मार्ग सुचेना ! धुळीत हरवले रस्ते...

अनिल पवार
Monday, 9 November 2020

या रस्त्यावर वाहनांमुळे धूळ मोठ्या प्रमाणात उडते. दुचाकी, चारचाकी वाहनांना समोरून, मागून येणारी वाहने दिसत नाही. त्यामुळे केव्हाही अपघात घडू शकतो. या अपघातांना जवाबदार कोण, असा प्रश्न भारवाड समाजाच्या गोपालनगर येथील नागरिकांपुढे आहे.

चांपा (जि.नागपूर): उमरेड तालुक्यांतील नागपूर-उमरेड महामार्गालगतच्या एका कंपनीच्या कामामुळे नागपूर-उमरेड महामार्ग ते भारवाड समाजातील गोपालनगर या एक किलोमीटर रस्त्यावर धुळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या रस्त्यावर जडवाहनांची रहदारी अधिक आहे. त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांना धुळीच्या समस्येला सामोरे जावे लागते. वाहनांच्या उडणाऱ्या धुळीमुळे या मार्गावर अपघाताची शक्यता वाढली आहे.

अधिक वाचाः सावलीही मला ‘या’ उन्हाने दिली, ‘ते’ गझलनवाजांच्या गायकीचे झाले ‘हमसफर’
 

भारवाड समाजाचे वास्तव्य
या रस्त्यावर वाहनांमुळे धूळ मोठ्या प्रमाणात उडते. दुचाकी, चारचाकी वाहनांना समोरून, मागून येणारी वाहने दिसत नाही. त्यामुळे केव्हाही अपघात घडू शकतो. या अपघातांना जवाबदार कोण, असा प्रश्न भारवाड समाजाच्या गोपालनगर येथील नागरिकांपुढे आहे. दुसरी बाब म्हणजे भारवाड समाज हा गेल्या पन्नास वर्षांपासून ४० कुटुंबासह वास्तव्य करीत आहे. परंतु आजपर्यत शासनाकडून येथील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आले नाही. या वस्तीचा विकास झाला नाही. त्यात आणखी एक भर पडली.

अधिक वाचाः दुहेरी संकटाने शेतकऱ्यांचे निघतेय दिवाळे, अल्पभूधारकांच्या शेतीची झाली माती
 

आरोग्यावर होतोय परिणाम
धुळीमुळे येथील नागरिकांची श्वसनाची क्षमता कमी झाली असून धूळ श्वासावाटे शरीरात जात असल्याने धुलीकण श्वसनसंस्थेत जमा होतात. त्यामुळे हे धुलीकण श्वसनातून शरीरात, फुप्फुसात, श्वसननलिकेत जातात.  या धूलीकणांचा दीर्घकालीन परिणाम म्हणजे श्वसनाची क्षमता कमी होत असल्याचा येथील नागरिकांचा आरोप आहे. नागपूर-उमरेड रस्त्याशेजारील कपाशीचे नुकसान सुरू असलेले काम व त्यावरून होणारी सततची वाहतूक यामुळे दिवसभर धूळ उडत असते. त्यामुळे नागरिकांना व शेतकऱ्यांना त्रास होणार नाही़, याची खबरदारी घेऊनच काम करावे व दिवसातून दोनदा या रस्त्यांवर पाणी टाकावे व अतितत्काळ या रस्त्याचे सिमेंटीकरणं डांबरीकरणं करून पक्का रस्ता तयार करून दयावा अशी मागणी गोपालनगर येथील भारवाड समाजाचे जेष्ठ नागरिक मेलाभाई जोधाभाई मीर यांनी निवेदनामार्फत सरपंच वेलसाखरा व ऊर्जा मेटल कंपनी हेटी, पॉनीक्स कंपनी यांच्याकडे मागणी केली आहे.

तातडीने रस्ता बनवून दयावा!
गेल्या पन्नास वर्षांपूर्वीपासून आम्ही गावातील लोक वास्तव्यास आहोत. आम्ही पशुपालक असून त्यावरच आमची उपजिविका चालते. तुमच्या कंपनीतील धूळ उडल्यामुळे आमच्या गावात प्रदूषणाची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे आरोग्यहानी व जीवितहानी होऊ शकते. नागपूर-उमरेड मुख्य मार्गावरील चक्रीघाट हेटी ते गोपालनगरपर्यत एक किलोमीटरचा सिमेंट किंवा डांबरीकरणाचा पक्का मार्ग तातडीने बनवून दयावा अन्यथा आंदोलनाचा मार्ग पुकारण्यात येईल.
-जोधाभाई मीर
गोपालनगर हेटी

संपादनःविजयकुमार राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Way to go! Roads lost in the dust.