यता असून, मुंबईत समारोप होईल. विशेष म्हणजे, नाट्यसंमेलनाच्या वारीचा प्रवास व्हाया विदर्भ होणार असून, लहान गावातील नाट्यरसिकांना हे प्रयोग अनुभवता येतील.
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर (ता. 25 मार्च) मराठी रंगभूमीचे जनक व्यंकोजी राजे यांच्या तंजावर येथील समाधी परिसरात नाट्यसंमेलनाची सुरुवात होण्याची शक्‍यता आहे. जागतिक रंगभूमीदिनी (ता. 27 मार्च) सांगली येथे शंभराव्या नाट्यसंमेलनाची नांदी वाजेल. तर, मुंबई येथे 14 जून रोजी संमेलनाचा समारोप होईल, अशी माहिती अ. भा. नाट्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

अवश्य वाचा - युवतीने केला ‘स्पीड चेक’ अन घडले हे

सांगली ते मुंबईदरम्यान होणारा 100व्या नाट्यसंमेलनाच्या वारीचा प्रवास वाया विदर्भ होणार आहे. असे झाल्यास नागपुरात नाट्यमहोत्सवाची ही दुसरी घंटा असेल. विशेष म्हणजे, विदर्भाची जबाबदारी नाट्यपरिषदेचे उपक्रम उपाध्यक्ष नरेश गडेकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. विदर्भातील स्थळांची निश्‍चिती झाली नसली, तरी नागपूर, अमरावती व कारंजा (वाशीम) येथे ही छोटी संमेलने व लगतच्या गावांमध्ये नाट्यप्रयोग होण्याचे शक्‍यता आहे.
7 जूनपर्यंत ही वारी राज्यातल्या प्रमुख दहा स्थळांना भेट देऊन मुंबईला पोहोचेल. या माध्यमातून प्रत्येक स्थळी शनिवार-रविवार छोट्या संमेलनाचे आयोजन होणार आहे. संमेलनापूर्वी सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार व शुक्रवारी नजीकच्या छोट्या गावांमध्ये नाट्यप्रयोग आयोजित करण्यात येणार आहे. त्यानंतर शनिवारी स्थानिक पातळीवरील नाटकांचे स्पर्धात्मक सादरीकरण होईल. यातील उत्तम सादरीकरणाला मुंबई येथे होणाऱ्या समारोपीय सोहळ्यात सादरीकरणाची संधी देण्यात येणार आहे. तर, रविवारी नाट्यपरिषदेच्या मध्यवर्तीतर्फे स्थानिक नागरिकांशी सुसंवाद निर्माण करणारे नाट्यसंगीत, संगीत नाटक किंवा नाट्यचर्चांचे आयोजन केले जाणार असल्याचे परिषदेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

नाट्यसंमेलनाचा समारोप मोठ्या धूमधडाक्‍यात मुंबईत 13 व 14 जून रोजी होईल. त्यापूर्वी 8 ते 12 जून रोजी राष्ट्रीय नाट्यमहोत्सव होणार आहे. समारोपानंतरही ही वारी महाराष्ट्राबाहेर इंदूर, बंगळुरू, हैदराबाद आणि दिल्ली येथे पोहोचेल. तर, 7 नोव्हेंबरपर्यंत शंभराव्या नाट्यसंमेलनाचा हा सोहळा देशभरात साजरा होईल.

उत्सवी नव्हे, सर्वव्यापक स्वरूप

शंभरावे नाट्यसंमेलन हे दरवेळेसारखे उत्सवी राहणार नाही. संमेलनाच्या आयोजनातून तळागाळातल्या रंगकर्मी व रंगरसिकांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न करण्यात येतील. जेथे कधी नाटके झाले नाही, तेथे नाट्यप्रयोग व्हावे, हा यामागचा प्रयत्न आहे. हीच नाट्यसंमेलनामागची विशेष बाब आहे.
-मंगेश कदम, प्रवक्‍ते

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidarbha travels through the turn of the centenary drama