villagers accept deputy sarpanch even grampanchayat members rejected in besur of nagpur
villagers accept deputy sarpanch even grampanchayat members rejected in besur of nagpur

याला म्हणतात विश्वास! सदस्यांनी नाकारले, पण गावकऱ्यांनी स्वीकारले अन् पद जाता-जाता वाचले

भिवापूर (जि. नागपूर ) : बेसूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचाविरुद्धच्या अविश्वास प्रस्तावाला ग्रामपंचायत सदस्यांनी एकमताने पारीत केले. परंतु, या प्रस्तावाला ग्रामसभेने बहुमताने फेटाळून लावत उपसरपंचाला त्यांच्या पदावर कायम ठेवले. ग्रामस्थांनी दाखविलेल्या विश्वासामुळे त्यांचे पद जाता-जाता राहिले.

भय्या गिरडे, असे उपसरपंचाचे नाव आहे. नऊ सदस्यसंख्या असलेल्या बेसूर ग्रामपंचायतीच्या सरपंच स्नेहा मुरलीधर चावट व उपसरपंच भय्या गिरडे यांच्यात ग्रामपंचायतीतील विकासकामांच्या विषयावरून मतभेद निर्माण झाले होते. हे मतभेद वाढत गेले. त्यातूनच सरपंच व सदस्यांनी मिळून भय्या गिरडे यांच्याविरोधात तहसीलदारांकडे अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याविषयीचा अर्ज केला सादर केला होता. या अर्जाच्या आधारे तहसीलदारांनी ४ ऑगस्ट २०२० ला ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभेचे आयोजन केले होते. 

या सभेत ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास प्रस्तावावर चर्चा केल्यानंतर हात उंचावून मतदान करण्याच्या पद्धतीचा वापर करीत ८ विरुद्ध १ मतांनी प्रस्ताव पारीत केला होता. परंतु, जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रक्रियेवर आक्षेप घेत, पीठासीन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ग्रामसभेचे आयोजन करण्याचे व या सभेत प्रस्ताव ठेवून त्यावर गुप्त पद्धतीने मतदान घेण्याचे आदेश तहसील कार्यालयाला दिले होते. सदर आदेशानुसार २८ जानेवारीला बीडीओ माणिक हिमाने यांच्या उपस्थितीत बेसूर येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. गावातील एकूण १८०९ मतदारांपैकी ७२७ मतदारांनी या सभेला हजर राहून अविश्वास प्रस्तावावर मतदान केले. त्यापैकी प्रस्तावाच्या बाजूने केवळ १४९ मते पडली, तर ५११ मतदारांनी विरोधात मतदान करून अविश्वास प्रस्ताव फेटाळून लावला. ६७ मते अवैध ठरली. 

गावकरी पाठीशी ठाम राहिल्याने भय्या गिरडे यांना उपसरपंचपदी कायम राखता आले. दुसरीकडे सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी मिळून एकमताने अविश्वास प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतरही भय्या गिरडे यांना उपसरपंचपदावरून हटविण्यात त्यांना अपयश आले. त्यामुळे सरपंच व सदस्यांच्या खेम्यात निराशेचे वातावरण आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com