एकत्र आले तरी नेटवर्क मिळेना, व्होडाफोन आयडीयाच्या नेटवर्कचा विद्यापीठाच्या परीक्षांना फटका

मंगेश गोमासे
Thursday, 15 October 2020

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील अंतिम वर्षाच्या परीक्षा ८ ऑक्टोबरपासून सुरू झाल्या. परीक्षेच्या पहिल्या दिवसापासून अ‌ॅप संदर्भातील तांत्रिक अडचणींचा विद्यार्थ्यांना सामना करावा लागला.

नागपूर : व्होडाफोन-आयडीयाच्या नेटवर्कच्या समस्येमुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सातव्या दिवशीच्या परीक्षांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना मनःस्ताप सहन करावा लागला. पहिला टप्पा व्यवस्थित आटोपल्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील परीक्षा उशिरा सुरू करण्यात आल्यात. यामध्येही बऱ्याच विद्यार्थ्यांना लॉगिन करता आले नाही. त्यामुळे खबरदारी म्हणून विद्यापीठाने फार्मसीच्या परीक्षा स्थगित करुन उद्या सकाळी पहिल्या टप्प्यात घेण्याचे निर्देश दिले. 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील अंतिम वर्षाच्या परीक्षा ८ ऑक्टोबरपासून सुरू झाल्या. परीक्षेच्या पहिल्या दिवसापासून अ‌ॅप संदर्भातील तांत्रिक अडचणींचा विद्यार्थ्यांना सामना करावा लागला. मात्र, त्यानंतरही जवळपास ९५ टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असल्याचे विद्यापीठाने सांगितले. याशिवाय परीक्षेचा तांत्रिक लोच्या संपल्याने विद्यापीठाच्या परीक्षा सुरळीत होतील, असा दावाही विद्यापीठाने केला होता. त्यानुसार परीक्षेच्या पहिला टप्प्यातील बीएची परीक्षा शांततेत पार पडली. मात्र,

हेही वाचा - हॉटेल घेता का हॉटेल! झळकू लागले फलक

दुसऱ्या टप्प्यातील बीकॉमच्या परीक्षेदरम्यान व्होडाफोन-आयडीयाच्या नेटवर्क समस्येमुळे साडे अकरा वाजताची परीक्षा दोन तास उशिरा झाली. यानंतर तिसऱ्या टप्प्यातील बीएसस्सीचे पेपर साडेतीन वाजता सुरू करण्यात आले. यामध्येही बऱ्याच विद्यार्थ्यांना लॉगिन करता आले नाही. विशेष म्हणजे बीएसस्सी रसायनशास्त्र विषयातील विद्यार्थ्यांना परीक्षाच देता आली नाही. यामुळे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी चौथ्या टप्प्यातील फार्मसीचे पेपर उद्या सकाळच्या सत्रात घेण्याचे पत्र काढले. 

उद्याही पेपर स्थगित होण्याची शक्यता - 
व्होडाफोन-आयडीयाच्या नेटवर्कचा फटका राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षांना बसला. मात्र, हीच समस्या उद्याही राहिल्यास उद्याची परीक्षाही स्थगित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याबाबत प्रशासन खबरदारी घेत असून उद्या अशी परिस्थिती उद्भवल्यास तत्काळ निर्देश देण्यात येईल, असे डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vodafone idea network effect on nagpur university exam