विहीरींमध्ये घुसले जीर्ण सिवेज लाईनचे पाणी; नागरिकांच्या जीवाला धोका 

राजेश प्रायकर  
Wednesday, 4 November 2020

मागील वर्षी उन्हाळ्यात शहरावर जलसंकट निर्माण झाले होते. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात आला. या काळात महापालिकेला शहरातील विहिरींची आठवण झाली

नागपूर ः मागील वर्षी दिवसाआड पाणीपुरवठ्याची वेळ आल्याने महापालिकेने विहिरींच्या स्वच्छतेवर भर दिला होता. परंतु जीर्ण सिवेज लाईनमुळे दूषित झाल्याने तीनशेवर विहिरी वाऱ्यावर आहेत. विहिरींना घाण पाणीच नव्हे तर दुर्गंधीही मोठ्या प्रमाणात असल्याने नागरिकही त्रस्त आहेत. संकटाच्या वेळी पिण्याच्या पाण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या या विहिरी अनेक जण बुजविण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे महापालिकेकडून जलसंवर्धनाला मोठा धक्का बसला असल्याचे चित्र आहे.

मागील वर्षी उन्हाळ्यात शहरावर जलसंकट निर्माण झाले होते. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात आला. या काळात महापालिकेला शहरातील विहिरींची आठवण झाली. शहरात ७५५ विहिरी असून, त्यांच्या स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करून नागरिकांना बाहेरील वापरासाठी पाण्याची सुविधा करून देण्यात आली होती. परंतु यापैकी ३१४ विहिरींची स्वच्छताच करण्याचे टाळण्यात आले होते.

हेही वाचा - Success Story: तरुणीने फुलवला मशरूमचा मळा; कृषी शाखेच्या विद्यार्थिनीचा नाविन्यपूर्ण उपक्रम 

 या तीनशेवर विहिरीत जीर्ण झालेल्या सिवेज लाईनचे घाण पाणी झिरपत असल्याने त्या दूषित झाल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले होते. जीर्ण सिवेज लाईन बदलल्याशिवाय या विहिरींची स्वच्छता शक्य नसल्याचेही एका अधिकाऱ्याने नमूद केले होते. त्यामुळे या विहिरींना महापालिकेने अडगळीत टाकल्याचे चित्र आहे.

नुकताच नगरसेवक मनोज गावंडे यांनी अर्थसंकल्पाच्या भाषणातून दूषित विहिरींकडे लक्ष वेधल्यानने हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. त्यांच्या प्रभाग क्रमांक ३३ मधील बॅनर्जी ले-आऊट, पार्वतीनगर, रामेश्वरी, नालंदानगरासह अनेक वस्त्यांमध्ये जीर्ण सिवेज लाईनमुळे विहिरी दूषित झाल्या आहेत. यापूर्वी रेशीमबागेतील अनेकांनी दूषित झाल्याने विहिरी बुजविल्या.

नगरसेविका आभा पांडे यांनीही जीर्ण सिवेज लाईनचा मुद्दा लावून धरला. शहराला मुबलक पाणीसाठा होत असल्याने विहिरींकडे दुर्लक्ष झाले आहे. परंतु बॅनर्जी ले-आऊट, पार्वतीनगर, रामेश्वरी, नालंदानगरासह प्रभाग ३३ मधील अनेक भागात नळाचेही पाणी मुबलक येत नाही. त्यामुळे नागरिकांना विहिरींच्या पाण्याचा आधार होता. परंतु जीर्ण सिवेज लाईनने दूषित झाल्याने आता नागरिक टॅंकरने पाणीपुरवठ्याची मागणी करीत आहे. त्यामुळे टॅंकरच्या खर्चाचा भुर्दंडही महापालिकेवर बसत आहे. शिवाय नगरसेवकांचीही डोकेदुखी वाढली आहे..

नक्की वाचा - बापाच्या डोळ्यासमोरच चिमुकली खेळत होती, पण भरधाव वाहन आलं अन् क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं

बुजविण्यावर भर

शहरावर पाणीसंकट असताना महापालिकेने शहरातील सर्व विहिरींची स्वच्छता करून त्यातील पाण्याचा वापर करण्यावर भर दिला होता. अनेक विहिरी स्वच्छही करण्यात आल्या. मात्र, "गरज सरो अन्‌ वैद्य मरो' ही म्हण खरे ठरवीत मुबलक पाणी मिळताच विहिरींकडे दुर्लक्ष केले आहे. रविनगर चौकाजवळ नवाबपुरा या भागात पुरातन विहिरीत अनेक वर्षांपासून कचरा टाकला जात आहे. या विहिरीला मोठ्या प्रमाणात पाणी आहे. परंतु कचऱ्यामुळे ही विहीर बुजल्याचे चित्र आहे. त्यामुळे भविष्यात पाण्याचे स्त्रोत असलेल्या विहिरी शहरात दिसतील की नाही? याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: water of sevage lines is entering in nearby wells