एमआयडीसीचे शटर पुन्हा होणार बंद? उद्योजकांसह ६० हजार कामगारही चिंतेत

industries affect due to raw material prices increased in butibori nagpur
industries affect due to raw material prices increased in butibori nagpur

नागपूर : करोनामुळे बंद पडलेले एमआयडीसीतील उद्योग वर्षभरानंतर सुरळीत सुरू होण्याच्या मार्गावर असताना कच्च्या मालाच्या उत्पादकांनी साखळी करून सरासरी तीस ते चाळीस टक्के दरवाढ केल्याने पुन्हा टाळेबंदीची भीती वर्तविली जात आहे. यामुळे उद्योजक आणि कामगारही चिंतेत आहेत. 

कोरोनाच्या टाळेबंदीमुळे थांबलेले उद्योगचक्र पूर्वपदावर येऊ लागले आहेत. नागपूर ग्रामीण व औद्योगिक क्षेत्रातील २ हजार २०० उद्योग प्रकल्पांत ६० हजारांपेक्षा अधिक कामगार उत्साहाने कामाला लागले आहेत. नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी औद्योगिक वसाहतीतील ४०० उद्योग सुरू झाले असून त्यात ३० हजारांपेक्षा अधिक, हिंगणामध्ये ८८० उद्योगात २० हजार तर कळमेश्वर येथील उद्योगामध्ये ५ हजारांपेक्षा अधिक तर इतर औद्योगिक वसाहतीत पाच ते आठ हजार कामगार कार्यरत आहेत. उत्पादन सुरू झालेल्या उद्योगांमध्ये एमआयडीसी हिंगणा येथील महिंद्रा अँड महिंद्रा, आर. सी. प्लास्टो, बजाज स्टील, एमआयडीसी कळमेश्वरमधील जेएसडब्ल्यू स्टील, बुटीबोरी एमआयडीसीतील सनविजय रोलिंग मिल्स, केईसी इंटरनॅशनल, इंडोरामा, सिएट टायर्स, शिल्पा स्टील, मोरारजी टेक्स्टाईल्स, दिनशॉ फूड्स, मौदा येथील हिंदाल्को व विसाका इंडस्ट्रीज, बाजारगाव येथील सोलर एक्सप्लोजिव्ह, नगरधनमधील सूर्यलक्ष्मी स्पिनिंग मिल्स आणि कोंढाळीतील निर्मल टेक्स्टाईल्स यांचा समावेश आहे. 

हळूहळू उद्योग सुरू करण्यास परवानगी दिल्यानंतर औद्योगिक वसाहतीतील चैतन्य पुन्हा वाढले आहे. मात्र, स्टील, केमिकल्स आणि प्लास्टिक उद्योगांनी अचानक कच्चा मालाच्या दरात ३० ते ३५ टक्के वाढ केली आहे. ही भाववाढ उद्योजकांना न झेपणारी आहे. भाववाढ अशीच कायम राहिल्यास पुढील काही दिवसात उद्योग ठप्प होण्याची शक्यता बळावली आहे, असे हिंगणा एमआयडीसी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रशेखर शेगावकर यांनी सकाळशी बोलताना दिली. 

लोखंड आणि रसायनांच्या दरात अचानक वाढ झाल्याचा मुद्दा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अतिशय गंभीरपणे घेतला आहे. त्यांनीही किंमती तातडीने कमी करण्यात याव्यात अशी मागणी केली आहे. मात्र, अद्यापही कंपन्यांनी या कच्च्या मालाचे दर कमी केलेले नाही. त्यामुळे उद्योजकांसमोर आर्थिक अडचणीचा डोंगर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दर कमी न केल्यास उद्योग पुन्हा बंद होण्याचे संकेत मिळू लागले आहेत. 

बुटीबोरी औद्योगिक वसाहतीत कामगारांना ये-जा करण्यासाठी अद्यापही परिवहन सुविधा सुरळीत सुरू झालेल्या नाहीत. ही अडचण दूर व्हावी म्हणून मेट्रोकडे पाठपुरावा केला होता. जानेवारी महिन्यात बीएमएच्या पदाधिकाऱ्यांनी प्रवास केला. मात्र, त्यांनी आकारलेले शुल्क अधिक असल्याने ते कामगारांना परवडणारे नाही. शुल्क कमी केल्यास कामगाराचा दळणवळणाचा मुद्दा मार्गी लागेल. कामगारही सुरक्षितरीत्या वसाहतीत कामासाठी येऊ शकतील. 
-प्रदीप खंडेलवाल, अध्यक्ष, बुटीबोरी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com